प्रासंगिक

0
197
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

माझा एक कॉलेजमधला मित्र होता. अतिशय विनोदी स्वभावाचा, कुचाळक्या. संधी मिळेल तेव्हा दुसर्‍याची चेष्टा-मस्करी करणं हाच उद्योग… अगदी चिंतातूर जंतूलाही हसवणारा असा महाभाग!

 

फार पूर्वीच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात करताना आपण ‘वन्स अपॉन अ टाईम’ अशी सुरुवात करतो व ती गोष्ट सांगतो. गोष्ट निश्‍चित केव्हा घडली ते आपण सांगू शकत नाही. अशा काळाची गणना ‘केव्हातरी-कधीतरी’ अशा वर्गात करतो. असल्या गोष्टी काही विशेष प्रसंगांवर किंवा घटनांवर आधारलेल्या असतात; मी त्यांना ‘प्रासंगिक’ असं म्हणतो. विनोदाचासुद्धा प्रासंगिक विनोद असा प्रकार आहे. प्रसंगच असा असतो किंवा घडतो की तो ऐकून आपली पोटभर हसून करमणूक होते, मग ती क्षणिक का असेना! आपल्याही आठवणींच्या पोतडीत अशा काही प्रासंगिक गोष्टी असतात, फार पूर्वीच्या नसतील पण जुन्या; ‘एक दिवस काय मजा झाली’ असं म्हणून सांगायच्या अशा! ज्याला थोडी विनोदबुद्धी असते त्यानं त्या खुलवून-खुलवून सांगितल्या तर ऐकण्यात मज्जाच मज्जा असते. असा एक मजेशीर प्रसंग घडला…

माझा एक कॉलेजमधला मित्र होता. मित्र म्हणजे वर्गबंधू. अतिशय विनोदी स्वभावाचा, कुचाळक्या. संधी मिळेल तेव्हा दुसर्‍याची चेष्टा-मस्करी करणं हाच उद्योग… अगदी चिंतातूर जंतूलाही हसवणारा असा महाभाग!

वेळ सायंकाळची, पाचच्या दरम्यानची. आमचं कॉलेज सुटलं होतं. आम्ही सर्वजण घोळक्या-घोळक्यांनी कॉलेजमधून बाहेर पडत होतो. कॉलेजच्या कॅम्पसमधून मुख्य रस्त्याकडे जायला एक आडवाट होती. आम्ही सहसा त्याच आडवाटेनं जायचो. आजही चाललो होतो. त्या आडवाटेच्या दोन्ही बाजूना थोडी झाडंझुडपं वाढलेली होती. पावसाळा नुकताच संपला होता, त्यामुळे त्यांची छाटणी अजून झाली नव्हती. रमत-गमत चालताना माझा हा टवाळक्या मित्र जोरजोरानं ओरडायला लागला. ओरडणं कसलं, चक्क किंचाळायला लागला. आपल्या पॅन्टमध्ये कोणतरी शिरलं आहे असं म्हणून उड्याही मारू लागला. आम्हाला त्याची मजा वाटली. रोजच्यासारखी याची ही काहीतरी खोडी असावी असंच आम्हा सर्वांना वाटलं म्हणून कोणी तो प्रकार गांभीर्याने घेतला नाही; वर हसण्यावारीच नेला! पॅन्टीत जाणार कोण? एखादं झुरळ किंवा माशी. पण त्यानं आपल्या गुडघ्याच्या वर पॅन्ट हातानं दाबून धरली व कोणतरी ओरबाडतंय म्हणून जेव्हा ओरडायला लागला तेव्हा मात्र त्याची पॅन्ट सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. आतापर्यंत त्यानं कुचाळकेपणाने अनेकांच्या पॅन्टी सैल केल्या होत्या; आज मात्र देवानं त्याची पॅन्ट सोडण्याची पाळी आमच्यावर आणली! बघितलं तर मुलींचे घोळके पण आमच्या मागून येत होते. आता पॅन्ट सोडायची कशी? शेवटी नाईलाज म्हणून आम्ही सर्वांनी त्याच्याभोवती आमची मानवीभिंत उभी केली व एकदाची पॅन्ट सोडली. बघतो तर काय? एक छोटा सरडा जिवाच्या आकांताने पॅन्टीतून बाहेर पडून बाजूच्या झुडपात शिरला तेव्हा आम्हाला कळलं की याच्या पॅन्टीत झुरळ किंवा माशी नसून सरडा शिरला होता.

आम्ही सर्वजण रमत-गमत चाललो असताना वाटेवरच्या एका बाजूच्या झुडपातून दुसर्‍या बाजूूच्या झुडपाकडे जाणारा तो सरडा नेमका याच्या पायात आला असावा व त्याने भिऊन आसरा घेतला तो त्याच्या पायावरून तडक त्याच्या पॅन्टीचा! आम्ही त्या सरड्याची व त्याची अरिष्टातून सुटका केली. कधीच न ऐकलेली अशी गोष्ट प्रत्यक्षात पाहायला मिळाली म्हणून आम्ही पोटभर हसलो. छोट्याशा सरड्यानं मित्राला अद्दल घडवली. एक गोष्ट बरी झाली, आमच्या मागून येणार्‍या मुलींना हा सगळा प्रकार कळला नाही व त्याची इज्जत वाचली; नपेक्षा गोष्ट कॉलेजभर झाली असती. ज्या-ज्या वेळी तो कोणावर कॉमेन्ट करणार त्या-त्या वेळी ‘अरे धडा मिळाला, पॅन्टीमध्ये सरडा घुसला’ असं म्हणायला चान्स मिळाला असता. त्याचं तोंड बंद करायला हातात आयतंच कोलीत मिळालं असतं. एक आश्‍चर्य मात्र होऊन राहिलं, ते म्हणजे, सरडा त्यालाच नेमका शोधायला कसा आला?

असेच एक मनुष्य होते. विनोदी स्वभावाचे व हजरजबाबी. बोलण्यात पटाईत. हसणं व हसवणं हाच स्वभाव. कोणाला भेटले, कोणाशी बोलले तर त्याला हसवलं नाही तरच नवल! असला स्वभाव सर्वसाधारणपणे सर्वांना प्राप्त होत नाही, तो अभावानेच दिसतो. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ असं म्हणायला सोपं, पण त्यासाठी हसवणारे लागतात. गृहस्थ एका ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवायचे. ‘हसत-खेळत’ म्हणतात ना तसे शिकवायचे. त्यामुळे शिक्षणार्थी खूश व्हायचे. ते सेवानिवृत्त झाले म्हणून काही घरी गप्प बसणार्‍यांपैकी नव्हते. काहीतरी करावं म्हणून लाईफ इन्शुरन्सची एजन्सी घेतली. बोलण्यात पटाईत व लोकसंग्रह चांगला असेल तर ते लोक असल्या व्यवसायात चमकतात. वेगवेगळ्या नामांकित ऑफिसमधला पगारदारवर्ग हा त्यांनी आपला टार्गेट ग्रूप ठरवला व कर्मचार्‍यांना भेटणं सुरू केलं. असल्या व्यवसायासाठी ही हमखास स्थळं असतात. दहाजणांना ‘गळ’ घातली तर एकटा तरी गळाला लागतोच. एक दिवस ते आमच्या ऑफिसमध्ये टपकले. मॅनेजर ओळखीचे, त्यामुळे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यांच्या स्वभावाची महती ऑफिसमध्ये बहुतेकांना माहीत होती. वेळ सायंकाळची- ऑफिस जवळ जवळ बंद व्हायच्या वेळेची. त्यामुळे कोणाशी चार शब्द बोलले तर कामकाजावर परिणाम किंवा अडचण होईल असं नव्हतं. कर्मचार्‍यांवरून नजर फिरवताना कर्मधर्मसंयोगाने त्यांना एक महिला कर्मचारी साधारणशी तोंडओळखीची सापडली. तिला मॅनेजरच्या केबिनमध्ये बोलावून विम्याविषयी माहिती दिली. एक चांगला परतावा देणारी पॉलिसी घ्यायची गळ पण घातली. ती म्हणाली, ‘गुंतवणुकीचे सर्व निर्णय मी माझ्या मिस्टरांना विचारूनच घेते. त्यांना विचारून तुम्हाला काय ते सांगते’ असं म्हणून ती आपल्या जागेकडे जायला वळली. त्याच वेळी ते गृहस्थ अर्ध तोंडात, अर्ध बाहेर असं काहीतरी पुटपुटल्यागत बोलले. पण नेमकं काय बोलले हे तिच्या किंवा इतर कोणाच्या लक्षात आलं नाही. ऐकलं ते फक्त मॅनेजरनी. ऑफिस बंद व्हायची वेळ झालीच होती. ‘बरं येतो’ असं म्हणून ते बाहेर पडले व निघून गेले. ते गेल्यावर सर्वांना आश्‍चर्य वाटलं की एकही विनोद न करता ते कसे काय निघून गेले? त्यावर मॅनेजर म्हणाले, ‘विनोद केला नाही असं कसं होईल? तुम्ही ऐकलं काय तर? ‘मी मिस्टरांना विचारून काय ते सांगते’ असं जेव्हा हिनं सांगितलं तेव्हा म्हणाले- ‘विचार, जरूर विचार. पण मिस्टरांना जास्त ‘प्रेस’ करू नकोस. कारण तो (?) अधिकार त्यांचा!’’

हे ऐकताच ऑफिसमध्ये हशा पिकला. त्यांच्या स्वभावविशेषाची एक झलक दिसली!