प्रेम, करुणा आणि सेवाभाव यांचा आविष्कार : ख्रिसमस

0
439

–  डॉ. पांडुरंग फळदेसाई 

संतांच्या आणि थोर विभूतींच्या आयुष्यावर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे, त्यांच्या वाट्याला आलेले खडतर जीवन. त्यांना आयुष्यभर उपसावे लागलेले कष्ट, खाव्या लागलेल्या खस्ता आणि तत्कालीन समाजाचा सोसावा लागलेला कडवा विरोध. या सर्व अडचणी पार करून ज्यांनी मानवजातीसाठी आपल्या आयुष्याचेच अग्निदिव्य केले, तेच पुढे संतपदाला पोचले. अशाच महामानवांना मागाहून देवत्व बहाल केले.आता ख्रिसमसचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. हा सण साजरा करण्यासाठी जगभर जंगी तयारी चालू आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या देशांतून ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. नाताळाचे हे आनंदपर्व साजरे करण्यासाठी जो तो आतूर झाला आहे. भारतासारख्या सर्वधर्मसमभाव राखणार्‍या देशातील ख्रिस्ती बांधव या नाताळ सणाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत. परमेश्‍वरी अंश घेऊन जन्माला आलेल्या आणि आपले संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी वेचणार्‍या प्रभू येशूची स्मृती जागविण्याचे काम हा सण नित्यनेमाने करीत आला आहे. त्याच्या जीवनातून घडून आलेल्या मानवजातीप्रति प्रेम, करुणा आणि सेवाभाव आपल्या आयुष्यात स्वीकारण्याची प्रेरणा प्रत्येक येशूभक्त घेत असतो. येशू ख्रिस्ताचा प्रत्येक भक्त आपली त्याच्याप्रति असलेली श्रद्धा समर्पित वृत्तीने व्यक्त करीत असतो. मानवी जीवन प्रकाशमय करून सत्कृत्यांनी सुगंधित करण्याची प्रेरणा तो ख्रिस्ताच्या जीवनातून घेत असतो.
परमेश्‍वरी इच्छेखातर मानवी बालकाचे रूप घेऊन अवतरलेला येशू ख्रिस्त एखाद्या सुखवस्तू घरात जन्माला आला नाही. गायीगुरे आणि मेंढ्यांच्या गोठ्यात तो अवतरला. पुढील आयुष्यात त्याने सदाचरणाची पाठ सोडली नाही. असंख्य अडचणी आणि दुःखे त्याच्या वाट्याला आली. तत्कालीन समाजधुरिणांनी त्याला सदैव छळले. त्याचा गुन्हा काय होता? रूढी-परंपरांनी आणि मानवनिर्मित दुःखांनी गांजलेल्या समाजाला त्याने परमेश्‍वर भक्तीचा आणि नीतीचा मार्ग दाखवला हाच काय तो त्याचा गुन्हा. त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला मृत्युदंड दिला. स्वतःचा क्रॉस स्वतः खांद्यावर घेऊन, शरीरात ठोकलेल्या खिळ्यांच्या असह्य वेदना सोशीत येशूने मानवजातीच्या कल्याणासाठी प्राणार्पण केले. परंतु त्यावेळीदेखील त्याच्या मारेकर्‍यांविषयी त्याच्या तोंडी अपशब्द आले नाहीत. तो इतकेच म्हणाला, ‘‘परमेश्‍वरा, त्यांना क्षमा कर. कारण ते काय करीत आहेत हे त्यांना ठावूक नाही!’’ ही पराकोटीची सहनशीलता एकटा येशूच जाणे.
शेजार्‍यावर प्रेम करा, चुकलेल्यांना क्षमा करा, गांजलेल्यांची सेवा करा, आपल्या अंतःकरणातील करुणेचा झरा सदासर्वदा झुळझुळता राहील याची काळजी घ्या, करुणा, शांती आणि सेवाभाव सदैव जपा हा त्याच्या आयुष्यभराचा संदेश. आज जगात सर्वत्र निष्पापींच्या मृत्यूची दहशत वावरत आहे. असंख्य निष्पाप जीव अतिरेकी आणि धर्मांध दहशतवाद्यांच्या बंदुकांनी टिपले जात आहेत. अशा या भयानक वातावरणात येशू ख्रिस्ताचा शांती आणि करुणेचा संदेश आपले अंग चोरून ठायी ठायी लपला आहे! निदान या नाताळच्या सणाच्या निमित्ताने तो संदेश जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत उजळ माथ्याने आणि प्रभावीपणे जाऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करण्यापलीकडे आपण फारसे काही करू शकत नाही.येशू खिस्ताचा जन्मदिन म्हणून ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. जगभर बहुतेक २५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून पाळला जातो. इसवी सनाच्या चौथ्या शतकात म्हणजे सन ३५४ मध्ये २५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्तजन्माचा दिवस म्हणून पाळला गेल्याचा सर्वात जुना दाखला इतिहासात सापडतो. चौथ्या शतकाअगोदर पौर्रात्य ख्रिस्ती जगतात ६ जानेवारी हा दिवस नाताळ सण म्हणून साजरा केला जात असे. नाताळ या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेतील छशींर्ळींळींरी या शब्दात दिसते. त्याचा अर्थ ‘स्थानिक’ असा आहे.
हा सण मुळात रोममध्ये साजरा केला जाई. रोमन लोक सूर्योपासक होते. सूर्याला ते नेहमी सर्वात बलवान आणि अजिंक्य मानत. सूर्य हा समस्त उर्जेचा स्रोत. त्याच्या उर्जेपासूनच पृथ्वीवर जीवसृष्टी अवतरली. पृथ्वीला जीवसृष्टीचे दान बहाल करणारा तेजःपूंज राजा सूर्य हा रोमन साम्राज्यातील सर्वांचा देव होता. त्या गोलार्धात सप्टेंबरपासून दिवस लहान होत जातात व रात्री मोठ्या होत जातात. त्यामुळे कडाक्याची थंडी पडते. परंतु २२ डिसेंबरच्या आसपास तेथे दिवसाचा काळ वाढू लागतो. त्याचे दृष्य परिणाम २५ डिसेंबरला दिसून येतात. म्हणून २५ डिसेंबरला सूर्याचा जन्म होतो व त्यानंतर तो दिसीमासी वाढत जातो अशी रोमन लोकांची धारणा होती. पुढे आवरेलिअन राजाच्या कारकिर्दीपासून २५ डिसेंबरचा समारंभ साजरा करण्याचा सोहळा वाढत गेला. त्यावेळेपासून सूर्यदेवाचा जन्मदिन हा येशूचा जन्मदिवस ठरविण्यात आला असे सांगतात. प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतल्यास याची सत्यता पटते.
परंतु काही अभ्यासकांचे असे मत आहे की, २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस म्हणण्यास ऐतिहासिक पुरावे नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार येशूचा जन्म झाल्यास २०१४ वर्षे नाहीत तर २०२० वर्षे झालीत. ख्रिस्ती कालगणना वर्षांच्या सहा वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असा दाखला ते देतात. २५ डिसेंबरविषयीच्या मुद्यावर त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे-
ख्रिस्तजन्माचे बायबलमधील वर्णन त्यावेळी अनेक मेंढपाळ आपले कळप घेऊन शेतमाळावर वावरत होते असे सांगते. खरे तर डिसेंबरमध्ये पेलेस्टाईनमध्ये वादळी पावसाचे वातावरण असते. त्यामुळे त्या काळात मेंढपाळ आपल्या कळपांसह शेतावर असणे केवळ अशक्य आहे. म्हणून येशूचा जन्म हा ऑक्टोबरच्या प्रारंभी झाला. त्यावेळी तेथे उन्हाळा असतो. त्यामुळे सारे मेंढपाळ आपले कळप घेऊन शेतावरच वावरत असतात. मात्र २५ डिसेंबरला येशूचा जन्मदिन मानण्याची प्रथा सनाच्या चौथ्या शतकापासून रोममध्ये सुरू झाली व पुढे ख्रिस्ती जगतात ती जगभर रूढ झाली. नाताळच्या या सणात प्राचीन लोकसमूहांच्या विविध चालीरीती समाविष्ट झालेल्या दिसतात. ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या आणि धर्मांतराच्या वेळी विविध जमातींच्या चालीरीती नाताळ सणाच्या साजरीकरणात प्रचलित झाल्या.
या सणाला काही युरोपीय देशांत ‘युल’ म्हणतात. त्यादिवशी लाकडाचा ओंडका जाळून धूर निर्माण करतात. ही आनंद प्रकटीकरणाची प्रथा लिथुआनियामधून सुरू झाली असे सांगतात. युरोप खंडात सदैव कडाक्याची थंडी असल्याने घरात ऊबदार वातावरण राहण्यासाठी सदैव धुनी पेटविण्याची प्रथा आहे. प्रकाश म्हणजे ऊर्जा. ते आनंदाचे प्रतीक म्हणून नाताळचा सण हा दीपोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. बहुतेक देशांतून रस्त्यारस्त्यांवर लुकलुकणार्‍या दिव्यांची आरास केलेली असते. संपूर्ण गाव प्रकाशात न्हाऊन निघतो. मिणमिणत्या मेणबत्त्यांची नक्षीदार आरास करून दीपाराधना केली जाते. रंगीबेरंगी प्रकाशाचे झोत इतस्ततः झळाळत असलेले दिसतात. या सर्वांमधून दिव्यत्वाचा संदेश देणारे प्रकाशपर्व निर्माण केले जाते.
जर्मनीमधील आदिवासी हिरवाईला परमेश्‍वरी अंश मानतात. हिरवा रंग हा ईश्‍वरी अस्तित्व सांगणारा अशी त्यांची श्रद्धा आहे. खरे तर जगातील सर्वच आदिवासी समाजांत हिरवळीला देवत्व बहाल केलेले दिसते. त्यातूनच वृक्षपूजेची परंपरा पुढे आली. मानवी जीवन निसर्गाशी एकरूप झाले तरच आपला निभाव लागेल या भावनेने आदिम मानव निसर्गाशी एकरूप झाला. नाताळातील ख्रिसमस ट्री आणि हिरव्या गवताची सजावट या आदिम परंपरेशी नाते सांगते. सुरूच्या वंशावळीतील ख्रिसमस ट्री अन्य देशांप्रमाणे आपल्या गोव्यातही पाहायला मिळते. सफरचंदाच्या झाडावर मिझलोत नावाचे बांडगूळ वाढते. त्या बांडगूळ वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती सदैव हिरवीगार दिसते. या वनस्पतीचा वापर नाताळच्या सजावटीत हमखास करतात. कारण काही देशांतून असाही समज आहे की या हिरव्यागार वनस्पतीच्या तोरणाखाली किंवा सजवटीच्या सान्निध्यात चुंबन घेणार्‍या प्रेमिकांचे प्रेम दृढ आणि अतूट बनते. ही प्रथा सेल्टिक वंशातील लोकांपासून सुरू झाली.
या सणाच्या निमित्ताने परस्परांना भेटवस्तू आणि खाऊ वाटण्याची परंपरा जगभर दिसते. गोव्यातील ख्रिस्ती बांधव सान्नां आणि नेवर्‍यो (करंज्या) हे पारंपरिक गोडधोड पदार्थ शेजार्‍यांना देत असतात. मात्र इटलीमध्ये ६ जानेवारीला सर्व इष्टमित्रांकडे अशा भेटवस्तू पाठविण्याची प्रथा आहे. ही प्रथा सुरू होण्यामागे एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगतात. पूर्वेकडील राजांनी बाळ येशूसाठी तीन भेटी पाठविल्या. स्पेनमध्ये राजे लोकांकडून साजर्‍या केल्या जाणार्‍या सणासुदीला तीन राजे घोड्यावर बसून बालकांना खाऊ वाटतात. स्पेनमध्ये ५ जानेवारीच्या रात्री सर्व मुले आपापल्या खिडकीपाशी घोटाळत असतात. ती खिडकीशी पायमोजे बांधून ठेवतात. कारण त्या रात्री घोड्यावर आरूढ झालेले तीन राजे पहाटप्रहरी पायमोज्यांत मुलांसाठी खाऊ ठेवून जातात. त्यात गमतीदार खेळण्यांचाही समावेश असतो. काही मुले चिठ्‌ठ्या लिहून आपली आवड राजांना कळवितात. त्यानुसार राजे त्यांना वस्तू भेट देतात. रेईश मागूश, कांसावली आणि चांदर येथे साजरे होणारे ‘तीन रायांचे फेस्त’ या परंपरेशी जुळणारे वाटते. शिवाय जगप्रसिद्ध सांताक्लॉजही या निमित्ताने प्रकर्षाने आठवतो. स्पेनमधील आणखी काही परंपरा सांगण्यासारख्या आहेत. तेथे २४ डिसेंबरच्या रात्री कोंबड्याचे मांस शिजवून त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात आणि पहाटेला प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातात. सुरळीत वाहतुकीसाठी सदैव झटणार्‍या वाहतूक पोलिसांना ख्रिसमसच्या मध्यरात्री दारूच्या बाटल्या भेट देण्यात येतात.
‘ख्रिसमस ट्री’ला कंदील लटकावून प्रकाशमान करण्याची प्रथा मार्टिन ल्युथरने जर्मनीमध्ये सुरू केली. पुढे जर्मनीमधून ती व्हिक्टोरिया राणीच्या काळात इंग्लंडमध्ये शिरली व रूढ झाली. नाताळ सणातील सप्ताहात गोरगरिबांसाठी विविध खेळ, झाडांच्या फांद्यांना भेटवस्तू लटकावतात. नक्षत्रे, बाहुल्या, खेळणी, फुले, फळे, पताका, फुगे आणि अन्य कित्येक वस्तूंचा ख्रिसमस ट्रीमध्ये समावेश असतो. आनंदी वातावरणाचा तो केंद्रबिंदू असतो. त्या ख्रिसमस ट्रीभोवती मुले-बाळे जमतात आणि सांताबाबा त्यांना खाऊ व खेळणी वाटून आनंदित करतो. सांताक्लॉजची कथादेखील खूप महत्त्वाची. सांताक्लॉज हा खरे तर सांताबाबा किंवा आजोबा म्हणून ओळखला जातो. ख्रिस्तजन्माच्या तीनशे वर्षांनंतर जन्मलेला निकोलस बिशप म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या दयाळू आणि आनंदी वृत्तीमुळे त्याला लोक आनंदयात्री म्हणू लागले. पुढे तो सांता निकोलस झाला आणि पुढे सांताक्लॉज म्हणून सर्वपरिचित झाला. त्या जुन्या काळी गोव्यात त्याला ज्याकी तीव या नावाने ओळखत असत. त्याचा वेश म्हणजे स्वच्छ घुतलेला शुभ्र आणि लाल रंगाचा पायघोळ डगला. त्याच्या दयाळू वृत्तीमुळे तो सर्वांचा आवडता झाला. म्हणूनच त्याला दर्यावर्दींचा, पाववाल्यांचा, दुकानदारांचा, पर्यटकांचा आणि बालकांचा पोशिंदा किंवा तारणहार मानतात. रोममधील ख्रिसमसची महती सांगताना असे सांगितले जाते की तेथे राजेशाहीच्या काळात राजे आणि अधिकारी लोक ख्रिसमसच्या दिवसांत आपल्या गुलाम शिपायांची सेवा करून त्यांना अन्न-वस्त्र देऊन सन्मानित करीत.
जगभरात नाताळचा सण थोड्याफार फरकाने सारखाच साजरा केला जातो. त्यात संगीताचा वापर आवर्जून असतो. ख्रिस्तजीवनावर आधारित कॅरोलगायने सर्वत्र केली जातात. ही परंपरादेखील चौथ्या शतकापासून रोममध्ये सुरू झाली. ख्रिस्त जन्माच्या वेळी ईश्‍वराने बेथलेहेममध्ये पाठविलेल्या प्रकाशमान नक्षत्राची आठवण म्हणून या सणात नक्षत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसतो. ग्रिटिंग कार्ड किंवा भेटकार्ड पाठविण्याची प्रथा या नाताळ सणाच्या निमित्ताने सुरू झाली. या भेटकार्डांवर ख्रिस्ती धर्मातील विविध खुणा, सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, नक्षत्रे, क्रॉस, शुभ्र कबुतर यांचा समावेश असतो. आता सर्वत्र व्यावसायिक भेटकार्डांची पद्धत सुरू आहे. असे पहिले व्यावसायिक भेटकार्ड सर हेन्री कोल यांनी लंडनमध्ये इ.स. १८४३ मध्ये तयार केले असे भेटकार्डांचा इतिहास सांगतो. आताच्या जमान्यात ई-कार्डांची चलती आहे.
गोव्यातील नाताळ हा जगात साजर्‍या होणार्‍या नाताळ सणाची प्रतिकृती आहे. येथे अपवाद तो फक्त येथील पारंपरिक खाद्यपदार्थांचा. प्रत्येक चर्चमध्ये होणारी मध्यरात्रीची प्रार्थनासभा आणि त्यानंतर होणार्‍या मासमधून कथन केला जाणारा येशूच्या समर्पित जीवनाचा संदेश हा इथल्या ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा. बहुतेक घरातून ख्रिसमस ट्रीची सजावट, दिव्यांची आरास, गोठ्यातील ख्रिस्तजन्माचा देखावा, कॅरोलगायने, सांताक्लॉजची धूम आणि परस्परांना दिल्या जाणार्‍या भेटवस्तू तसेच शुभेच्छा यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये सान्नां, नेवर्‍यो, दोदोल, वडे, पिनाग्र, दोस, बात, मीनां, करमळां, माणारे केक इत्यादींचा समावेश असतो. हा सण संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणतो. नात्या-नात्यांतील संबंधांना अधिक दृढ करतो. परस्परांतील प्रेम, सलोखा आणि सेवाभाव वाढीस लागावा म्हणून प्रेरणा देतो. या सर्व दृष्टीनी माणसाच्या जीवनातील सण, विधी, पर्व आणि उत्सव यांना प्रचंड महत्त्व आहे.
या सणातील एका प्रसंगी ज्युदेव समस्त मानव समाजाला स्वास्थ्य लाभो या हेतूने ‘शालोम’ असे उच्चारतो. शालोम म्हणजे चिरंतन स्वास्थ्य. हे स्वास्थ्य कुटुंबातील स्नेहभाव, सभोवतीची समृद्ध पिकावळ, आरोग्याची निरामयता आणि सेवाभावनेतून येत असते. तीच खरी गृहस्थी आणि समृद्धी. जे जे उज्ज्वल आणि मंगल ते ते सर्वांना आयुष्यात लाभो ही ‘शालोम’मागील भावना. तोच तर नाताळचा हेतू आणि संदेशदेखील. येशूच्या समर्पित जीवनपटाने प्रभावित झालेले विनोबा भावे एके ठिकाणी म्हणतात ः ‘ख्रिस्ताच्या जीवनाचे सार प्रेम आणि सेवाभाव होय. म्हणून माझी अशी उत्कट इच्छा आहे की उर्वरित आयुष्यात मी या परमोच्च आदर्शांचा पाठपुरावा करावा.’ हा आदर्श सर्वांच्याच आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरो हीच या नाताळच्या आनंदपर्वात प्रार्थना.
नक्षत्राचे तेजोवलय
ख्रिस्त म्हणजे जीवनाचा प्रकाश, ऊर्जा. तो अज्ञानाचा काळोख दूर करतो. त्याच्या जन्माने पृथ्वी आणि स्वर्गात आनंद झाला. ख्रिस्तजन्मावेळी परमेश्‍वराने नक्षत्रावाटे तेज दाखविले. म्हणून नाताळ सणात नक्षत्राला उच्च स्थान प्राप्त झाले. त्याचा संदर्भ देताना नक्षत्राच्या दर्शनाने माणूस अंतर्बाह्य प्रकाशमान होतो. त्याचे आयुष्य उजळून निघते.