प्रेक्षकांच्या अनुपस्थितीचा फायदा

0
151

>> विंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांचे मत

स्टेडियममधील पाठिराख्यांच्या अनुपस्थितीचा तसेच जवळपास दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर इंग्लंडचा संघ मैदानावर उतरण्याचा फायदा वेस्ट इंडीज संघाला होऊ शकतो, असे विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांना वाटते.

वेस्ट इंडीजचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. पुढील महिन्यात या मालिकेला सुरुवात होणार आहे. कॅलेंडर वर्षातील क्रिकेट मार्च महिन्याच्या मध्यावर स्थगित करण्यात आल्यानंतर होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. जैव सुरक्षित वातावरणात ही मालिका होणार असून प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही.

‘प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विंडीजच्या जिंकण्याची शक्यता वाढली असल्याचे वाटत नाही. दोन्ही संघ एकाच परिस्थितीतून गेले आहेत, असे सिमन्स यांनी विंडीज संघाचे प्रशिक्षण शिबिर असलेल्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगतले. ते पुढे म्हणाले की, प्रेक्षकांना प्रवेश दिला असता तर अंदाजे २० हजार जणांनी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावली असती.

त्यामुळे आमच्यावर अतिरिक्त दबाव आला असता. पण, आता रिक्त मैदानावर खेळण्याचा आम्हाला फायदाच होणार आहे. इंग्लंडचा संघ नजीकच्या काळात कोणत्याही दौर्‍यावर गेलेला नाही त्यांचे देशांतर्गत क्रिकेटही बंद आहे. दुसरीकडे कोरोनामुळे क्रिकेट थांबले तेव्हा आमचे स्थानिक क्रिकेट सुरूच होते. त्यामुळे याचा लाभ नक्की होणार आहे. कोरोना नसता तर आमचा संघ शिबिरातून दौर्‍यासाठी आला असता व एव्हाना इंग्लंडमधील देशांतर्गत मौसम अर्ध्यावर आला असता. आमची कसोटी मालिका पण सुरू असती. मागील वेळी वेस्ट इंडीजने कॅरेबियन भूमीवर इंग्लंडचा पराभव करत ‘विस्डेन ट्रॉफी’ जिंकली होती यावेळी त्यांनी मालिका बरोबरीत जरी सोडवली तरी ट्रॉफी त्यांच्याचकडे राहणार आहे.