फर्मागुडी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

0
165

>> शिक्षकाच्या अत्याचाराचा विद्यार्थ्यांकडून निषेध

>> शिक्षकाला निलंबित करण्याचा मंत्र्यांचा आदेश

फर्मागुडी येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इलेक्ट्रिशियन विभागातील एक शिक्षक विद्यार्थ्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप करीत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी काल सोमवारी वर्गावर बहिष्कार घातला. जोपर्यंत त्या शिक्षकाला निलंबित केले जात नाही तोपर्यंत वर्गावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाची मनुष्यबळ कौशल्य विकास मंत्री विश्‍वजित राणे यांनी गंभीर दखल घेत सदर शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या दीड वर्षात सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून उशीरा आल्यास, शर्टाचे बटण न लावल्यास, जिन्स पँट घातल्यास व ओळखपत्र न घातल्यास दंड म्हणून २०, ५० रुपये घेऊन एका डब्यात घालणे सुरू केले होते. सदर डबा त्या शिक्षकाच्या टेबलावर सतत दिसून येत होता. तसेच विद्यार्थ्यांना हातात मिळणारे साहित्य घेऊन मारहाण करण्याचे प्रकार होत होते. मात्र, यासंबंधी विद्यार्थ्यांनी गेल्या दीड वर्षात एकसुध्दा तक्रार प्राचार्यांकडे दिली नव्हती.

सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घालून प्रा. एस. एस. गावकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार प्राचार्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्वरित त्या शिक्षकाच्या जागी दुसर्‍याची नियुक्ती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकाला निलंबित केल्याशिवाय वर्गात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रा. एस्. एस्. गावकर यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली आहे. यासंबंधी सखोल चौकशी करण्यासाठी त्वरित समितीची निवड करण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी वर्गात येऊन शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या शिक्षकाविरुध्द गेल्या दीड वर्षात एकही तक्रार विद्यार्थ्यांकडून आली नव्हती. मात्र, सोमवारी विद्यार्थ्यांनी अचानक वर्गावर बहिष्कार घातल्यानंतर त्या शिक्षकाबद्दल तक्रार असल्याचे समजले असेही प्राचार्य गावकर यांनी सांगितले.