फार्मसी बंदला गोव्यात १०० टक्के प्रतिसाद

0
109

देशव्यापी फार्मसी बंदला गोव्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील १०० टक्के औषधालये बंद होती, असे अखिल गोवा फार्मसी मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद तांबा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. २९ रोजीची मध्यरात्र ते ३० रोजी मध्यरात्र असे २४ तास देशभरातील ९ लाख फार्मसी बंद होत्या. या काळात फक्त सरकारी फार्मसी तेवढ्या उघड्या होत्या, असे तांबा यांनी सांगितले.
गोव्यात ६०० फार्मसी असून या सर्व फार्मसी वरील काळात बंद होत्या. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नसल्याचे तांबा म्हणाले. लोकांनाही आम्ही बंदची पूर्वीच कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे लोकांनी त्यांना हवी ती औषधे पूर्वीच खरेदी करून ठेवली होती. त्यामुळे लोकांची व खास करून रुग्णांची कोणतीही गैरसोय झाली नसल्याचे तांबा यांनी स्पष्ट केले.
ई पोर्टलला विरोध
केंद्र सरकारने ई-पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून वैद्यकीय ई पोर्टलला देशभरातील फार्मसी मालकांचा विरोध आहे. त्याच्या निषेधार्थ हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता, असे तांबा यांनी नमूद केले. मात्र, मागणी मान्य न झाल्यास ती मान्य होईपर्यंत बंद पुकारण्याचा विचार अखिल भारतीय फार्मसी मालक संघटना करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाईन औषध विक्रीलाही विरोध
दरम्यान, ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या काही बेकायदेशीर साईट्‌सही सुरू झालेल्या असून त्यांची संख्या वाढतच आहे. या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री साईट्‌स बंद कराव्यात अशीही मागणी असल्याचे तांबा यांनी सांगितले.
वास्कोत उत्स्फूर्त प्रतिसाद
काल ३० रोजी देशपातळीवर अखिल भारतीय कॅमिस्ट व ड्रगिस्ट महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला वास्कोतील फार्मसी व्यावसायिकांकडून १०० टक्के प्रतिसाद लाभला. वास्कोतील औषध विक्रेत्या व्यावसायिकांनी संपाला पूर्ण पाठींबा देत फार्मसी बंद ठेवल्या होत्या.