प्राजक्ताची फुले न निश्‍चय कधी ढळो…

0
1693
  • सचिन कांदोळकर

आत्मोद्धार आणि भक्तिभावाचा प्रसार ही मोरोपंतांच्या काव्याची प्रयोजनं होतीच, शिवाय ‘न निश्‍चय कधी ढळो’सारख्या केकांमधून त्यांना समाजात काही मूल्यंदेखील बिंबवायची होती. ‘केकावली’मधल्या मूल्यसंस्कार करणार्‍या अशा काही आवली म्हणजे पंक्ती कायम स्मरणात राहतील, यात संदेह नाही.

‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’, हे मोरोपंतांचं सुभाषित कानावर पडलं की सातवीच्या वर्गात अभ्यासलेली त्यांची ‘केकावली’ ही कविता मला आठवते. बालभारती पाठ्यपुस्तकातल्या मोरोपंतांच्या या कवितेचं पान अजूनही माझ्या डोळ्यांसमोर येतं. आम्ही शाळेत शिकत असताना मूल्यशिक्षण हा वेगळा विषय नव्हता. मराठी पाठ्यपुस्तकातल्या पाठांनी विशेषतः कवितांनी आमच्यामध्ये जी मूल्यं बिंबवली, त्यांची गणनाच करता येणार नाही. आमच्या सातवीच्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकामध्ये अतिशय समृद्ध असा काव्यविभाग होता. त्यात ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, नरहरी सोनार, मोरोपंत, कृष्णशास्त्री चिपळूणकर, चंद्रशेखर, कवी बी, बहिणाबाई चौधरी, अनिल, बा.सी. मर्ढेकर, बा.भ. बोरकर, पु.शि. रेगे, इंदिरा संत, ग.दि. माडगूळकर इत्यादींच्या कविता होत्या.
पाठ्यपुस्तकातल्या या कवींनी आमच्यावर वाङ्‌मयीन संस्कार केलेच. शिवाय आम्हाला भोवतालच्या जीवनाकडे पाहायला शिकवलं. पाठ्यपुस्तकातल्या कवितांमुळे लहानपणापासूनच ही अशी सुसंगती घडली अन् सुजन वाक्यं कानी पडली. गोमंतकातल्या आजच्या सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकात वरीलपैकी एकही कवी नाही!
सहावी-सातवीत असताना आम्हाला काही कविता कळल्या होत्या तर काही नुसत्याच तोंडपाठ झालेल्या होत्या. काही कविता अजिबात कळत नव्हत्या, पण त्यातल्या लयीमुळे आम्हाला त्या सोप्या वाटायच्या. आमच्या पाठ्यपुस्तकातल्या ‘केकावली’तील या केकादेखील त्या काळी कळल्या नव्हत्या.

दयाब्द वळशील तू, तरि न चातका सेवका
उणे किमपि, भाविका उबगशील तू देव का?
अनन्य-गतिका जना निरखिताचि सोपद्रवा
तुझेचि करूणार्णवा मन धरी उमोप द्रवा

यातले दयाब्द, किमपि, अनन्यगतिका, सोपद्रवा, करूणार्णवा, उमोप यांसारखे उमोप शब्द या केकावलीमध्ये आढळले पण त्यातले किमपि म्हणजे थोडेसुद्धा कळले नव्हते. कवितेच्या ‘केकावली’ या शीर्षकापासूनच कठीण शब्दांची मालिका सुरू झालेली होती. केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती, हे नंतर कळलं. मोरोपंतांनी स्वतःस मयूरपक्षी कल्पून ईश्‍वरास मारलेल्या हाका म्हणजेच केकावली हे काव्य. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’, हे याच काव्यातलं सुभाषित.
पुढे प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास अभ्यासताना मोरोपंतांविषयी बरंच काही वाचायला मिळालं. मोरोपंत हे पंडित कवींपैकी शेवटचे कवी. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी काव्यलेखनाला वाहिलेलं होतं. ते विद्वान कवी होते. त्यांचा काव्याच्या पूर्वपरंपरेचा दांडगा अभ्यास होता. संस्कृतातली बृहत् काव्य – अनावश्यक भाग काढून टाकून अन् त्यात आपली भर घालून – त्यांनी मराठीत आणली. त्यांनी आर्यावृत्तांत आख्यानं रचली. त्यांच्या आर्या किती लोकप्रिय झाल्या असतील हे या आर्येवरून लक्षात आलं – ‘सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंताची’. पुढे असंही वाचनात आलं की कळंगुटच्या माधव चंद्रोबा डुकले यांनी मोरोपंतांची कविता सर्वप्रथम ग्रंथरूपानं प्रसिद्ध केली. आत्मोद्धाराबरोबर लोकांमध्ये भक्तिभावाचा प्रसार करणं, हे मोरोपंतांच्या कवितेचं प्रयोजन होतंच, शिवाय त्यांना काव्यामध्येही भर घालायची होती. रस हा काव्याचा आत्मा आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘श्लोक केकावली’ हा त्यांच्या रसाळ अन् उत्कट काव्याचा एक नमुना म्हणावा लागेल. संस्कृत शब्द, समास इत्यादींमुळे त्यांचं काव्य दुर्बोध झालं आहे, अशी टीका केली जाते. पण काहीवेळा ते सोप्या शब्दांत लिहून जातात –
तुम्ही परम चांगले बहु-समर्थ दाते, असे
सु-दीन जन मी, तुला शरण आजि आलो, असे
पुन्हाहि कथितो, बरे श्रवण हे करा यास्तव
समक्ष किति आपुला सकळ-लोक-राया! स्तव!

‘वाटे चरित्र त्यांचे आपण काही तरावया गावे, ’ असं म्हणणार्‍या मोरोपंतांच्या भक्तिभावाचं दर्शन या काव्यात घडतं. परमेश्‍वराला दयाब्द, करूणार्णव अशी विशेषणं ते लावतात. त्याच्यावरील आपलं लक्ष ढळू नये म्हणून मागणं मागतात. ‘शरण आलियावरि न व्हा कधी वाकडे’ असं म्हणतात. सातवीत असताना ‘केकावली’मधल्या अशा काही केका कळत नव्हत्या.

म्हणा मज उताविळा, गणचि घेतला घाबरे
असो मन असेचि, बा भजक-बर्हि-मेघा! बरे
दिसे क्षणिक सर्व हे, भरवसा घडीचा कसे
धरील मन, आधिने बहु परिभ्रमे चाकसे

यातलं भजक-बर्हि-मेघा, आधिने, परिभ्रमे वगैरे काही कळत नव्हतं. पण तिकडे दुर्लक्ष करीत बरे-घाबरे, कसे-चाकसे अशी यमकं जुळवत आम्ही वर्गात मोठमोठ्यानं ही कविता म्हणत होतो. आमचाही टाहोच होता तो! या कवितेतून घनांबु, कुजन-विघ्न वगैरे कितीतरी अपरिचित शब्द येत होते. त्या काळात काही शब्द अगदीच कठीण वाटत होते. पण काही सोपे शब्द उगाच कठीण दिसत होते. ‘चाकसे’ हा शब्द किती सोपा आहे! चाकसे म्हणजे चाकाप्रमाणे! ‘केकावली’मध्ये असे शब्द येऊनही अर्थासाठी आम्ही कुठं अडून राहात नव्हतो. आम्ही आमच्या चालीत पुढे पुढे जात होतो. मोरोपंतांची यमकप्रियता तर सर्वश्रुत आहे. या कवितेमधल्या सेवका- देव का, सोपद्रवा- द्रवा, वाकडे- जीवांकडे, खरे- पाखरें, टळो- वळो, गळो- जळो. … अशा यमकांमुळेदेखील ही वेगळ्या प्रकारची कविता आम्हाला आवडली असावी.
मोरोपंतांचं ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ हे सुभाषित शाळेत जाण्यापूर्वी ऐकलं होतं. सातवीत गेलो. ‘केकावली’ ही कविता शिकलो. ही कविता म्हणजे सुभाषितांची मालिकाच होती…

न निश्‍चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो
न चित्त भजनी चळो, मति सदुक्त-मार्गी वळो
स्व-तत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोेधे जळो

आमच्या पाठ्यपुस्तकातल्या ‘केकावली’मधली ही शेवटची केका आजही आठवते अन् वाटू लागतं की आत्मोद्धार आणि भक्तिभावाचा प्रसार ही मोरोपंतांच्या काव्याची प्रयोजनं होतीच, शिवाय ‘न निश्‍चय कधी ढळो’सारख्या केकांमधून त्यांना समाजात काही मूल्यंदेखील बिंबवायची होती. ‘केकावली’मधल्या मूल्यसंस्कार करणार्‍या अशा काही आवली म्हणजे पंक्ती कायम स्मरणात राहतील, यात संदेह नाही.