प्रदेश कॉंग्रेस समितीकडून दलितांवरील अन्यायाचा निषेध

0
135

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने देशातील काही भागात दलितांवरील होणार्‍या अन्यायाचा निषेध करण्यासाठी काल आझाद मैदानावर सहा तास उपोषण केले. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दलितांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी देशपातळीवर उपोषण आंदोलन करण्याची सूचना केली.

या निषेध उपोषणात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार लुईझीन फालेरो, माजी मुख्यमंत्री फ्रान्सीस सार्दिन, आमदार फिलीप नेरी रॉड्रीगीस, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार विल्फ्रेड डिसा, आमदार इजिदोर फर्नांडिस, आमदार क्लाफासियो डायस, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार फ्रान्सीस सिल्वेरा , माजी खासदार जॉन फर्नांडिस, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सरचिटणीस आल्तिन गोम्स, कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शंकर किर्लपालकर व इतर पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला.
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात जाती, धर्माच्या नावावरील नागरिकात फूट पाडण्याचे षड्‌यंत्र रचले आहे. भाजपच्या नेत्यांकडून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला.

दलित संघटनांनी केलेल्या भारत बंदच्या वेळी भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. या हिंसाचारात अनेक दलितांचा बळी गेला आहे. दलित समाज न्याय, हक्कासाठी पुढे येत आहे. परंतु, त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री फालेरो, माजी मुख्यमंत्री सार्दीन, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष कुतिन्हो, शंभू बांदेकर यांची भाजपवर टिका करणारी भाषणे झाली.