प्रमुख धरणांत पाण्याचा योग्य साठा उपलब्ध

0
311

राज्यात पाण्याचा पुरवठा करणार्‍या प्रमुख धरणांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला योग्य प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणातील पाण्याचा साठा २० टक्के तर दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणार्‍या साळावली धरणामध्ये पाण्याचा साठा ५४ टक्के एवढा आहे. आमठणे, पंचवाडी आणि चापोली धरणात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा आहे. ओपा पाणी प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा करणार्‍या खांडेपार नदीत योग्य प्रमाणात पाण्याचा साठा आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील धरणातील पाण्याची पातळी एप्रिल, मे महिन्यात कमी होते. जलस्रोत खात्याकडून राज्यातील नद्या, धरणांतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. जलस्रोत खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

राज्यातील प्रमुख धरण असलेल्या साळावलीमध्ये साधारण ५४ टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातील पाण्याची पातळी आता ३१.३० मीटर एवढी आहे. अंजुणे धरणामध्ये २० टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातील सध्याची पाण्याची पातळी ७४.९३ मीटर एवढी आहे. आमठणे धरणात ४६ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या धरणातील पाण्याची पातळी ४५.४५ मीटर एवढी आहे. पंचवाडी धरणामध्ये ४१ टक्के तर चापोली धरणामध्ये ५० टक्के पाण्याचा साठा आहे. पंचवाडी धरणात पाण्याची पातळी २१.६१ तर चापोलीत ३२.४३ मीटर पाण्याची पातळी आहे. या दोन्ही धरणांमध्ये पाण्याचा नियमित भरणा केला जातो. वर्ष २०१८ मध्ये राज्यात पाऊस योग्य प्रमाणात पडल्याने सर्व धरणे भरली होती. त्यामुळे आत्तापर्यंत पाण्याची पातळी समाधानकारक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुरवठा सुविधांमध्ये
वाढ करण्याची गरज
आगामी पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी एप्रिल – मे महिन्यात पाण्याचा मर्यादित स्वरूपात पुरवठा केला जातो. सध्या राज्यातील काही भागात नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. राज्यातील काही भागातील नागरिकांना अपुर्‍या साधन सुविधांमुळे योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्याच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.