फलोत्पादन महामंडळाला भेडसावते आर्थिक समस्या : प्रवीण झांट्ये

0
153

>> माल खरेदीनंतर पैसे देण्यात अडचण

गोवा फलोत्पादन महामंडळ राज्यातील कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी परराज्यातील तीन मोठ्या कांदा व्यापार्‍यांकडून कांदा खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु या व्यावसायिकांनी कांद्याचा पुरवठा केल्यानंतर त्वरित रक्कम देण्याची अट घातलेली आहे.

गोवा फलोत्पादन मंडळाला आर्थिक समस्या भेडसावत असल्याने कांदा खरेदीनंतर त्वरित पैसे देऊ शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती फलोत्पादन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली.

राज्यात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडली आहे. राज्यात कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने दरात वाढ झाल्याची तक्रार आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाकडून परराज्यातील कांदा, बटाटा व भाजी आणली जाते. महामंडळाने आर्थिक समस्येमुळे मागील पाच ते सहा महिन्यांपासून पुरवठादारांना पैसे चुकते केलेले नाहीत. त्यामुळे पुरवठादार जादा मालाचा पुरवठा करण्यास तयार नाहीत, अशी माहिती आमदार झांट्ये यांनी दिली.

महामंडळाला सरकारकडून अनुदानापोटीचे ३४ कोटी रुपये येणे आहेत. महामंडळातर्फे राज्यभरात १२०० भाजीविक्री केंद्रे चालविली जातात. या केंद्रांना सामानाच्या विक्रीवर २० टक्के सवलत दिली जाते. ही सवलतीची रक्कम सरकारकडून महामंडळाला दिली जाते. परंतु. ३४ कोटी रुपयांचे रक्कम न मिळाल्याने मंडळासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.