प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत समितीच्या शिफारशी स्वीकारा

0
128

>> माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो

राज्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

राज्य सरकारने २००६ मध्ये प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली होती. या समितीने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. मागील दहा वर्षांत या शिफारशींच्या योग्य अंमलबजावणीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. सरकारी प्राथमिक शाळेत एक शिक्षकांची नियुक्ती करू नये, एका शाळेत कमीत कमी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. राज्यात अनेक शाळांत एक शिक्षक कार्यरत असल्याने विद्यादानावर परिणाम होतो, असे फालेरो यांनी सांगितले.

प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम मराठी, कोकणी असले पाहिजे. डायोसेसन संस्थांनी प्राथमिक स्तरावरील इंग्रजी माध्यमातून शिक्षण बंद करून कोकणी, मराठीतून शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे. शिक्षण खात्याने रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरित भरण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षकांना शिक्षणबाह्य कामात गुंतवू नये, असेही फालेरो यांनी सांगितले.

विधानसभा संकुलात गोवा मुक्तीलढ्यात योगदान दिलेल्या नेत्यांची तैलचित्रे, छायाचित्रे लावण्याची मागणी धूळ खात पडली आहे. २०११ मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या तैलचित्राचे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अनावरण करण्यात आल्यानंतर २०१२ मध्ये आपण गोवा विधानसभेच्या सभापतींना एक पत्र पाठवून गोवा विधानसभेत गोवा मुक्तीलढ्यात सहभागी नेत्यांची तैलचित्रे, छायाचित्रे लावण्याची मागणी केली होती असेही माजी केंद्रीय मंत्री फालेरो यांनी सांगितले.