प्रशासन ठप्प झालेले नाही : विजय

0
58

अनारोग्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विदेशात, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे राज्याबाहेर असले तरी राज्य सरकारने प्रशासन ठप्प होऊ दिलेले नाही, असे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

एका मागोमाग एक असे मुख्यमंत्र्यांसह दोन-तीन मंत्री एकाच वेळी आजारी पडण्याची विचित्र अशी परिस्थिती राज्यात पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे. आणिबाणीसारखी ही स्थिती आहे. यापूर्वी राज्यात असे कधीच घडले नव्हते. आपणहून मुद्दाम कुणी आजारी पडत नाही. त्यामुळे उगीच कुणी टीकाही करू नये. वरील समस्येमुळे काही अंशी राज्याच्या प्रशासनावर परिणाम झालेला आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही. मात्र, प्रशासन ठप्प झालेले आहे असे मात्र कुणाला म्हणता येईल अशी स्थिती नसल्याचे सरदेसाई म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे, जलस्रोत खात्याची कामे होत आहेत. आपल्या गैरहजेरीत कारभार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीने वेगवेगळी कामे हातावेगळी केलेली आहेत. आम्हांला खाण उद्योग सोडून कसलीच चिंता नाही. बंद पडलेला खाण उद्योग लवकर सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.