प्रथमेश ः एक सुंदर स्वप्न

0
203
  • डॉ. सुषमा किर्तनी
    (बालरोगतज्ज्ञ, पणजी)

आईवडलांनी त्याला एवढं कामात बिझी ठेवलं की तो दमून आल्यावर त्याला शांत झोप व त्यामुळे निरोगी मन व शरीर यांचा लाभ होईल. त्यामुळे त्याच्या डोक्यात काही वेड्यावाकड्या विचारांना वावच नव्हता. त्याची दिनचर्या जणू त्यांनी आखूनच दिली होती. असा हा प्रथमेश! दातेंनी खरंच एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा प्रथमेश म्हणजे गणेश बनवला!!

‘डाऊन सिंड्रोम’ किंवा ‘ट्रायसोमी-२१’ हा आजार खूप मुलांमध्ये आढळतो. अनेक आईवडिलांच्या पोटी अशा मुलांचा जन्म होतो आणि या गतीमंद मुलांचं संगोपन करण्यात त्यांचे पूर्ण आयुष्य पणाला लागतं. ही खडतर वाटचाल करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. ‘‘देवानं आपल्याला भेट म्हणून हे मतिमंद बालक दिलंय व आपण त्याचा पूर्णपणे सांभाळ करू’’… असे म्हणणारे आईवडील खूपच कमी. एकदा डाऊन सिंड्रोमचे निदान डॉक्टरांनी केले की आईवडील व आप्तनातेवाईकांवर जसा दुःखाचा डोंगरच कोसळतो. असेच एक मूल इचलकरंजी येथील श्री. प्रकाश व सौ. शारदा दातेंच्या पोटी जन्मास आले. दहा वर्षे वाट पाहून हे अपत्य त्यांच्या नशिबी थेट शारदाबाईंच्या वाढदिवशीच जन्मले. जेव्हा बालरोगतज्ज्ञांनी बघून या बाळाचे निदान डाऊन सिंड्रोम असे केले तेव्हा दाते परिवारावर जणू आघातच झाला. डॉ. आनंद पंडितांनी बाळाची पूर्ण तपासणी करून बाळ डाऊन सिंड्रोमची केस आहे व मतिमंद होईल हे सांगितले. या अधु मुलाला आपण कसं वाढवणार?…हे मोठे प्रश्‍नचिन्ह प्रथमेशच्या आईवडलांसमोर होते. परमेश्‍वराने एक विशेष जबाबदारी देऊन हे मूल आपल्याकडे पाठवले आहे, तेव्हा आपण याची योग्य काळजी घेऊ व त्याला मोठं करू, याचा विचार करून दाते दाम्पत्याने प्रथमेशचा आपल्या जीवनात स्वीकार केला व त्याला घडवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने व उपचाराने प्रथमेशला खूपच फरक पडत होता. हे सगळे उपचार चालू असताना प्रथमेशच्या आईवडलांना फारच त्रास सहन करावा लागला. त्याला चालायला शिकवण्यापासून दाढी करायला शिकवण्याची जबाबदारी त्याच्या आईने उचलली व ती चांगल्या रीतीने पार पाडली. तसेच बुद्धिबळाचा क्लास, अभिनयाचे वर्ग, घरी लेझीम व डंबेल्स शिकवणे, त्याला सणासमारंभांना नेणे हे सगळे प्रकार झालेत. तसेच त्याने शिकावे यासाठी त्याला घरात एकटं ठेवणे, ज्यामुळे तो न घाबरता घरी राहू शकेल व घर सांभाळेल.. हीपण तितकीच महत्त्वाची गोष्ट होती, ती पण तो शिकू शकेल. त्याला तिकिट काढायला लावण्यापासून, एकटा फिरायला सोडणेस सायकल चालवायला शिकवणे हे सगळे झाले. दात्यांचा सुती साड्यांचा व्यवसाय होता. त्यामुळे प्रथमेश साड्या दाखवण्यापासून विस्कटलेल्या साड्यांच्या घड्या करणे, प्रतवारीनुसार साड्या वेगवेगळ्या करणे, साड्यांचे पॅकिंग व्यवस्थित करणे या सगळ्या कामात तो सहभाग घेता घेता तयार झाला. आईकडून प्रथमेशला स्वावलंबनाचे धडे मिळाले. त्यामुळे उठल्यावर अंथरूणाची घडी घालण्यापासून ते घरकामात मदत करणे या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित शिकला.
आता आईवडिलांसमोर प्रश्‍न होता की याला आपण स्वावलंबी बनवले पण आजच्या जगात केवळ एवढ्याने भागत नाही. त्याने स्वतः मिळवण्याची कलाही शिकली पाहिजे. त्याचा आत्मविश्‍वास वाढावा व मी माझे पोट भरू शकतो व मी जगू शकतो हे त्याला समजावे म्हणून, ते करणे गरजेचे होते.

प्रथमेश संगणक व टायपिंगच्या क्लासाला जाऊ लागला. यामागे तो स्वावलंबी बनावा ही माफक अपेक्षा पण ती एव्हरेस्ट सर करण्यासारखी होती. प्रथमेश संगणक वापरू शकतो व त्याला ते आवडते, हे त्याच्या प्रशिक्षकाच्या ध्यानी येऊ लागले. ही मुले स्टिरिओटाईप्ड कामे करू शकतात त्यामुळे प्रोग्रॅम रन करण्यासारखी कामं हा व्यवस्थितपणे करू शकेल, हे सिद्ध झाले. त्यामुळे डीटीपीची ट्रेनिंग सुरू झाली. छोटी छोटी पत्रे तो बिनचूक आणि बर्‍यापैकी वेगाने करू लागला. आता आपण काहीतरी करू शकतो, ही जाणीव होऊन त्याचा आत्मविश्‍वास वाढू लागला. आता तो दिलेले काम व्यवस्थित करू शकेल. तो लायब्ररी किंवा स्टोरेज अशा ठिकाणी चांगले काम करेल असे जेव्हा तज्ज्ञांनी त्याच्या आईवडलांना सांगितले, तेव्हा प्रथमेशला घेऊन, पुणे सोडून आपल्या गावात म्हणजे इचलकरंजीला जाण्याचा निर्णय श्री. दातेंनी घेतला. ‘‘महासत्ता’’ दैनिकाच्या कार्यालयात त्याला रात्रपाळीची नोकरी मिळाली. दैनिकाचे काम संध्याकाळी ७ ते रात्री पर्यंत होते. पण हे आव्हान त्याने स्वीकारले. या कायमस्वरूपी रात्रपाळीवर तो आनंदाने जाऊ लागला. पहिला पगार पडला तेव्हा त्याचा आनंदाने फुललेला चेहरा व त्याच्या चेहर्‍यावरचा ‘‘मीही काही करू शकतो’’ हा आत्मविश्‍वासाचा भाव आईवडलांच्या काळजाला दिलासा देऊन गेला.
नंतर श्री. दात्यांना श्री. मधुसूदन गायकैवारी यांच्याबद्दल माहिती मिळाली. गायकैवारी यांनी डॉ. जयंत नारळीकर या थोर शास्त्रज्ञासमवेत आयुकामध्ये काम केले होते. आयुकाच्या ग्रंथालयाचा कारभार डॉ. नारळीकरांनी गायकैवारीवर सोपवला होता. त्यांनी ग्रंथालयासाठी ‘‘युजर्स फ्रेन्डली’’ सॉफ्टवेअर तयार केले. हे सॉफ्टवेअर सामान्यातल्या सामान्याला वापरणे शक्य होते. प्रथमेश त्यांच्या हाताखाली शिकला व ग्रंथालय सॉफ्टवेअरचा भरपूर सराव केला. शेवटी डीकेटीई संस्थेमध्ये त्याला लायब्ररी अटेन्डन्टची नोकरी मिळाली. प्रथमेशला २००९ चा नॅशनल ट्रस्ट ऍवॉर्डही मिळालेला आहे. तसेच २०१०चा राष्ट्रपती पुरस्कार व २०१२ मध्ये इंटरनॅशनलचा डाऊन सिंड्रोमचा ऍवॉर्डही मिळाला. ‘‘रेझिंग द बार’’ ही डॉक्युमेंट्रीपण त्याच्यावर तयार झाली. तसेच ‘‘टेटा ऑफ द हाफचिक’’ हा माहितीपट प्रथमेशवर बनवला गेला. ‘दिलासा’ या मतिमंद मुलांच्या शाळेच्या माजी प्राचार्या आणि मतिमंद विकास मंडळाच्या सर्वसाधारण सचिव श्रीमती संध्या देवरूखकर यांनी हा माहितीपट बनवला. हा माहितीपट १८ मिनिटांचा आहे. हा माहितीपट अशा विशेष मुलांचे पालक, शिक्षक यांच्यासाठी सद्भावना ठेवून काम करणार्‍यांना अर्पण करण्यात आला असून देशातील सर्व शाळांमधून तो दाखवला जातो. अठरा वर्षांचा असताना प्रथमेशला भडकमकरांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर आली. सिनेमाचे नाव होते, ‘‘आम्ही असू लाडके’’. दात्यांनी त्याला मतिमंदांच्या शाळेत न घालता चांगल्याच मुलांच्या शाळेत घातले होते. त्याच्या प्रगतीसाठी खस्ता खाल्ल्या होत्या व त्याची गाडी एवढी वर चढवली होती. त्यामुळे सिनेमाच्या निमित्ताने तो अशा मुलांच्या सहवासात गेला व त्याची गाडी परत मागे घरंगळली तर काय? हा प्रश्‍न त्यांना भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी मन घट्ट करून ही ऑफर नाकारली.
आईवडलांनी त्याला एवढं कामात बिझी ठेवलं की तो दमून आल्यावर त्याला शांत झोप व त्यामुळे निरोगी मन व शरीर यांचा लाभ होईल. त्यामुळे त्याच्या डोक्यात काही वेड्यावाकड्या विचारांना वावच नव्हता. त्याची दिनचर्या जणू त्यांनी आखूनच दिली होती.

असा हा प्रथमेश! दातेंनी खरंच एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा प्रथमेश म्हणजे गणेश बनवला!!
मतिमंद मूल जन्माला आले म्हणजे हताश-निराश-गलितगात्र झालेल्या पालकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी दाते दांपत्य सतत मदतशील असते. त्यामुळे उरलेले आयुष्य लोकांना मदत करण्यात घालवायचा त्यांचा दृढ निश्‍चय आहे. २५ वर्षांच्या खडतर वाटचालीत त्यांना जो अनुभव आला तो वाचून व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी एक-दोन प्रथमेशप्रमाणे मुलं सक्षम बनली तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल, हीच त्यांची अपेक्षा. मराठी भाषिक मतिमंद मुलांचा व त्यांचा पालकांचा तसा ग्रुप निर्माण झालाय. कुणालाही जर माहिती, मार्गदर्शन हवे असेल तर मोठ्या आपुलकीने दाते त्यांना मार्गदर्शन करीत असतात.
हा लेख नवप्रभामध्ये लिहिण्यामागे हेच मुख्य कारण आहे की कुणालाही गरज असेल तर श्री. प्रकाश दाते यांना ९९२१०३६३८१/०२३०-२४३२५९ या नंबरवर संपर्क साधू शकता. प्रथमेशच्या जीवनावर लिहिलेले पुस्तक – ‘‘गाथा गतीमंदाच्या प्रगतीची’’, ‘‘कथा घडविणार्‍या हातांची’’ त्याच्या आयुष्याची पूर्ण स्टोरी सांगून जातात. श्री. सचिन कानिटकर लिखित हे पुस्तक खूप छान आहे. पुस्तक प्रत्येक मराठी समजणार्‍या वाचकाने वाचावे असेच आहे. डाऊन सिंड्रोमच्या मुलांच्या आईवडिलांनाही वाचण्याने खूप दिलासा मिळू शकेल.