प्रणॉय १५व्या स्थानी

0
75

युएस ओपन विजेता भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने काल गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या डब्ल्यूटीए क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती साधताना १५वे स्थान मिळविले आहे. त्याच्या खात्यात ४७२९५ गुण आहेत. पीव्ही सिंधू व किदांबी श्रीकांत यांनी आपले पाचवे व आठवे स्थान कायम राखले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूच्या खात्यात ७६९४६ तर सोळाव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालच्या खात्यात ४६९०० गुण आहेत. पुरुष एकेरीत ५८५८३ गुणांसह किदांबी श्रीकांत आठव्या स्थानी आहे. सौरभ वर्मा याने पाच स्थानांची झेप घेत ३२वे स्थान मिळविले आहे. पारुपल्ली कश्यपने एका स्थानाची सुधारणा करत ४६व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. एका स्थानाच्या घसरणीसह अजय जयराम व समीर वर्मा अनुक्रमे १७व्या व २९व्या स्थानी पोहोचले आहेत. बी. साई प्रणिथ १९व्या स्थानी जैसे थे आहे. पुरुष एकेरीत ‘अव्वल १००’ खेळाडूंमधील भारतीयांची संख्या १२ झाली आहे. सिरिल वर्मा ९७वे स्थान, + १०) व प्रतुल जोशी (९९वे स्थान, + ५) यांनी प्रगती साधली आहे तर मागील आठवड्यात शंभराव्या स्थानी असलेला हर्षिल दाणी १०३व्या स्थानी घसरला आहे. महिला एकेरीत मात्र श्रीकृष्णप्रिया कुदरावली (६९वे स्थान, -३), तन्वी लाड (९३वे स्थान, -२), साई उत्तेजिता राव चुक्का (९९वे स्थान, -२) यांना नुकसान सोसावे लागले आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी २५वे तर मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की आपले विसावे स्थान टिकवून आहेत.