प्रेम म्हणजे…

0
215
  • सौ. पौर्णिमा केरकर

अशावेळी आठवतो मला एक ‘ऑटोग्राफ.’ आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या असंख्य व्यक्ती, बरेचसे चेहरे अथांग प्रवासात हरवून गेलेत. मनःपटलावर रेंगाळणारे अवघेच. अशा अवघ्यांमुळेच तर नाती रुजवतात आणि टिकतातसुद्धा….

एक वय होतं. हळवं… कोवळं… स्वप्नाळू… तरल. त्या वयाला मनापासून आवडायची मंगेश पाडगावकरांची कविता. सुरेश भट, शांता शेळके, बा. भ. बोरकर यांच्या कवितांचीसुद्धा मनावर धुंदी होती. कुसुमाग्रजांची कविता तर अभिजाततेने जीवनप्रवासात सतत बरोबर राहिली. आणखीही खूप खूप कविता आवडायच्या, ज्या कविता वाचल्यानंतर मनातल्या भावना हिंदकळायच्या… मोरपिशी आठवणींचा स्पर्श त्यातून जाणवायचा. अवघा सभोवताल भारल्यागत व्हायचा.

सोळा वर्षे सरली की, अंगात फुले फुलू लागतात
जागेपणी स्वप्नांचे, झुले झुलु लागतात
पाडगावकरांना तरुणवयाच्या हळव्या कोपर्‍यांची नेमकी नस सापडली होती. म्हणूनच भावमनाची तरलता त्यानी आपल्या शब्दाशब्दांतून प्रतिबिंबित केली. शब्दांवर विश्‍वास ठेवूनच स्वप्नं पाहायची, आईवडिलांनी ठेवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरायचे. कोणी आपल्याला नावे ठेवणार नाहीत ना, कोणाच्या नावाने चिडवणार तर नाहीत ना, याची दक्षता घेऊनच सरळमार्गी आपण चालायचे, हीच पद्धत असायची. मानवी मन म्हटलं की भावना-संवेदनांची एक मोठी गुंतवळच त्यात सामावलेली असते. अशा या मनाला कसली, कोणती आकर्षणे निर्माण होतील हे काही सांगता येणार नाही. असे असूनही फुलांच्या पाकळ्यांवरील दवबिंदूंची रांगोळी, त्या प्रत्येक बिंदूतील इंद्रधनुष्य आणि ते रंगच घेऊन एखादे कोवळे, सुकोमल चित्र रेखाटावे. बिंदू-बिंदूना गुंफूनच त्याची एक मालाच शरीरमनाला लपेटावी आणि जमलेच तर त्या थेंबांचे फुलपाखरूसुद्धा करावे. असे हे फुलपाखरू स्वैर विहरताना पाहणे हेसुद्धा प्रेमच असावे. अशी ही प्रेमाची धुंदी पाडगावकरांच्या कवितेने मनामनांत रुजविली. या प्रेमाला अलवार तजेला होता. आश्‍वासकतेची प्रबळता त्याला जोडली गेली. कधीकाळी निराशलेल्या मनाला त्यामुळेच उभारी मिळत गेली. चंद्राचे कोवळेपण मनाकाळजात साठवून ठेवण्यासाठी हृदयही तेवढेच भावकोमल असणे गरजेचे आहे, याचीही जाणीव याच शब्दानी करून दिली.

माणूस भावनिक भुकेला. तो प्रेमाशिवाय नाही जगू शकत. मग हे प्रेम तरी कसं, आधार देणारं, विश्‍वासानं खांद्यावर हात ठेवणारं, प्रसंगी जीवाला जीव देणारं… त्याच्यामध्ये स्वार्थ कुठला तर मूर्तिमंत त्याग भरून राहिलेला. मला आठवतंय अजूनही… दहावी, बारावी, पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर असा टप्प्याटप्प्यांनी अभ्यासक्रम पुरा करीत असताना सहकारी वर्गमित्र-मैत्रिणींच्या अभिप्रायार्थ एखादी डायरी ‘ऑटोग्राफ’ घेण्यासाठी म्हणून हमखास केली जायची. तशी मीही ती प्रत्येक वेळेलाच केलेली होती. आज अगदी बघता बघता या आठवणींना दोन दशके सहजपणे उलटून गेली. सगळीजणं आपापल्या मार्गानं गेली. कुटुंब, संसार, मुलेबाळे, त्यांचे शिक्षण, त्यांच्यासाठी खस्ता खाणं या सगळ्याच धबडग्यात ‘डायरी’ आठवेलच असं नाही. पण ती आठवते. त्या वेळच्या त्या निरोपाना शब्दबद्ध केले होते याचा अनामिक आनंद प्राप्त होतो. पण सर्वांच्याच समोर ती डायरी उघडून बसावं, त्यात त्या खुळ्या अल्लड तरुणवयानं काय काय लिहून ठेवलं ते वाचावं असं धाडस मात्र होत नाही. मी वाचते काय लिहिलेय ते. हसू येतं. मनाकाळजात तो काळ दाटून येतो. वेड्या वयाचं ते वेडेपण असावं का?

आज मुलांचे व्हॉट्‌सऍप, इन्टाग्राम, इंटरनेट, फेसबूकवरून एकमेकांसाठी मैत्रीचे संदेश अहोरात्र फिरत असतात. प्रदेश-देशाच्या सीमा ओलांडूनही ही मैत्री सातासमुद्रापार जाऊन पोहोचलेली आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या झंझावातात मोबाईल बाजूला सारून माझ्या ऑटोग्राफच्या डायर्‍या मी वाचायला घेते तेव्हा मला पक्कंच ठावूक असतं की माझ्या मुलीने जर ती डायरी बघितली तर ती मला हसणार, नवरा चिडवणार. मग त्यांना मी उगीचच दाखविली असेच वाटणार. त्यापेक्षा असंच कधीतरी तिच्या विटलेल्या कव्हरवरील धूळ हाताने झटकावी, आतील निखळलेली पाने अलगद बोटाने मागे सारून मध्येच एखादे जाळीदार झालेले पिंपळपान डोल्यांसमोर धरून आरपार बघावं. कित्येक वर्षांचं ते गुलाबाचं फूल… पानं आणि काटेरी देठ यांसकट निपचीत पडून असलेलं. ते उचलून हृदयाशी स्पर्शून घ्यावं. पानं जशी उलटतात तसतशा आठवणी एकेक करून फेर धरतात. मग पुढे हाताला लागते मिरपीस. कोणी बघत तर नाही ना याचा कानोसा घेत तेही मग चेहर्‍यावर अलवार फिरत राहतं. श्‍वासालासुद्धा चांदण्याचा झुला करीत झुलवायला लावण्याची ताकद डायरीमधील अभिप्रायांना होती. साहित्यिकदृष्ट्या त्यांना काही मोल नसेलही. आवडता चित्रपट, आवडती व्यक्ती, खाणं, मित्र-मैत्रिणी यांचा एक साचा तयार असायचा. ‘या भूतलावर जोपर्यंत चंद्र-सूर्य असेल तोपर्यंत आपली मैत्री टिकून राहील’, ‘जोपर्यंत कोंबडा अंडं घालत नाही तोपर्यंत आमच्या मैत्रीला अजरामरता येईल…’ हा सगळाच वेडेपणा होता खरा; पण त्याला लाभलेली डोळस संवेदनशीलता विचारांना प्रगल्भता देणारी होती.

लिहिणारी सगळीच आपापल्या मार्गाने निघून गेली. ‘आयुष्यात आपली मैत्री कधीच तुटणार नाही’, ‘जीवात जीव असेपर्यंत एकमेकांना विसरणं शक्यच नाही’, ही वाक्ये मी वाचते आणि मग नजर शोधत फिरते त्या वयाला… त्या निरोपाच्या क्षणांना… वाटा वेगळ्या झाल्या आयुष्याच्या म्हणून काय झाले, पृथ्वी तर गोलच आहे. आपण भेटूया पुन्हा पुन्हा… पण अशा या भेटी जगण्याच्या धकाधकीत राहूनच जातात.

खिन्न या वाटा दूर पळणार्‍या
या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या…
असं क्षणिक वाटायचं. पण आज वयाच्या मध्यावर्तात असताना या स्मृती जीव छळणार्‍या न वाटता जीव नव्याने फुलविणार्‍याच वाटतात. प्रत्येक आठवणीला एक वय बिलगून असतं. त्या-त्या वयाला त्या-त्या वेळी ते मोकळेपणाने व्यक्तच करता येत नाही… आणि मग वाढत गेलो की जगण्याचा पसाराच एवढा होतो की त्यात स्वतःसाठी वेळ तरी कोठे मिळतो? अशावेळी तारुण्यातील वसंतवेडी झुळूक आठवण म्हणून सांगितली तरी अवघडल्यासारखं होतं. श्‍वासात सुगंध भरून ठेवण्याचे ते दिवस… तोच गंध ध्यास बनायचा. स्वप्नांचे निळे निळे मोर खुणवायचे. ओंजळीतले रितेपणसुद्धा जीवनाला सकारात्मकता पुरवायचे. शब्दांवर, त्या मागच्या भावनेवर
प्रेम होते म्हणून मग-
तू कोठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
असे पाडगावकर आठवत राहायचे. हा वयाचा वेडेपणा की भावनांचा… की त्या-त्या काळचा? हे ओथंबलेपण होते… त्या-त्या वेळेलाच धरून. पण प्रवासात पुढे जाताना त्यातील भाव मात्र प्रगल्भ होत गेला. भावनांप्रती असलेली वैचारिक बैठक अधिक वास्तवदर्शी बनली. नुसतेच भावनिकतेने भारावून जाण्यापेक्षा हे वेगळे असे जगणे आहे…. सभोवताली ज्यावर मनस्वी प्रेम करता येतं. जसे मदर तेरेसानी केले अनाथांवर, बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांना मायेने कुरवाळलं. बळ दिलं त्यांच्या पावलांना अविचल राहण्यासाठी! सानेगुरुजींचे प्रेमाचे महन्मंगल स्रोत तर घराघरांतील भगवत्‌गीताच बनलेले आहेत. काळ मागे सरकत गेला तसतसे नवनवे अर्थ उमगत गेले. कुसुमाग्रजांच्या कवितेने तर ‘प्रेम’ या शब्दाकडे पाहण्याची, तो आत आत मुरविण्याची दृष्टीच बदलून टाकली. प्रेम राधेच्या वत्सल सनावरती करता येते, तसेच ते कुब्जेच्या कुरूप कुबडावरही करता येते. प्रेम भोगावर करता येते, पण त्याहीपेक्षा ते त्यागावर करावे.

अलीकडे प्रेमाचा खास दिवस साजरा करण्याचे फॅड तरुणाईत मुरलेले दिसते. एक दिवस ‘प्रेम’ जीव उधळून करायचे आणि उरलेल्या दिवसांत फक्त तिरस्कार, द्वेषच करायचा. मनासारखी प्राप्ती झाली नाही तर जीवच संपवायचा; एक तर स्वतःचा, नाहीतर त्याचाही. हा तर मत्सरच. प्रेमाचे स्रोत इथे या भूमीत जेवढे आळवले गेले तेवढे तर आणखी कोठेच दिसणार नाहीत. असे असूनही आजकाल आपापसातील नातेसंबंधात वाढत जाणारी सवंगता मनाला त्रास देते. अलीकडेच डॉ. अनिल अवचटांचे ‘जिवाभावाचे’ हे पुस्तक वाचनात आले. माणसांचा त्यांना असलेला सोस यातील शब्दाशब्दांतून जाणवतो. सगळ्याच शब्दांना जिव्हाळ्याचे ओथंबलेपण आहे. सर्वसामान्यांच्या शहाणपणातूनच आपले शिकणे होते. माणूस म्हणून मी चांगला आहे, आणि अधिक चांगला माणूस होण्याची इच्छा, अर्थात हे चांगुलपण माझ्या सभोवतालच्या माणसांकडून घेतलेले आहे. तोच माणुसकीचा अंश माझ्या जन्माची शिदोरी आहे. माणसाच्या स्नेहाचा भुकेला माणूस त्यांच्या जीवलगासकट या पुस्तकातून अनुभवता येतो. इथे मनापासून प्रेम करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची गरज भासत नाही. तो ‘दरवळ’ हृदयकुपीत कायमच असतो. प्रेम समर्पण असतं. अंगभर वेदना झेलून सर्जनाचा आनंद साजरा करणारी ती आईच असते. शब्दांवाटे प्रेम व्यक्त करता आले नाही म्हणून काय झाले, प्रसंगी दरारा दाखवून पाठीवरून प्रेमाने हात फिरविणारा तो बाप… पण असे हे स्पर्शसुद्धा आज अविश्‍वास, गैरसमजात बुडालेले आहेत. हा असा सगळा आता आपला सभोवताल. असे असूनही आश्‍वासकता ‘प्रेम’ शब्दाची अभिजातता, जगण्यावरचे आणि माणसांवरचे प्रेम अधिक वृद्धिंगत करत जाते. अशावेळी आठवतो मला एक ‘ऑटोग्राफ.’ आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या असंख्य व्यक्ती, बरेचसे चेहरे अथांग प्रवासात हरवून गेलेत. मनःपटलावर रेंगाळणारे अवघेच. अशा अवघ्यांमुळेच तर नाती रुजवतात आणि टिकतातसुद्धा….