प्रणव उवाच

0
150

राजकारणातील अंतःस्थ खाचाखोचा त्यात प्रत्यक्ष वावरणार्‍यांना जेवढ्या ठाऊक असतात तेवढ्या बाहेरच्या जगाला माहीत असतात असे नाही. त्यामुळे जेव्हा अशा एखाद्या अंतःस्थ साक्षीदाराच्या आठवणींना जाहीर उजाळा मिळतो, तेव्हा त्यातून अनेक कोडी हळूहळू उलगडू लागतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींचे नुकतेच प्रकाशित झालेले नवे पुस्तक आणि त्या अनुषंगाने त्यांनी विविध नियतकालिकांना दिलेल्या मुलाखती यांमधून अशीच काही विश्वासार्ह माहिती बाहेर आली आहे. अर्थात, माध्यमांनी त्याचे आपल्याला हवे तसे अर्थ लावले. कोणी प्रणवदांचा पंतप्रधानपदावर डोळा होता असे मथळे दिले, तर कोणी मोदींच्या कौतुकाला प्राधान्यक्रम दिला, सोनिया गांधी यांनी जेव्हा प्रणवदांना डावलून डॉ. मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली, तेव्हा आपल्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेत जपलेली सौहार्दता याविषयी मुखर्जींनी आपल्या या पुस्तकात आणि मुलाखतींमधून स्पष्टपणे सांगितले आहे. सोनिया राष्ट्रपतीपदासाठी डॉ. मनमोहनसिंग यांचा विचार करतील आणि तसे झाले तर पंतप्रधानपदी आपली निवड करतील असे आपल्याला वाटले होते असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. खरे तर त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी तीनवेळा हुकली असे मानले जाते. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा म्हणजे २००४ साली त्यांच्या ज्येष्ठतेनुसार जेव्हा त्यांना पंतप्रधानपद मिळायला हवे होते, तेव्हा ते डॉ. मनमोहनसिंग यांच्या वाट्याला गेले. त्यानंतर २००९ साली मनमोहनसिंग यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली तेव्हा कदाचित आपला विचार होईल असे प्रणवदांना वाटले होते आणि त्यानंतर २०१२ साली जेव्हा राष्ट्रपतीपदाचा यूपीएचा उमेदवार निवडण्याची वेळ आली तेव्हा मनमोहन यांना राष्ट्रपतीपद व आपल्याला पंतप्रधानपद दिले जाईल अशी त्यांची धारणा बनली होती. परंतु या तिन्ही वेळा ही गोष्ट जुळून आली नाही आणि त्यांना राष्ट्रपतीपदाच्या सन्मानाच्या, परंतु राजकीयदृष्ट्या विजनवासाच्या पदावर पाठवले गेले. मात्र, एवढे होऊनही आपल्या पक्षाविषयी, पक्षनेत्या सोनियांविषयी त्यांनी या लेखनातून वा मुलाखतींमधून कोठेही कटुता व्यक्त केलेली दिसून येत नाही हे त्यांचे मोठेपण म्हणायला हवे. खरे तर प्रणव मुखर्जी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांची सारी हयात राजकीय पदांवर गेली, मात्र त्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंग यांची कारकीर्द नागरी अधिकार्‍याची राहिली. प्रणव मुखर्जींच्या अनुभवाच्या तुलनेत मनमोहन यांचा राजकीय अनुभव फारच थिटा होता. फक्त नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील पाच वर्षे अर्थमंत्रिपद त्यांनी भूषविले. तरीही पंतप्रधानपदासाठी मनमोहनसिंग यांचा विचार झाला. तेव्हाची अस्वस्थता प्रणवदांनी जरी व्यक्त केलेली असली, तरी पुढे मनमोहन सरकारमध्ये मंत्रिपद भूषवताना ही कटुता राहू दिली नाही हेही तितकेच खरे आहे. आपले पंतप्रधानपद वेळोवेळी हुकले त्याची तीन कारणे ते देतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण नेहमीच राज्यसभेचे सदस्य होतो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हिंदी येत नाही आणि तिसरे म्हणजे ७७ सालापासून आपण राजकारणात असलो तरी आपल्या राज्यामध्ये म्हणजे पश्‍चिम बंगालमध्ये आपण कधीही कॉंग्रेसचे सरकार आणू शकलो नाही या तिन्ही गोष्टी आपल्या विरोधात गेल्या असे त्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतानाच सोनियांपाशीही कप्तानाची गुण असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या कल्पनेला प्रणवदांनी खोडून काढलेले दिसते. १३२ वर्षांचा इतिहास असलेला पक्ष तुम्ही एकाएकी निकाली काढू शकत नाही. तो पुन्हा भरारी घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकताही अधोरेखित केलेली आहे. राजकारणामध्ये चढउतार असतात, त्यामुळे परिस्थिती स्वीकारून, तिच्याशी जुळवून घेऊन आणि पुन्हा नवसंजीवनी देऊन पक्षाने उभारी घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व येऊ घातले आहे, त्याला घराणेशाही म्हणण्याचीही त्यांची तयारी दिसत नाही. निवड लोकशाही पद्धतीने होत असेल तर अशा घराणेशाहीलाही त्यांची हरकत दिसत नाही. आपले अवघे हयात ज्या पक्षामध्ये घालवले, त्याविषयी अनुद्गार काढणे प्रणव मुखर्जींनी आयुष्याच्या या टप्प्यावरही टाळले आहे, परंतु पक्षाच्या आजच्या अवनतीला नेत्यांनी पक्षाने जिंकलेल्या २०० जागा २८० असल्यागत जपलेले अहंकार आणि इतरांचे ऐकून घेण्यात केलेली कसूर जबाबदार असल्याचेही त्यांनी रोखठोकपणे सुनावले आहे. राजकारणाचे प्रदीर्घ पावसाळे पाहिलेल्या या नेत्याने केलेले हे विश्लेषण खचितच चिंतनीय आहे.