फा. कोसेसांव डिसिल्वांना जिल्हाधिकार्‍यांकडून समज

0
99

>> भाजपविरोधी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजप नेत्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राय येथील चर्चचे फादर कोसेसांव डिसिल्वा यांनी चौकशीच्या वेळी माफीनामा सादर केला. राय चर्चचे फादर डिसिल्वा यांचा माफीनामा स्वीकारण्यात आला असून यापुढे अशा प्रकारची कोणतेही वक्तव्य न करण्याची समज त्यांना देण्यात आली आहे.
फादर डिसिल्वा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे मान्य केले असून या वक्तव्यामुळे जनतेची भावना दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो, असे चौकशीच्या वेळी सांगितले. फादर डिसिल्वा यांनी धर्मगुरूची भूमिका योग्य प्रकारे निभावावी. अन्यथा, त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. फादर डिसिल्वा यांनी रविवारी प्रार्थना सभेच्या वेळी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राय येथील चर्चचे फादर डिसिल्वा यांनी वादग्रस्त विधान केल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी चौकशी केली. या चौकशीच्या वेळी फादर डिसिल्वा यांनी आपली चूक मान्य करून माफीनामा सादर केला, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित राय यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली.
धार्मिक नेते, संत, धर्मगुरू, समाज संस्थांचे नेते, संघटनांचे प्रमुख, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, उमेदवारांनी कुणाच्याही भावना दुखावणारी वक्तव्य करू नयेत, असे आवाहन दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.