प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – बाळाची काळजी

0
918

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

(भाग-२)

‘‘बाळाच्या काळजीचे पाल्हाळ एवढे लांबलेय’’, खरेच तुम्हास तसे वाटतेय! बाळाची लहानपणीच अत्यंत काळजी घेणे जरुरीचे असते. आता यावर एक उदाहरणच समोर ठेवतो.

‘‘परवा एक जोडपे आपल्या पहिल्या-वहिल्या वीस दिवसांच्या तान्ह्या सोनुल्याला माझ्याकडे घेऊन आले- सोनुल्याच्या कानातून पू वाहत होता. भलतीच थंडी भरली होती त्याला. सोनुला कुठे बाहेर फिरायला गेला होता का? नाही नां, मग त्याला विकार कुठून आला? तर प्रत्यक्ष त्याच्या आईकडून. आईला पडसे झाले, नाक गळायला लागले.. खोकला झाला.. ती काही डॉक्टरकडे गेली नाही. तिच्यापासून थंडीचे जंतू बाळापर्यंत पोहोचले. त्याचे नाक गळायला लागले.. थंडी कानातून वाहायला लागली. घरातील लोक म्हणायला लागले.. बाळ आईचे दूध पितो ना.. दुधातून गेली असणार! असे नसते. पडशाचे जंतू हवेवाटे पसरतात. आईने बाळाला दूध पाजताना नाकातोंडावर रुमाल बांधणे गरजेचे असते. घरातल्या कुणालाही कोणताही आजार झाला असेल तर बाळाला त्याच्याकडे देऊ नका. आईने स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. हात-पाय साफ केल्यानंतरच बाळाला त्यांच्याकडे द्या. नाहीतर घाणेरडे कपडे, हात… बाळाला रोग देऊन जातील.आता बघा त्या बाळाच्या कानातून पू यायला लागला… याचा अर्थ कानाचा पडदा फाटूनच कान वाहू लागलाय. पोरगे पुढे मोठे झाल्यावर कानाने अधू तर होणार नाही ना? साधी गोष्ट पण त्याने पुढे त्या मुलाला जन्माची व्याधी लागली ना? तसे करू नका!!
लहान मूल दिवसाचे दोन तास रडते. वयाबरोबर रडण्याचे तास वाढतात.. मग ८-१० आठवड्यानंतर मूळचे रडणे कमी होत जाते.
मुलाला पाठीवर झोपवावे. जवळ उशी, चादर, अभ्रे असू नये. कारण त्यात मूल गुदमरून मरू शकते. त्याला आपण ‘र्डीववशप खपषरपीं ऊशरींह डूपवीेाश’ असे म्हणतो. केव्हा केव्हा मूल झोपेत निरनिराळे आवाज काढते. तेव्हा चेक करा मुलाचे नाक बंद झालेले असते.. ते साफ करा.
मुलावर लक्ष द्या. काही लक्षणे धोक्याची असतात.
१) घरघर आवाज येणे, २) नाकाची जोरदार हालचाल होणे, ३) छाती भार पडल्यागत होणे, ४) मुलाचा श्‍वासोच्छ्वास जोरात चालणे. ५) छातीतून घरघर आवाज येणे. अशावेळी डॉक्टरी सल्ला घ्या. न्यूमोनिया होऊ शकतो.
मुलाचा आहार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मुलाला आईचे दूध पाजणे जरुरी आहे. जन्माला आल्याबरोबर छातीला धरणे व सहा महिन्यापर्यंत व नंतरही दूध पाजणे हे प्रत्येक आईचे…मातेचे कर्तव्य आहे. तरीही मुलाला अंगावरचे दूध न पाजता इतर जनावरांचे दूध पाजण्यात येते. त्यांत पहिल्याप्रथम गाईचे, म्हशीचे, टोन दूध, होल दूध वगैरे.. गावात तर पहिल्या महिन्यातच बाळाला वेगळे दूध पाजतात कारण बाळाला दुसर्‍या दुधाची सवय लावायची असते.
भारतात याविषयावर परीक्षण केले गेले. त्यात खालील निष्कर्ष काढण्यात आले. मुलांना दिवसातून आठ वेळा तरी दूध पाजण्यात येते. त्यातले सहा वेळा अंगावरचे दूध तर दोन वेळा इतर दूध देण्यात येते. केवळ आईच्या तीन महिन्याच्या मुलाला इतर दूध देण्यात येते.
२८% गाईचे दूध, २८% टोन पॅकेट दूध, १६% म्हशीचे, फूल क्रीम पॅकेट दूध १४%, अशाच प्रकारे दूध देण्यात येते. ६१% मुलांना जनावरांचे दूध देण्यात येते.
त्या दुधात पाणी घालून पातळ करतात. कारण अंधश्रद्धा आहे की लहान मुलाला गाईचे, म्हशीचे दूध पचायला जड जाते. एक लीटर दुधात २०० मिलि पाणी मिसळले जाते. अशाने मुलाला योग्य प्रमाणात, योग्य दूध मिळत नाही. मिसळलेले पाणी स्वच्छ असते का? पहिल्या महिन्यात दुधात साखर मिसळली जात नाही. दूध प्रत्येक वेळी जास्तीत जास्त वेळा तापवले तर त्यातले विटामिन्स कमी होत जातात.
दुधाविषयीचा सल्ला ऐका…
– पाश्‍चराईज्ड दूध साध्या दुधापेक्षा चांगले असते.
– दूध संपूर्णपणे गरम दिले पाहिजे.
– दूध व पाणी याचे परिमाण ३ः१ असे असावे व ते १-२ महिन्याच्या बालकाला पाजावे. त्यानंतर संपूर्ण दूधच मुलाला पाजावे.
– दूध चमच्याने पाजावे…, बाटलीने नव्हे!
मुलाला बाहेरचे दूध कां पाजतात?
– बाळंतपणानंतरच्या वीस तासात आईला पान्हा फुटला नसेल तर…
– बाळंतपणात आईला थकवा आल्यावर…
– जनावराचे दूध आईच्या दुधापेक्षा जास्त पौष्टिक आहे अशी समजूत आहे व ही गोष्ट एक पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोचवली जाते.
वाचकहो, आईचे दूध हेच बाळाला योग्य असते. काही कारणांमुळे आईचे दूध मुलाला मिळत नसेल तरच बाहेरचे दूध घ्यावे.
बाळाचे लसीकरण यावर आम्ही बोललो… बाळाचे व आईचे लसीकरण कार्ड आपल्याकडे असणारच. हल्ली ते कार्ड मोठे झालेय. त्यावर मुलाचा वेट-चार्ट पण आहे. काय हो, आयांनो म्हणजे मुलाच्या आयांनो, आपल्या मुलाचे.. जन्माच्या वेळचे वजन माहीत आहे कां?…
माहीत असायलाच हवे.. त्याची नोंद कार्डवर करा.. व दर वेळी जेव्हा जेव्हा वजन कराल तेव्हा त्याची नोंद करा म्हणजे बाळाची वाढ, त्याचा ग्राफ तुमच्या लक्षात येईल. आमच्या गोव्यात ३५% मुले कमी वजनाची होतात… त्यांचे वजन अडीच किलोच्या खाली असते. कां यावर आम्ही पुढे बोलूच.. तेव्हा कार्डवरच्या मुलाच्या ग्राफवरून तुम्हाला समजेल.. बाळाची वाढ चांगली चाललीय की नाही!
वयोमानाने बाळाचे चालणे, बोलणे… पोट घासत पुढे येणे.. हे बाळाचे आरोग्याचे लक्षण आहे. मुलाला नाना प्रकारचे लोक जन्मतःच असू शकतात. तेव्हा बाळाला डॉक्टरला दाखवा. त्यांचा सल्ला घ्या. कमी वजनाच्या मुलाची जोपासना करणे हे काम कठीण असते.
बाळाचा लघवी, संडास बरोबर होते आहे ना, यावर लक्ष ठेवा. आईच्या दुधावर पोसणार्‍या बाळास ५ ते ६ वेळा शौचास होते. लघवी बरोबर होत नसेल तर लिंगाची तपासणी करून घ्या.
बाळंतपणात आईला व तान्ह्या मुलाला चोपून तेल लावायची पद्धत अजूनही समाजात आपल्याला आढळते. ती योग्य आहे कां? या कामाकरता वेगळी बाई ठेवली जाते. पहिल्यांदा ती मातेला तेल मालीश करते. मग मुलाला.. केव्हा केव्हा मुलाच्या कानात, नाकातही तेलाचे थेंब सोडतात. हे सगळे करणे योग्य नव्हे.
मातेला मालीश करणे म्हणजे बाळंतपणात थकलेले स्नायू तयार करणे होय. गरोदरपणात व बाळंतपणात जर तुम्ही योग्य तो व्यायाम केलात तर या मालीशची गरज नाही. तान्ह्या बाळाला तर नाहीच नाही.
स्वच्छता राखा म्हणजे झाले. त्यात आईची व बालकाची योग्य निगा राखा. बालकाला कॉटनचे कपडे, सैल घाला. त्याच्या कातडीची योग्य काळजी घ्या.
आईने स्वतः डॉक्टरी सल्ल्यानुसार आहार करावा व विश्रांती घ्यावी. बाळाला डॉक्टरी सल्ल्यानुसार आहार द्यावा. तुमच्या घरात वडीलधार्‍या व्यक्ती असतील तर त्यांचा ही आदर करा पण सल्ला मात्र डॉक्टरांचाच माना… नाहीतर पश्‍चात्ताप करण्याची पाळी तुमच्यावर येईल…!!
जपा, स्वतःस व बाळालाही!!
………………………………………….