प्रायोगिक तत्त्वावरील पहिल्या इलेक्ट्रीक बसचा शुभारंभ

0
68

राज्यातील पहिल्या इलेक्ट्रीक बसगाडीचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पणजी कदंब बसस्थानकावर काल करण्यात आले आहे.
यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा व इतर मान्यवर उपस्थित होते. कदंब महामंडळातर्फे दीड महिना ही बसगाडी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. हैदराबाद येथील गोल्डस्टोन इन्फ्रोटेक कंपनीने ही बसगाडी कदंब महामंडळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी उपलब्ध केली आहे. या बसगाडीची किंमत २.४५ कोटी रूपये एवढी आहे.

बसगाडीची बॅटरी एकदा पूर्ण विद्युतभारीत केल्यानंतर बसगाडी सुमारे २५० ते ३०० किलोमीटर चालते. बसगाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. या कंपनीच्या हिमाचल प्रदेशमध्ये २५ बसगाड्या आणि मुंबईत ६ बसगाड्या प्रवासी सेवेत कार्यरत आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली. बसगाडीच्या उद्घाटननंतर मुखमंत्री पर्रीकर, वाहतूक मंत्री ढवळीकर यांनी बसगाडीतून पणजी ते बांबोळी आणि परत असा फेरफटका मारला. सरकार पर्यावरणपूरक हरीत बसगाड्यांना प्राधान्य देणार आहे. आगामी काळात ५० ते १०० हरीत बसगाड्या चालविण्याचा विचार आहे. हरीत बसगाड्याची खरेदी केली जाणार नाही. तर खासगी कंपन्यांना प्रति किलो मीटरप्रमाणे दर निश्‍चित करून दिला जाणार आहे. हरीत बससाठी अद्यापपर्यत दर निश्‍चित करण्यात आलेला नाही. या बसगाड्यांवर गोमंतकीय चालकांची नियुक्ती करण्याची सूचना केली जाणार आहे. स्थानिक चालकांना बसगाड्या चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची अट घातली जाणार आहे. बायो गॅस, इलेक्ट्रीकवरील आधारीत बसगाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

कदंब महामंडळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आलेली बायो गॅसवर चालणार्‍या हरीत बसगाडीचा शुभारंभ १० फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे. बायो गॅसवर चालणारी बसगाडीसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागली. ही गाडी चालविण्यासाठी परवाना नसल्याने मागील सहा महिने हरीत बसगाडी कदंब महामंडळाच्या पर्वरी येथील डेपोमध्ये आहे.

दाबोळी विमानतळावरील कदंबच्या बसगाड्याची संख्या वाढविण्यात आली आहे. सध्या चार बसगाड्या दाबोळी ते कळंगुट दरम्यान प्रवासी वाहतूक करीत आहेत. कळंगुट, कांदोळी येथे पर्यटकांच्या सोयीसाठी पीकअप पॉईंट सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी दिली.
कुजिरा बांबोळी येथील शैक्षणिक संकुलातील विद्यालयाच्या मुलांची वाहतूक करण्यासाठी कदंब महामंडळाने नवीन १५ मिनी बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत. या बसगाड्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर, उद्योगपती श्रीनिवास धेंपेे, आमदार टोनी फर्नांडीस व इतरांची उपस्थिती होती.
पणजी व आसपासच्या भागातून कुजिरा येथे जाणार्‍या मुलांच्या सोयीसाठी नव्या बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुलांच्या वाहतुकीसाठी १५ गाड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या बसगाड्या अपुर्‍या पडू लागल्याने आणखीन मिनी बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे आल्मेदा यांनी सांगितले.