प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर

0
159

या डासांना कुणी मारा हो!

डॉ. राजेंद्र साखरदांडे

डासांना कुणीतरी मारा म्हटल्यावर कुणी मारणार का? वर मारून मारून मारतील तरी किती…! हजारो.. लाखो.. कोट्यांनी डासांचे उत्पादन होत असते. तेही अंडी घातल्यावर दहा दिवसात… व त्यानंतर चारच दिवसात तो प्रजोत्पादन करायला तयार! डासांचे जीवनकाल फक्त जास्तीत जास्त एक महिना.
पोर्तुगीज काळापासून गोव्यात डासांचे प्रमाण वाढलेले आहे. तेव्हासुद्धा आमच्या लहानपणी धुराची गाडी संध्याकाळी ६-७ च्या दरम्यान पणजीत फिरायची… मग त्या परिसरात धूर…!
डांस चावतात… व चावत राहणार! पण चावणारा डास जर रोगाचे जंतु स्वतःबरोबर घेऊन चावत असेल तर धोका हा ठरलेला! गोव्यात कोकण रेल्वे आली. प्रगती करायची झाली तर रेल्वे यायलाच हवी, कारखाने हवेत. वर गोव्याचे नाव जगभर. गोव्यात जिवाची मुंबई करायला लोक येतात. रेल्वेबरोबर… सार्‍या भारतभरातील लोक रेल्वेने गोव्यात कामधंद्याकरता यायला लागले. कर्नाटकहून फळवाले, भाजीवाले, घरे बांधायला मजूर आले…मेसन आले. सुतार तर भारंभार आलेत. टाईल्स बसवणारे राजस्तानी लोक आलेत. ड्रायव्हर लोक उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेत. हल्लीच बंगालमधून सोनार पण यायला लागलेत. कामधंद्याकरता व मागणीनुसार लोक येणारच. हा भारत स्वतंत्र आहे, प्रजासत्ताक आहे. येताना आपल्या बरोबर त्या शहरांतले, गावांतले रोगही घेऊन आले.
एरवी गोव्याची संख्या ११ ते १२ लाख. त्यात ८-१० लाख लोक येऊन इथे झोपड्या बांधून राहिलेले. त्यात गोव्याचे नाव जगात प्रसिद्ध म्हटल्यावर १० ते १२ लाख टूरीस्टपण आले. त्यांनी आपल्याबरोबर एच.आय.व्ही.(एड्‌स) आणला व गोव्याच्या किनारी भागात पसरवून टाकलाय. आम्ही फक्त पर्यटनाच्या नकाशावर गोव्याचे नाव कोरू लागलो. नाना तर्‍हेचे रोग ज्यांची नावे आम्ही ऐकली ही नव्हती ते रोग गोव्यात यायला लागले.
मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जपानी एन्सेफेलायटीसची लागण गोवेकरांना होऊ लागली. कामगार लोकांनी झोपड्या बांधल्या. सहा महिन्यानंतर झोपड्यांची घरे झाली. याला राजकीय वरदहस्त होता यात तिळमात्र संदेह नव्हता. झोपडपट्‌ट्या वाढू लागल्या. रोगांचे प्रमाण वाढू लागले. सरकार दरबारी काथ्याकूट व्हायला लागलेत. दरमहा रिपोर्ट सरकारदरबारी जायला लागले. गोव्यात मलेरियाचे रोगी ८०% बाहेरचे… फक्त २०% गोवेकरी. आम्ही खुश… अहो राव, हेतुपुरस्सर आम्हाला खोटी माहिती दिली गेली. सहा महिन्यांनंतर गोव्यात झोपडी बांधलेला माणूस गोवेकरी झाला होता. अशाने काय होणार!!
टोपलीखाली झाकलेला कोंबडा पहाट झाल्यावर आरवणारच. तसेच झाले. कामगार लोकांनी आपल्याबरोबर रोगही आणले. पहिल्यांदा आम्हास डांस चावायचे, पण आम्हास कधी रोग झाला नव्हता. ऍनॉफेलीन स्टिफेन्ली डांस चावला. आपल्याला मलेरिया झाला. तो जर व्हायव्हॅक्स मलेरिया असेल तर मरण चुकले. तो जर फाल्सीपेरम असेल तर मरण ठरलेले. मरणाचा दर ५०%. मरणाचे प्रमाण शेकडा ५०. त्यात जर तुम्हाला मधुमेह, उच्चरक्तदाब असेल तर तुम्ही मरणारच.
माझे चुलते पणजीला मीरामारच्या महामार्गावर १४ व्या मजल्यावर राहायचे. त्यांना मधुमेह होता, रक्तदाब होता… फक्त दीड दिवसात ते कोमात जाऊन मरण पावले… व आम्ही काहीही करू शकलो नाही. आपले आरोग्य आपण राखावे! मग सरकारने काय करावे? प्रत्येक माणसाला स्वतःचे आरोग्य चांगले असावे, रहावे हा त्याचा मूलभूत हक्क आहे व भारतीय संविधानाने तो दिलाय. मग सरकारने फक्त झोपा काढाव्या? प्रत्येक नागरिकाचे आरोग्य राखणे हे त्यांचे कर्तव्य नाही का? सरकार मूग गिळून चूपचाप बसलेले आहे. डेंग्यू हा इथला आजार फक्त डेंग्यू फिवरच आहे. तो जर डेंग्यू हेमोरेजिक फिवर असेल तर मरण हे ठरलेले आहे. तेव्हा सरकारी आरोग्य खात्यावर विसंबून न राहता स्वतःचा बचाव करा.
८ जुलैच्या आयुषच्या अंकातील लेखात मी सविस्तर लिहिले आहे ः-
* डेंग्यूचे डांस एड्‌स इजिप्ती हा डांस दिवसाढवळ्या चावतो. ऑफिसात, घरात, शाळेत हे डांस सापडतात. अंगभर कपडे घाला. हाता-पायांवर ओडोमास लावा. निलगिरी ऑइलपण लावा.
* घराचे दरवाजे संध्याकाळी ५ वा. बंद करा. थोडे पैसे स्वतःवर खर्च करा. डासांना तुम्हाला चावू देऊ नका. रोगी डांस एका चाव्याबरोबर तुम्हास रोगी करून जाईल. पांच-सहा वर्षांपूर्वी डेंग्यू या रोगाचे नांव गोव्यात तर कुणीही ऐकले नव्हते. पस्तीस वर्षांपूर्वी हा रोग दिल्लीला होता. डेंग्यूचा व्हायरस आज गोव्यात आपले हातपाय पसरून चांगलाच झोप काढतोय. तेव्हा सावध रहा, रात्र वैर्‍याची आहे!
औद्योगिक प्रगती ही आम्हाला हवीच… त्याचबरोबर त्याच्या बरोबरीने येणार्‍या रोगांनाही आम्ही सामोरे जायलाच हवे. गोव्याचे आरोग्य राखायचे असेल तर आरोग्य रक्षकांची संख्या वाढवणे हे उद्दिष्ट समोर ठेवणे बरोबर नाही. गोवा हे छोटेसे राज्य आहे. इथे सबसेंटर गावांगावांत, प्रत्येक ८००० लोकसंख्येला एक असे प्रमाण आहे. त्यावर आरोग्यरक्षकांची संख्या वाढलेली आहे. ते लोक आपले इच्छित काम करतात कां? यावर आरोग्य खात्यातील अधिकारी वर्ग भाष्य करेल कां?
पावसाळा आला म्हटल्यावर आरोग्यावर भाषणे ठोकणारे… राहिलेले नऊ महिने चूप राहिलेले मी बघितलेयत्. त्या वादांत आम्ही शिरू नये. सरकाराची कर्तव्ये आहेत ती ते बजावत आहेत की नाहीत हे बघणे आपले कर्तव्य आहे. आमची स्वतःची कर्तव्ये आम्ही पाळली पाहिजेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी वाहणे हे आपले प्राथमिक कर्तव्य असायला हवे. सरकारी कर्मचारी वर्गांना सहकार्य करणे… त्यांना योग्य ती माहिती देणे!
सर्व सरकारी इस्पितळे आरोग्य खात्याला आपले महिनाभराचे रिपोर्टस् देतात. शहरात, गावात खाजगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांकडे हे कर्मचारी जातात कां? त्यांच्याकडून ते रिपोर्टस् घेतात का? शहरात, गावांत कितीतरी प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे महिन्याकाठी ही लोकं रिपोर्टस् आणायला जातात कां?
सरकार दरबारी चालणार्‍या आरोग्यविषयक योजना, त्या डॉक्टरलोकांना माहित झाल्या आहेत का? उदाहरणार्थ शहरात जर काविळ, हगवणच्या केसेस वाढल्या तर खाते त्यावर नजर ठेऊन असते का? रॅन्डम सॅम्पल चेकिंग होते का? शहरात, गावात फास्ट फूडची दुकाने जोरात चालू आहेत! त्यांनी लाइसेन्स काढली आहेत का? आरोग्य खात्यातील सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यावर नजर ठेऊन आहेत का? त्यावर कारवाई कोण करतो? ग्रामपंचायत, नगरपालिका, की आरोग्य खाते? विचार करा. शहरात लाइसन्स काढणारे फक्त १० टक्के आहेत. राहिलेले चिरीमिरी देणारे आहेत. मग लोकांचे आरोग्य कोण सांभाळणार? सरकारवर विसंबून राहू नका. त्यांना बरीच कामे आहेत. बायका-पोरे बिकिनी घालून फिरतात, की साड्या घालून यावर नजर ठेवून आहे सरकार… वेळ मिळाला तर तुमच्या आरोग्यावर विचार करू. रोग वाढले तर पर्वा नाही. मोठमोठाली हॉस्पिटल्स पूर्वीच्या सरकारनी बांधून ठेवलीत व आताचे सरकारही बांधणार आहे… पेडणेला… सुसज्ज हॉस्पिटल बांधणार.. ‘‘पायाभरणी’’ झालेली आहे. ‘‘हेल्थ फॉर ऑल’’ म्हणण्यापेक्षा ‘‘हॉस्पिटल फॉर ऑल’’.
तर मंडळी स्वतःचे आरोग्य सांभाळा-
* पाऊस दाटीने कोसळतोय. आता फैलाव होणार तो मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, मेंदूज्वर यांचा!
* डासांना तुम्हाला चावू देऊ नका.
* ताप आला तर डॉक्टरांना भेटा.
* अंगावर लाल चट्टे… व ताप आला तर याद राखा… डेंग्यू असु शकेल. रक्त तपासा.
* तापात फिट आली तर सरळ पणजीला जीएम्‌सीत चला. मध्ये अडकलात तर मरून जाल.
* लहान मुले, म्हातारे… दररोज गोळ्या घेणारे रोगी यांना सांभाळा. स्वतःला सांभाळा, त्याचबरोबर स्वतःच्या नातेवाईक, शेजारी यांना पण सांभाळा.
गतिरोधकावरून पडून मरणारे मरून जातात. त्यानंतरच गतिरोधक खणले जातात… रोगाने आम्ही मरू तर लोक खड्डे खणून आम्हाला पुरून जातील.
वर सांगितलेल्या रोंगांविषयी लिहिणे मी योग्य समजत नाही. योग्य मार्गदर्शन करणे मला आवडेल. मंडळी आपण हे सदर वाचता… वाचक मला पत्र लिहून कळवतात. मी त्यांचा ऋणी आहे. मी काही वावगे लिहिले असेल तर माफी असावी.
लोभ असावा… भेटू पुन्हा मंगळवारी! स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका.