प्लास्टिक बंदीत आपलाही सहभाग हवा…

0
160
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

गोवा सरकारने प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केलेली आहे, परंतु जोवर आपण नागरिक त्याबाबत सक्रिय होत नाही, तोवर अशा मोहिमा यशस्वी होणे कठीण असेल..

‘वापरा आणि फेकून द्या’ ही संस्कृती समाजात रुजल्यामुळे सगळीकडे टाकाऊ कचर्‍याचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे. वेगाने होणार्‍या शहरीकरणामुळे या समस्येने अधिकच उग्र स्वरुप धारण केले आहे. ‘सर्वत्र स्वच्छ भारत, स्वच्छ परिसर अशा पाट्या लागलेल्या आपल्या दृष्टीस पडतात. पूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे कचरा कमी आणि जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती, आता उलट स्थिती आहे. अर्थव्यवस्था सुधारते, तसा कचरा जास्त निर्माण होतो. नगरपालिका ओला आणि सुका असा वेगळा कचरा जमा करते. मात्र बहुसंख्य नागरिक हा नियम धाब्यावर बसवून कचरा एकत्रित टाकतात. नगरपालिकेच्या गाड्या दारोदार कचरा गोळा करण्याची मोहिम चालवत असूनही अनेकजण प्लास्टीक पिशव्यांत कचरा भरून रस्त्याच्या कडेला, नदी, नाल्यात फेकत असतात.

स्वच्छ भारत अभियान हे केवळ सरकारचे दायित्व नसून प्रत्येक नागरिक यात सामील झाला तरच कचरा व्यवस्थापनाचे अर्धे काम साध्य होईल. धावत्या बसमधून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या फेकणे, वाहत्या पाण्यात नदीनाल्यात कचरा टाकणे बंद झाले पाहिजे. लोक घरात शौचालय असूनही नदीच्या किनारी बसतात. पुरुष आंघोळ करतात, महिला कपडे धुतात. हे पाणी प्रदूषित होत असल्यामुळे त्यातून रोगराई पसरते. गुटखा, पान, तंबाखू खाणारे दिवसा ३० ते ३५ वेळा थुंकतात, हे एका सर्वेक्षणावरून आढळून आले आहे. काहीजण काहीच न खाता वेळ घालवण्यासाठी उगाचच इकडे तिकडे थुंकत असतात. का हा मानसशास्त्राच्या दृष्टीने संशोधनाचा विषय आहे. अनेक मंत्रीमहोदय, बँक अधिकारी, ग्रंथपाल तसेच उच्च विद्याविभूषीत व्यक्ती बोटाला थुंकी लावून पुस्तकांची, फाईलची पाने उलटताना आपल्याला जागोजागी दिसतात. अशा घाणेरड्या सवयी आम्ही अंगवळणी लावून घेतल्या आहेत. याबद्दल त्यांना काही विचारणे म्हणजे आत्मक्लेश करून घेण्यासारखे आहे. या गोष्टी आपल्याला टाळणे खरोखरच कठीण वाटते का? नदी, नाला, तलाव ही जणू बिनदिक्कत कचरा टाकायची, घाण करायची साधने झाली आहेत. त्या घाण पाण्याची जणू मोठमोठी गटारे झाली आहेत. लहानपणी आम्ही उन्हाळ्यात नदीवर पोहायला जायचो. आता नद्या सुकून कचर्‍याचे ढीग पसरले आहेत. साधारण २५-३० वर्षांपूर्वी प्लास्टीक पिशव्यांचे जोरदार आगमन झाले आणि बाजारातील एकूण स्वरुप पालटले. कागदाचा उपयोग कमी होऊ लागला. दुकानदाराला कागदाच्या पुड्या बांधण्यापेक्षा प्लास्टीक पिशव्या वापरणे सोईस्कर वाटू लागले. पूर्वी तेल खरेदीला ग्राहक बाटली आणायचे, तुपासाठी डबा. पुढे दुकानदार या वस्तू प्लास्टिक पिशव्यांतून देऊ लागले. चहासपासून लिंबू सरबत पिशवीतून मिळू लागले. वीस रुपयांची एक दूध पिशवी प्लास्टीक पिशवीतून देण्याची सवय दुकानदारांनी ग्राहकाला लावली आणि यातूनच ‘पार्सल’ ही संस्कृती अस्तित्वात आली. कपड्याच्या पिशवी जवळ बाळगणे कमीपणाचे ठरू लागले, तर प्लास्टिक पिशवीत सामान खरेदी करणे पुढारलेपणाचे लक्षण मानू लागले. फळे, भाजी, मासे, किराणा विक्रेते सर्रास पिशव्यांचा वापर करताना दिसतात. आपण घराबाहेर पडताना पाण्याच्या बाटल्या बाळगत नाही. २० रुपयांच्या विकत बाटल्या घेतो. त्याचाही ढीग वाढतो आहे.

एकदा वापरलेली पिशवी परत वापरली जात नाही. दुसर्‍या दिवशी दुसरी पिशवी ग्राहक दुकानदाराकडून हक्काने मागून घेतो. आठवडा बाजार, मंदीर यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पुष्कळ कचरा निर्माण होतो. १५ माक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणे कायद्याने मनाई आहे. मनाई असूनही सार्वजनिक ठिकाणी पाणी, चहा पिण्यासाठी प्लास्टीक कप वापरले जातात. प्लास्टिक पिशव्यांविरुद्ध सरकारने मोहीम चालवली आहे. त्यासाठी दंडाची तरतूद आहे. तरीही दुकानदार लपून पिशव्या देतात, कारण पिशवी दिली नाही तर ग्राहक वस्तू न घेता पुढे जातात. दुकानदाराला मागणी तसा पुरवठा हे धोरण बाळगणे भाग पडते.

कायदा असूनही या उपद्रवी सवयी रोखण्यापासून सरकार हतबल आहे. खरेदीला निघताना कापडी पिशवी बाळगणे हा नियम पाळणे आणि दुकानदाराने प्रांजळपणे प्लास्टीक पिशवी देण्यास नकार देणे, ही विचारधारा बाळगली पाहिजे. प्लास्टीकचा अनिर्बंध वापर संपूर्ण पर्यावरण बिघडवू शकते. याची जाणीव ठेवून जिथे जिथे त्याचा वापर टाळता येऊ शकतो तो टाळून नागरिकांनी आपले दायित्व ओळखून कापडी पिशवी हाच सर्वोत्तम पर्याय निवडावा. प्लास्टीक सहज बनते. मात्र ते नष्ट होणे मुश्किल आहे. त्याचे विघटन होत नसल्यामुळे ते नष्ट व्हायला ५०० ते १००० वर्षे लागतात. पर्यावरणाच्या दृष्टीने हे अधिक घातक आहे. त्यामुळे उघड्यावर एकही प्लास्टीकचा तुकडा दिसता कामा नये. ते जमिनीवर फेकून दिल्यावर जमिनीची नापिकता वाढते. ते जाळले तर त्यातून निघणार्‍या धुरातून कार्बन मोनोक्साईड निघते जे शरीराला अत्यंत घातक आहे.

प्लास्टीकच्या पिशव्या खाऊन उघड्यावर फिरणारे गाय, बैल, शेळ्या, बकरी, कुत्री, डुकरे आपले प्राण गमावतात. कचरा समुद्रात टाकल्यामुळे मासे आणि इतर जलचरप्राण्यांचा काळ ठरला आहे. टाकाऊ अन्नपदार्थ, नासलेली फळे, भाज्या उघड्यावर टाकल्यामुळे या साचलेल्या कचर्‍यामुळे गावात, शहरात अतिसार, चिकन गुनियासारख्या गंभीर स्वरुपाच्या रोगांच्या साथी फैलावतात. प्लास्टीकच्या पिशव्यांत, भांड्यांत जमणारे पाणी मच्छरांची पैदास वाढवण्यास कारणीभूत ठरते. दुर्गंधी पसरते, नाकाला रुमाल बांधून फिरावे लागते. जगभरातील समुद्रात ८० लाख मेट्रीक टन प्लास्टीक कचरा जमा झाला असून त्यात कालांतराने अधिक वाढ होत आहे. प्लास्टीकचे कण समुद्रीमीठात मिसळल्यामुळे ते मीठ आपल्या स्वयंपाकघरात पोचले आहे.

कचरा गोळा करण्यासाठी लाखो मनुष्ययंत्रणा खर्ची पडते. नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना अत्यंत दुर्गंधीतून कचरा उचलावा लागतो. लोक कचरा पेटीत नको नको त्या गोष्टी टाकत असतात. देशात वार्षिक १५,१३४ टन कचरा जमा होतो. यातील केवळ ६०% कचर्‍याचा पुनर्वापर होतो. ओल्या कचर्‍यातून कंपोष्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येते. कचरा व्यवस्थापनामुळे जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती कशी करता येऊ शकेल यावर भर द्यावा लागेल.

बेकरीपासून टेक्स्टाईल उद्योगाला प्लास्टीकची आवश्यकता आहे. मात्र या उत्पादकाना प्लास्टीकला पर्याय म्हणून विघटन मूल्य असलेला पदार्थ वापरून पिशव्याची वेस्टने तयार करता येतील, याचा विचार करावा. आपण पाण्याचे बिल भरतो, या गुर्मीत पाणी जपून वापरा’ या संदेशाला गंभीरपणे न घेता आजही पाण्याचा अनियंत्रीत वापर करतो आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्‍न उग्र रुप धारण करतो. कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेत शुल्क भरतो म्हणून आपण आपल्या दारात आणि रस्त्यात कचर्‍याचे ढीग उभारू नयेत. केवळ प्रशासनावर बोट रोखून आपण आपल्या दायित्वापासून पळू शकत नाही. कारण यात समाजातील प्रत्येक प्राणीमात्राची हानी आहे.