प्रणॉय, सायना राष्ट्रीय चॅम्पियन

0
102

>> महिला एकेरीत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला कांस्य पदक

एच.एस. प्रणॉय व सायना नेहवालने धक्कादायक निकालांची नोंद करताना ८२व्या राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या किदांबी श्रीकांतला व पी.व्ही. सिंधूला या द्वयीने पराभव करत अनुक्रमे पुरुष एकेरी व महिला एकेरीत बाजी मारली.

प्रणॉयने श्रीकांतवर २१-१५, १६-२१, २१-७ अशी मात करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले पहिलेवहिले अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये श्रीकांतने जोरदार सुरुवात करत प्रारंभीच्या गेममध्ये ३-० अशी आघाडीही घेतली होती. पण मध्यंतरानंतर सामना प्रणॉयचा बाजूने झुकला. पिछाडीवर असलेल्या प्रणॉयने १९-१३ अशी आघाडी घेतली व अखेरीस २१-१५ असा पहिला गेम खिशात घातला. दुसर्‍या गेमसाठी श्रीकांतने प्रणॉयला चांगली टक्कर दिली. आपला अनुभव पणाला लावत श्रीकांतने दुसरा गेम जिंकत सामना तिसर्‍या गेमपर्यंत लांबवला.

परंतु, प्रणॉयने आक्रमक होत तिसरा गेम २१-७ अशा मोठ्या ङ्गरकाने जिंकत ५० मिनिटे चाललेला सामना आणि चषकावरही आपले नाव कोरले. महिला एकेरीची अंतिम फेरी पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांना सायना आणि सिंधूने निराश केले नाही. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना पारखण्यास वेळ घेतला. पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत सायनाकडे ११-९ अशी आघाडी होती. त्यानंतर सिंधूने सायनाला जोरदार प्रतिकार परत गेमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला.

मात्र सायनाच्या जोरदार खेळापुढे तिला हार मानावी लागली आणि पहिला गेम तिने २१-१७ने गमावला. पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसर्‍या गेममध्ये सायनासोबत तुल्यबळ खेळ केला. गेमच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये एका एका गुणासाठी जोरदार द्वंद्व पाहायला मिळाले. दुसर्‍या गेमच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सायनाने जिगरी खेळ करत तिला १८-१८ असे गाठले. तसेच सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर सिंधूचा २७-२५ अशा ङ्गरकाने पराभव करत सामना खिशात घालताना जेतेपद मिळविले. कालच्या विजयाने सायनाने अजिंक्यपदाचा हा किताब तिसर्‍यांदा आपल्या नावे केला.

अन्य निकाल
अंतिम फेरी ः महिला दुहेरी ः सिक्की रेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. वि. संयोगिता घोरपडे व प्राजक्ता सावंत २१-१४, २१-१४, मिश्र दुहेरी ः सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा वि. वि. प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी २१-९, २०-२२, २१-१७, मिश्र दुहेरी ः मनू अत्री व सुमिथ रेड्डी वि. वि. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी १५-२१, २२-२०, २५-२३