प्राचीन काळापासून आजपर्यंत राजकारणातील महिलांचा (मर्यादित) दिग्विजय!

0
2338

– विष्णू सुर्या वाघ
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे स्थान काय हा जगभर चर्चिला जाणारा विषय आहे. पुराणकालापासून आजपर्यंत या विषयावर वैचारिक चर्वितचर्वण होत राहिले आहे, पण अमुकच एक उत्तर सापडलेले नाही. जगातल्या प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी, प्रकृती वेगळी, इतिहास वेगळा, चालीरीती वेगळ्या, मानसिकता वेगळी, परिस्थिती वेगळी. त्यामुळे प्रत्येक देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीचे स्थान हे सापेक्षच राहिले आहे. काही देशांत महिलांना पुरेसे स्वातंत्र्य आहे, तर काही देशांत त्यांना मुक्तपणे वावरण्याची कोणतीही मोकळीक नाही. केवळ आपल्या देशाचा विचार केला तरी लक्षात येते की भारतातल्या प्रत्येक राज्यात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तो एकसमान नाही. पुन्हा आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या जाती-जमाती आहेत त्यांच्यातही महिलांना एकसारखी वागणूक मिळत नाही. एकूणच हा विषय अत्यंत किचकट व काही वेळा अनाकलनीयतेच्या पातळीवर जाणारा असा आहे.राजकीय पातळीवर जगभरातील देशांमधली परिस्थिती न्याहाळली तर लक्षात येते की राजकारणात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान महिलांना कोणत्याही देशात दिले जात नाही. राजकारणाचे स्वरूप हे प्रामुख्याने पुरुषप्रधान राहिले आहे व भारतही त्याला अपवाद नाही. प्राचीन भारतात जे राजे-महाराजे-सम्राट-चक्रवर्ती होऊन गेले ते सर्व पुरुषच होते. केवळ अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या स्त्रीने राज्यकर्त्याची जबाबदारी पार पाडलेली आढळते.
प्राचीन भारतात अनेक गणराज्ये होती व त्यांचा कारभार स्वतंत्र होता. राजेशाहीभोवतीच त्यांचे राजकारण केंद्रित होते. हीच प्रथा नंतरच्या काळातही चालू राहिली. इसवी सन बाराव्या शतकानंतर अधूनमधून राज्यकारभाराची सूत्रे महिलांच्या हाती गेल्याचे आपण पाहतो. त्यापूर्वी नाथसंप्रदायाच्या काळात श्रृंगमुरूड या राज्याचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख आढळतो. हे राज्य म्हणे संपूर्णपणे बायकांचे होते. एकसुद्धा पुुरुष औषधालाही त्या राज्यात सापडत नसे. या नगरीची राणी मैनावती हिच्या मोहपाशात नाथसंप्रदायाचा संस्थापक मच्छिंद्रनाथ सापडतो व मग त्याला सोडवण्यासाठी त्याचा शिष्य असलेल्या गोरक्षनाथाला जावं लागतं अशी नाथसंप्रदायातली कहाणी आहे. पण तिची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्याचा कोणताही मार्ग आज शिल्लक नाही. काही शतकांनंतर मात्र रजिया सुल्ताना ही सम्राज्ञी दिल्लीच्या तख्यावर आरूढ झाली. १२०५ साली रझियाचा जन्म झाला. शमशुद्दीन इल्तुत्मिश हे गुलामवंशीय राजे दिल्लीचे सुलतान होते. त्यांंच्या मृत्यूनंतर १२३६ साली रजिया दिल्लीची सुलतान बनली. ती अत्यंत हुशार, चाणाक्ष, कार्यतत्पर व उत्तम प्रशासक होती. तिला फार काळ कारभार करता आला नाही. जेमतेेम तीन वर्षंच तिच्या हाती सत्ता होती. पण अल्पावधीतही उत्तम प्रशासनाच्या बळावर रझियाने आपले नाव इतिहासात कोरून ठेवले.
हिंदुस्तानची पहिली राणी
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच निष्णात लढवय्यी म्हणून रझियाने लौकिक प्राप्त केला. घोडेस्वारी, तलवारबाजी व तिरंदाजी यात ती प्रवीण होती. अनेक लढायांत ती पित्याच्या बरोबरीने सहभागी झाली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर तिचा मोठा भाऊ रूक्नुद्दिन फिरोझ तख्यावर बसला, पण लोकमत त्याच्या बाजूने नव्हते. याचा फायदा उठवत रशियाने लोकांच्या सहकार्याने त्याला पदच्युत केले व कारभार हाती घेतला. जमालुद्दिन याकूत या आफ्रिकन सिद्दी जवानावर तिचे प्रेम होते, पण या प्रेमाला विरोध करणारा भटिंडाचा उमराव मलीक अख्तियार उद्दिन अलतुनिया याने याकूतचा खून केला व रझियाला आपणाशी विवाह करण्यास भाग पाडले. मात्र या दरम्यान सत्तेवर आलेला तिचा भाऊ बेहराम यानेच अलतुनिया व रजियाला ठार केले.
महिला राज्यकर्तीचे दुसरे ठळक उदाहरण आहे राणी रुद्रम्मादेवीचे. इसवी सन १२७९ ते १२८९ या काळात दक्षिण भारतातल्या काकतीय राजवंशाची ती राणी होती. खरं तर ती राजा गणपतीदेवाची कन्या. पण गणपतीदेवाने पुत्रिका संस्कार नामक विधी करून तिला रीतसर आपला पुत्र म्हणून घोषित केले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तिने राजकारभाराची सूत्रे हाती घेतली. निडदवोळू संस्थानचा चालुक्यवंशीय राजपुत्र वीरभद्र याच्याशी तिचा विवाह झाला. वारंगळ येथील ऐतिहासिक किल्ला याच रुद्रम्माने बांधला होता. मार्को पोलो या प्रसिद्ध भ्रमंतीकाराने आपल्या साहित्यात या राणीचे वर्णन ‘न्यायप्रिय, शांतिप्रिय व समाजहितदक्ष’ या शब्दांत केले आहे.
क्षत्राणी दुर्गावती
इसवी सन १५२४ ते १५६४ या काळात गोंडवाना संस्थानची महाराणी असलेल्या दुर्गावतीचे नावही इतिहासात कोरले गेले आहे. दलपत शाह हा गोंडवानाचा राजा होता. दुर्गादेवी त्याची पत्नी. दलपत मरण पावला त्यावेळी त्यांचा पुत्र बीर नारायण अतिशय लहान होता. त्यामुळे दुर्गावती गादीवर बसली. १५६४ साली सम्राट अकबरने गोंडवानावर स्वारी केली. त्यावेळी दुर्गावतीने त्याचा निकराचा प्रतिकार केला. परंतु अकबराच्या बलाढ्य सैन्यापुढे गोंडवानाच्या लढवय्यांचा निभाव लागला नाही. पराभव अटळ आहे असे दिसताच राणी दुर्गावतीने प्राणार्पण केले.
चांदबिबी
सोळाव्या शतकातील आणखी एक ठळक नाव म्हणजे चांदबिबी. अहमदनगरच्या हुसेन निझाम शाहच्या या कन्येला चांद खालून किंवा चांद सुल्ताना या नावांनीही ओळखले जात असे. विजापूरचा सुलतान आदिलशाहाशी तिचा निकाह झाला. पुढे आदिलशहाची हत्या झाली. त्यावेळी विजापूर (१५८० ते ९०) आणि अहमदनगर (१५९६ ते ९९) या दोन्ही संस्थानांचा कारभार तिनं आपल्या हाती घेतला. १५९५ साली मुघलांनी अहमदनगरवर स्वारी केली तेव्हा चांदबिबीने कडवा प्रतिकार करून मुघलांचा पाडाव केला. १५९९ साली सम्राट अकबरने पुन्हा अहमदनगर किल्ल्यावर स्वारी केली, पण या युद्धात तिने अकबरशी तहाची बोलणी सुरू केल्याचे समजताच तिच्या सैन्यात बेबनाव झाला व गैरसमजातून चांदबिबीची हत्या झाली.
राजमाता जिजाऊ
सतराव्या शतकात प्रत्यक्ष राज्यकारभार न करताही राजकारणाला एकूणच नवी दिशा देणारी राजमाता म्हणून नाव घेतले जाते ते जिजाबाईंचे. शहाजी राजे भोसलेंची धर्मपत्नी म्हणून संतुष्ट न राहता जिजाबाईंनी या भूमीला परकीयांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी संस्कारांचे शिंपण केले व स्वराज्याची कल्पना शिवबाच्या मनावर बिंबवली. परकीय सत्तेआड चार हात करण्याची प्रेरणा त्यानी छत्रपतींना दिली. जिजाऊंनंतर ठळकपणे दिसते ते नाव करवीरवासिनी ताराऊंचे. मराठेशाहीत दुही माजल्यावर करवीर सिंहासनाचा ताबा ताराराणींनी घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही हिकमतीने त्यांनी राज्यकारभार केला. पुढे मराठेशाही बुडाली. त्यानंतरच्या राजकारणात महत्त्वाची, परंतु पूर्ण खलनायकी भूमिका निभावताना दिसतात राघोबादादा पेशव्यांच्या पत्नी आनंदीबाई. ‘ध’चा ‘मा’ करून त्यांनी नारायणराव पेशव्यांचा खून गारद्यांकरवी घडवून आणला व ‘आनंदीबाई’ ही प्रवृत्ती राजकारणात कायमची बदनाम झाली.
इसवी सन १७६६ ते १७९५ या काळात आपल्या कार्यकर्तृत्वाने झळाळून उठली होती इंदूरची पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर. अहमदनगरचे संस्थानिक माणकोजी शिंदे यांची ही कन्या. १७३३ साली खंडेराव होळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. १७५४ साली कुंभेरच्या लढाईत खंडेराव मारले गेले. पण ऐन तारुण्यात वैधव्य येऊनही करारी अहिल्याबाईने आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा कारभार अतिशय उत्तमपणे चालवला.
कित्तूर राणी चन्नम्मा
इसवी सन १७७८ ते १८२९ हा काळ कर्नाटकातील कित्तूरची राणी चन्नम्माचा. बेळगाव प्रदेशातील कित्तूर हे एक संस्थान. या संस्थानचे अधिपती राजा मुळ्ळसर्जा यांच्याशी चन्नम्माचा विवाह झाला. १८१८ साली राजे मरण पावले. त्यांच्यापासून चन्नम्माला झालेला एक पुत्र होता. परंतु पुढे चन्नम्माने शिवलिंगप्पा नामक मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसवले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्याला मान्यता दिली नाही व दोघांत बेबनाव झाला. ब्रिटिशांनी चन्नम्माशी लढाई केली व तिला जेरबंद करून बैलहोंगल किल्ल्यात जेरबंद केले. तुरुंगवासातच तिचा मृत्यू झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर पराक्रमाने वलयांकित होऊन उठलेले आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. १८४२ रोजी झांशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी वाराणशीत तांबे घराण्यात जन्मलेल्या मनूचे लग्न झाले व ती लक्ष्मीबाई बनली. पण अल्पावधीत पती व पुत्राचा मृत्यू झाल्यानंतर तिने दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेऊन त्याला राजगादीचा वारस घोषित केले. ब्रिटिश गव्हर्नर डलहाऊजीने या दत्तकविधानाला संमती देण्यास विरोध केला व झाशी संस्थान खालसा केल्याची घोषणा केली. याचवेळी भारतात ब्रिटिश साम्राज्यविरोधी लढ्याची ठिणगी पडली. राणी लक्ष्मीबाईही या लढ्यात सामील झाली व ब्रिटिशांविरुद्ध तिने त्वेषाने युद्ध केले. मात्र १८५८ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या चकमकीत ती जायबंदी होऊन मरण पावली.
राणी लक्ष्मीबाईप्रमाणेच रोमहर्षक कहाणी आहे राणी अवंतीबाईची. रामगढ संस्थानचे महाराज विक्रमादित्य सिंग यांची अवंतीबाई ही धर्मपत्नी. महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी ते निःपुत्रिक होते. या कारणावरून ब्रिटिशांनी रामगढ संस्थान ताब्यात घेतले. या अपमानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करून अवंतीबाईने चार हजार लढवय्यांचे सेनादल उभारले व ब्रिटिशांवर चढाई केली. परंतु पराभव अटळ असल्याचे दिसून आल्यावर बंदिवान होऊन ब्रिटिशांच्या हाती पडण्यापेक्षा तिने आत्मघाताचा मार्ग पत्करला व प्राणार्पण केले.
पोर्तुगिजांनी गोवा काबीज केल्यानंतर आपला मोर्चा कर्नाटकाच्या किनारपट्टीकडे वळवला होता. पण सागरी कर्नाटक प्रदेशाची राणी अब्बक्का हिने त्यांना प्रखर प्रतिरोध करीत माघारी हटवले. अवधची बेगम इजरत महल हिनेसुद्धा १८५७ च्या युद्धात ब्रिटिश साम्राज्याशी लढाई केली. भोपाळ संस्थानच्या बेगमाही युद्धकलेत निष्णात होत्या याचे दाखले इतिहासात मिळतात. जलकारीबाई, मणिपूरची राणी गंडिनलिवू, राणी रश्मोनी या वीरस्त्रींची चरित्रेही स्फूर्तिदायी आहेत.
भारताप्रमाणेच जगातील इतर देशांतही कर्तबगारी गाजवणार्‍या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या.
प्राचीन व मध्ययुगीन काळ
ख्रिस्तपूर्व ५३० वर्षी पर्शियाच्या शेजारी असलेल्या स्कायथिया देशात राणी टॉमिरीस होऊन गेली. पर्शियाचा राजा सायरस याने तिच्या देशावर स्वारी केली तेव्हा तिने त्याचा कडक प्रतिकार तर केलाच, पण प्रत्यक्ष युद्धात त्याला धूळ चारली.
इसवी सन २५० ते २७५ या काळात सिरिया देशावर राणी झेनोबियाचा अंमल होता. तिने तर साक्षात रोमन साम्राज्यालाच आव्हान दिले व रोमन साम्राज्यापासून पालमिरा हे आपले संस्थान स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली. अरेबिया, आर्मेनिया व पर्शिया या देशांचीही तिला साथ मिळाली. सतत चार वर्षे घनघोर संघर्ष केल्यानंतर रोमन सम्राटाने तिला कैद केले व नंतर हद्दपारीची शिक्षा ठोठावली.
इसवी सन ४९७ ते ५४८ या काळात बायझेंटीन साम्राज्याची महाराणी थियोडोरा हिचेही नाव सर्वतोमुखी होते.
ख्रिस्तपूर्व काळात अलेक्झांडर द ग्रेट विश्‍वविजयासाठी निघाला तेव्हा अनेक पराक्रमी राण्यांशी त्याला संघर्ष करावा लागला. खुद्द अलेक्झांडरची माता व एपीरसची महाराणी ऑलिंपिया ही निष्णात योद्धा होती. राजा फिलीपसोबत ती अनेक मोहिमांवर गेली होती. अलेक्झांडरची सावत्रआई यूरीडीस हीसुद्धा पराक्रमी असल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो.
रोमचा सम्राट नीरोची आई व क्लॉडियसची पत्नी ऍग्रीपीना हीसुद्धा काही काळ राज्यकर्ती बनली. आपल्या पतीची हत्या करून तिने नंतर मुलाला गादीवर बसवले, पण आपल्याही विरोधात ती कटकारस्थाने करीत असल्याचे पाहून नीरोने तिला ठार केले. बायझेंटाईन देशाची राणी थिओडोरा, एफेजरूची राणी पुलचेरिया, मेसिडोनियाची राणी झो यांचीही नावे त्या त्या देशाच्या इतिहासात कोरली गेली आहेत.
मध्ययुगीन कालखंडात जगातल्या बहुतेक देशांत काही असामान्य महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या. रशियामध्ये अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात एलिझाबेथ पेत्रोवना नावाची लोकप्रिय राणी- झारीना- होऊन गेली. तिची आठवण आजही काढली जाते. मॉस्को विद्यापीठाची स्थापना तिने केली. तसेच मृत्युदंडाचा कायदाही रद्दबातल केला.
इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिने आपल्या कार्यकाळात ब्रिटिश साम्राज्याला एकसंध बनवले. सार्दिनियाची राणी एलिनोरा हिने आपल्या राजवटीत अनेक लोककल्याणकारी कायदे बनवले. स्पेनची राणी इसाबेला (पोतुगीज सम्राटाची कन्या) हिचा कारभारही आदर्शवत म्हणावा असाच होता. जर्मनीची सम्राज्ञी माऊद (माटिल्डा), सामोसाची राणी सालामसिना, स्वीडनची राणी ख्रिस्तीना, इंग्लंडचा राजा दुसरा एडवर्टची राणी इजाबेला, झुलू देशाची राणी नांदी, ऑस्ट्रीयाची महाराणी मारिया तेरेझा, मादागास्कर देशामधल्या चार राण्या- पहिली राणावालोना, राशोशेरीना, दुसरी राणावालोना व तिसरी राणावालोना यांचीही नावे त्या देशात आदराने घेतली जातात. ऑस्ट्रीयो- हंगेरियन साम्राज्याची राणी एलिझाबेथ, आयर्लंडची ग्रेन ओमाली यांचेही कर्तृत्व मोठे होते.
इतिहासाची पाने चाळताना भारतातील आणखी एका महाराणीचे नाव ठळकपणे उठून दिसते. महाराणी दिड्डा. आपला पुत्र युवराज अभिमन्यूच्या नावाने काहीकाळ तिने राज्य चालवले व नंतर ती स्वतःच काश्मीरची महाराणी बनली. राजा क्षेमगुप्त असे तिच्या पतीचे नाव होते. महाराणी दिड्डा पराक्रमी असली तरी एका पायाने अधू होती.
थायलंडची राणी सूर्योथाई (१५५८ ते १५६९), इजिप्तची राणी अंखेसेनामोन, रशियाची राणी सोफीया या महिला राज्यकर्त्यांची नावेही जगाच्या इतिहासात दखलपात्र आहेत.
आधुनिक कालखंड
विसाव्या शतकाचा प्रारंभ होता होता बर्‍याच देशांतील राजेशाही लयाला गेली व लोकशाही सुधारणांचे वारे वाहू लागले. वस्तुतः जगभरातील राजकारण तसे पुरुषप्रधानच होते. परंतु काही देशांतील राजकीय क्षेत्रात महिला पुढारी पुढे येताना दिसू लागल्या.
राजकारणातील पहिलेवहिले महिलानुवर्ती स्थित्यंतर घडले ते आपल्याच शेजारील श्रीलंकेत (तेव्हाचा सिलोन). १९६० साली सिरिमाओ बंदरनायके या सिलोनच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. बंदरनायके यांनी राजकारणातील महिला पर्वाचा प्रारंभ केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यानंतर आजपर्यंत किमान ५० दशांमध्ये राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानपद महिलांनी भूषवले आहे. फिलिपिन्स, न्यूझिलंड, आयर्लंडसारख्या देशांत स्त्रियांना हा मान दोन किंवा त्याहून अधिक वेळा मिळाला आहे. १९७४ साली इझाबेल पॅरोन या अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या. इझाबेलचे पती ज्युआन पॅरोन हे तीन वेळा अर्जेंटिनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या तिसर्‍या टर्ममध्ये इझाबेल या उपाध्यक्ष होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्या अध्यक्ष बनल्या, पण सर्वप्रथम लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख बनण्याचा मान बंदरनायके यांचाच. १९६०, १९७० व १९९४ अशा तीन वेळा त्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. त्यानंतर हा मान मिळाला श्रीमती इंदिरा गांधी यांना. १९६६ साली त्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्या. १९७५ पर्यंत त्यांची सत्ता अबाधित राहिली. १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीमुळे त्या जनतेच्या मनातून उतरल्या व त्यांना सत्ता गमवावी लागली. पण १९८० साली पुन्हा उसळी मारून वर येत त्यांनी भारताचे पंतप्रधानपद पटकावले. १९८४ साली त्यांच्याच अंगरक्षकांकरवी श्रीमती गांधी यांची हत्या झाली.
१९६९ साली गोल्डा मायर यांची इस्रायलच्या पंतप्रधानपदी निवड झाली. १९७४ साली इझाबेल पॅरोन अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या हे वर नमूद केले आहेच. १९७५ साली सेंट्रल आफ्रिकन रिपल्बीकच्या पंतप्रधानपदी एलिझाबेथ दोमेतिएन यांची निवड झाली. १९७९ साली मार्गारेट थॅचर या ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या. त्याच वर्षी पोर्तुगाललाही मारिया द लुर्दिश पिंतासिल्गो यांच्या रूपाने महिला पंतप्रधान मिळाली. बोलिव्हियामध्येही याच वर्षी लिडिया गायलर तेजारा यांना पंतप्रधानपद प्राप्त झाले. १९८० साली डॉमिनिकात डेम यूजिनिया चार्ल्स तर आयसलँडमध्ये विग्दीस फिनबोगाडोत्तीर या पंतप्रधान झाल्या. नॉर्वेमध्ये सलग तीनदा (१९८१, १९८६ व १९९०) पंतप्रधान होण्याचा मान ग्रो हार्लेम ब्रूंटलँड यांना मिळाला. १९८२ साली मिल्का प्लेनिंक या युगोस्लावियाच्या तर अगाथा बार्बारा या माल्टाच्या अध्यक्ष बनल्या. मारिया तिबेरिया पीटर्स या १९८४ साली नेदरलँडच्या पंतप्रधान बनल्या व १९८८ साली त्यांना पुन्हा सत्ता मिळाली. १९८४ साली गिनी बिसाऊ देशात कार्मिन परेरा यांना कार्यकारी अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. १९८६ साली कोराझिनो ऍक्वीनो या फिलिपिन्सच्या अध्यक्ष बनल्या. १९८८ साली पाकिस्तानमध्ये बेनझीर भुत्तोंचा उदय झाला. लिथुआनियात १९९० साली काझीमिएरा दानुता या पंतप्रधान बनल्या. त्याच वर्षी निकारागुबात व्हायोलेटा चामोरो यांना राष्ट्राध्यक्ष पद मिळाले. १९९० सालीच आयर्लंडमध्ये मेरी गॉबिन्सन, जर्मनीत सबीना बर्गमनपोल व हैतीमध्ये एर्था पास्कोल ट्रलोईट यांना अध्यक्षपदे मिळाली. १९९१ साली सुधारणांचे वारे बांगलादेशात थडकले व खालिदा झिया सत्तेवर आल्या. २००१ साली त्यांना पुन्हा पंतप्रधानपद मिळाले. १९९१ साली एडिथ क्रेसन (फ्रान्सच्या पंतप्रधान), १९९२ साली हॅना सुकोहा (पोलंडच्या पंतप्रधान), १९९३ साली किम कँपबेल (कॅनडाच्या पंतप्रधान), त्याच वर्षी सिल्वी किनीगी (बुरुण्डीच्या पंतप्रधान), १९९३ सालीच आगाथे उलुंगियीमाना (रुवाण्डाच्या पंतप्रधान) यांना राष्ट्रप्रमुखपदे प्राप्त झाली.
यानंतर सुजान कामेलिया-रोमर (नेदरलँड्‌स), तान्सू किलर (टर्की), चंद्रिका बंदरनायके कुमारतुंगा (श्रीलंका), रेनेता इंडोवा (बल्गेरिया), क्लाऊटेड वेरलेई (हैती), शेख हसीना वाजेद (बांगला देश), मेरी मेकाल्सी (आर्यलँड), पामेला गॉर्डन (बर्म्युडा), जेनेट जागान (गयाना), जेनी शिप्ली (न्यूझिलंड), रुथ ड्रायफस (स्वित्झर्लंड), जेनिफर स्मिथ (बर्म्युडा), नायाम ओसोरीयाम तुया (मोंंगोलिया), हेलन क्लार्क (न्यूझिलंड), मिरेया मॉस्कोसो (पनामा), व्हायरा विके-फ्रेबेर्गा (लाटविया), तार्जा हॅलोनेन (फिनलंड) अशी लांबलचक नामावली पंतप्रधानांच्या यादीत घेता येते.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच तीन देशांत महिलाराज्य आले. फिलिपिन्स (ग्लोरिया आर्रोयो), सेनेगल (मेम मादियोर बोये) व मेघावती सुकार्नोपुत्री (इंडोनेशिया). २००२ साली सां तोये व प्रीन्सपी देशात मारिया नेविस, २००३ साली पेरूमध्ये बियात्रिज मेरीनो, २००४ साली मोझांबिकमध्ये लुईसा डायगो, २००५ साली जर्मनीत आंजेला मार्कल, २००६ साली चिलीत मिशेल बाशेलेट, स्वित्झर्लंडमध्ये मिशेलीन रे, लायबेरीयात एलन जॉन्सन सिरलीफ, दक्षिण कोरीयात हान-म्यूंग-सूक, जमैकात पोर्टिया सिंप्सन मिलर अशा तब्बल पाच महिला पंतप्रधान निवडून आल्या. २००७ साली प्रतिभा पाटील यांना भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. ख्रिस्तीना फर्नांडेज यांना अर्जेंटिनात तर बोर्जाना क्रिस्टो यांना बोस्निया-हेर्झगोबिना देशाचे अध्यक्षपद प्राप्त झाले. २००८ साली झिनेदा ग्रेसियानी माल्डोवाच्या पंतप्रधान बनल्या. २००९ साली डालिया ग्रिबोस्केट लिथुआनियाच्या पंतप्रधान बनल्या. २०१० हे साल लॉरा चिंचिला (कॉस्टा रिका), कमला प्रसाद बिशेशर (त्रिनीदाद व टॉबेगो), जुलिया भिलाई (ऑस्ट्रेलिया), डिल्मा रॉसेफ (ब्राझिल) यांच्यासाठी लकी ठरले.
२०११ साली थायलंडमध्ये इंग्लूक शिनावात्रा पंतप्रधान बनल्या तर २०१३ साली दक्षिण कोरियात पार्क गेऊन-हे यांच्या हाती राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली.
आधुनिक काळातील महिला नेतृत्वाचा इतिहास हा असा आहे. त्यावरून लक्षात येईल की अनेक देशात पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष बनलेल्या महिलांचे एकतर पती किंवा वडील राजकारणात होते व त्यांचा राजकीय वारसा घेऊनच त्यांचे पुनरुत्थान झाले आहे. सर्वसामान्यांमधून येऊन नेेता बनलेल्या महिलांची संख्या फारच कमी आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळातही परिस्थिती याहून वेगळी नव्हती. त्यामुळे राजकीय पातळीवर महिलांचे सक्षमीकरण हे राज्यकर्त्यांच्या स्तरापुरतेच मर्यादित राहिल्याचे ठळकपणे जाणवते.