प्रवासी पक्षी

0
164

ताळगावचे बाहुबली नेते बाबूश मोन्सेर्रात यांना पणजी विधानसभा पोटनिवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप सरकारमध्ये सामील असलेल्या गोवा फॉरवर्डचे जोखड त्यांनी अलगद फेकून दिले आहे आणि बृहन्पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. २०१५ साली त्यांची पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करणार्‍या कॉंग्रेसने आता मात्र झाले गेले विसरून त्यांच्यासाठी पक्षाची दारे सताड उघडली आहेत. आपल्या पक्षातून एकामागून एक आमदार भाजपवासी होऊ लागताच त्या आयाराम – गयाराम संस्कृतीवर झोड उठवणारे कॉंग्रेस नेते यावेळी मुकाट मूग गिळून बसले आहेत. महादेव नाईक आणि सुधीर कांदोळकरांपाठोपाठ बाबूश यांच्यासाठीही कॉंग्रेस पक्ष स्वागताचे तोरण दारी बांधून उभा दिसतो आहे. मोन्सेर्रात यांनी आजवर किती वेळा दगा दिला हे ठाऊक असूनही केवळ पणजीची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी त्यांची ‘विनेबिलिटी’ म्हणजे जिंकण्याची क्षमता पाहून त्यांच्यासाठी या पायघड्या अंथरल्या गेल्या हे उघड आहे. काल त्यांनी रीतसर कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश केला. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी बाबूश यांनी आजवर अनेकदा पक्ष बदलले. वेळोवेळी भाजपाची – विशेषतः स्व. मनोहर पर्रीकर यांची त्यांच्याशी छुपी हातमिळवणी राहिली. बाबूश यांना राजकीय महत्त्व आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात पर्रीकरांचा मोठा वाटा राहिला हे वास्तव आहे. निवडून आणण्यात मदत काय, मोक्याची मंत्रिपदे काय, त्यांच्यासाठी नव्या ग्रेटर पणजी पीडीएची निर्मिती काय, वेळोवेळी त्यांचे सारे चोचले पुरवले गेले. त्या आधारे पणजीचा आपला बालेकिल्ला पर्रीकरांनी दोन तपे अबाधित राखला. बाबूश यांनी मात्र सदैव स्वतःची राजकीय सोय पाहिली आणि त्यानुसार पक्ष बदलले, निष्ठा बदलल्या आणि आताही आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांची पूर्ती करण्यासाठी ते अतिशय सावधपणे पुढे सरसावले आहेत. येणारी निवडणूक पर्रीकरांच्या मृत्यूपश्‍चात् होते आहे. गेल्या वेळी पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत गेले तेव्हा पणजीच्या पोटनिवडणुकीत सिद्धार्थ कुंकळकर बाबूश यांच्या विरोधात जेमतेम हजार मतांनी निवडून येऊ शकले होते. यावेळी पणजीमध्ये बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. भाजपा भले पर्रीकरांच्या पुत्राला रणांगणात उतरवून सहानुभूतीला मतांमध्ये रुपांतरित करू पाहात असला तरी भाजपाची मते कुरतडण्यासाठी सुभाष वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचातर्फे पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू व कॉंग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा असा प्रयत्न बाबूश यांनी करून पाहिला, परंतु अपक्ष म्हणून जिंकून आल्यास ते भाजपच्या गोटातही जाऊ शकत असल्याने त्यापेक्षा त्यांनी आपल्या तिकिटावर निवडून यावे असे कॉंग्रेसला वाटले असावे. स्वतः कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुश यांची पणजी, ताळगाव, सांताक्रुझमधील पारंपरिक मते आपल्या पारड्यात पडावीत यासाठी त्यांनी हा समझोता केलेला दिसतो. याच बाबूश यांना पक्षविरोधी कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केलेले आहे याचे त्यांना सोईस्कर विस्मरण झाले. राजकीय पक्ष हे आजकाल येथून तेथून एकाच माळेचे मणी असतात. त्यामुळे कोणी कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. आजकाल महत्त्वाची ठरते आहे ती उमेदवाराची निवडणूक जिंकण्याची क्षमता. त्यात बाबूश यांच्यासारख्या बाहुबली नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी पक्षाची वगैरे खरे तर जरूर नसते. त्यासाठी लागणारा पैसा, समर्थक, कार्यकर्त्यांचे बळ हे सगळे जवळ असल्याने जिंकण्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. अशा नेत्यांकडून निवडणुका लढवल्या जातात त्या विरोधी बाकांवर बसण्यासाठी मुळीच नव्हे. त्यांना हवी असते सत्ता. ती जेथे मिळेल तेथे उडी टाकणे आणि सत्तेचे लाभ पदरात पाडून घेणे हेच अंतिम ध्येय असते. या हव्यासाला मतदारांच्या कल्याणाचे गोंडस नाव दिले जाते. फक्त जिंकून येण्यातील छोटे मोठे अडथळे दूर करण्यासाठी समझोते वगैरे केले जातात. पोटनिवडणूक होणार असलेल्या पणजी शहराला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. पार्किंगपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि कचर्‍यापासून खराब रस्त्यांपर्यंत अनेक समस्या या राजधानीच्या शहरात ठायीठायी दिसतात. पणजीला स्मार्ट बनवण्याच्या घोषणा उदंड झाल्या, परंतु अद्याप तरी ते सारे कागदावरच आहे. सरकार की महापालिका या वादात पणजीचा विकास खुंटला आहे. जागोजागी खड्डे पडलेले रस्ते, अतिक्रमण झालेले पदपथ, गलीच्छ बाजार हे चित्र विदारक आहे. पणजीचा मतदार हा विचारी मतदार आहे. पणजी हे सुसंस्कृत लोकांचे शहर मानले जाते. मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने पंचवीस वर्षे या शहराचे प्रतिनिधित्व केले. आता त्यांच्या मृत्यूपश्‍चात् आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हे पणजीवासीयांना येत्या १९ मे रोजी ठरवायचे आहे. सध्याच्या एकूण घडामोडींकडे ते सजगपणे बघत असतीलच!