फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरणाचा तपास ८ आठवड्यांत पूर्ण करा

0
106

>> उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फा. बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा तपास ८ आठवड्यांत पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचा आदेश गुन्हा अन्वेषण विभागाला दिला आहे.
फा. बिस्मार्क डायस यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासकाम करण्याची सूचना गुन्हा अन्वेषण विभागाला केली होती. तसेच तीन महिन्यांनी तपास कामातील प्रगतीबाबत माहिती देण्यास सांगितले होते. फा. डायस यांच्या मृत्यू प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये डायस यांचा मृत्यू झाला होता.

त्यांच्या पार्थिवावर अद्यापपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका डायस यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये बिस्मार्क डायस सांतइस्तेव येथील बांधावर अचानक बेपत्ता झाले होते. ७ नोव्हेंबर २०१५ रोजी डायस यांचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला होता. फा. बिस्मार्क यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ओल्ड गोवा पोलीस करीत होते. पोलीस तपासाबाबत असमाधान व्यक्त करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाकडून गेले कित्येक महिने चौकशी सुरू आहे. परंतु. तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसल्याने याचिकादाराकडून नापसंती व्यक्त केली जात आहे.