प्रजासत्ताक चिरायू हो!

0
97

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या महनीय उपस्थितीत आज भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. शतकांची परंपरा असलेल्या एका प्राचीन राष्ट्राच्या रक्तामध्ये भिनलेल्या लोकशाहीचा हा उत्सव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षांमध्ये भारत अनेक बाबतींत पिछाडीवर भले राहिला असेल, परंतु या देशामध्ये लोकशाही दृढमूल झाली आहे हे कोणालाही नाकबुल करता येणार नाही. आपल्यापासूनच फुटून निघालेल्या पाकिस्तानला काही हे जमले नाही. मात्र, स्वातंत्र्याचा अर्थ आपण स्वैराचार असा घेतला आणि त्यातून सार्‍या समस्या निर्माण झाल्या. या देशाच्या जनतेचे स्वत्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक केला आणि हा देश कायम आपल्या गुलामीतच राहावा याची तजवीज करून ठेवली. त्यासाठी त्यांनी शिक्षणाची दिशा बदलली. या देशाला घडवणार्‍या राष्ट्रपुरूषांचा इतिहास शिकवण्यापेक्षा आक्रमकांचा इतिहास शिकवण्यावर अधिक भर दिला गेला. जे राष्ट्र इतिहास विसरते, त्याचा भविष्यकाळही अंधःकारमय बनतो असे म्हणतात. स्वातंत्र्यानंतर तरी हे सारे बदलेल अशी अपेक्षा होती, परंतु स्वातंत्र्यानंतरही जुन्या गुलामगिरीच्या खाणाखुणा मिरवण्यात आपण धन्यता मानली. त्यामुळे नवशिक्षित पिढीचे या देशाच्या संस्कृतीशी नाते तुटण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आणि काही प्रमाणात त्या प्रत्यक्षातही उतरल्या. इंग्रजी उच्चविद्याविभूषित धुरिणांनी आपणच या देशाचे कर्तेधर्ते आहोत असा अहंगंड मिरवला आणि देशाच्या धोरणांना सतत पाश्‍चात्त्याभिमुख दिशा दिली. राष्ट्रवादाचे महत्त्व नव्या पिढीच्या मनी बिंबवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. परिणामी ठिकठिकाणी फुटिरांच्या चळवळींना खतपाणी मिळाले. भरकटलेली माणसे नक्षलवादामध्ये, फुटिरतावादामध्ये आपले भवितव्य चाचपडू लागली. त्यात नवे युग हे माध्यमांचे होते. येणार्‍या नवनव्या माध्यमांवर पाश्‍चात्य विचारसरणीचा पगडा होताच. त्यामुळे तेथील चंगळवाद, भोगवादाचे दर्शन घरोघरी अहोरात्र घडू लागले. त्या दिखाऊपणाची भुरळ पडू लागली. आपल्या घरातील गरीबीचे दाहक वास्तव टोचू लागले. त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता अनेकांना चुकीच्या दिशेने घेऊ लागली. गुन्हेगारी वाढली, स्वार्थ हा स्थायीभाव बनला. काहीही करावे आणि सात पिढ्यांची तरतूद करून ठेवावी. त्याशिवाय तरणोपाय नाही असे ज्याला त्याला वाटू लागले. सत्ता हे संपत्ती गोळा करण्याचे साधन ठरले. भल्या बुर्‍या मार्गांनी पैसा खुळखुळू लागलेल्या नवश्रीमंतांच्या सत्ताकांक्षा दिवसेंदिवस प्रबळ बनू लागल्या. सत्तेचे सोपान चढण्याचे सोपे मार्गही त्यांना गवसू लागले. जात पात, धर्माच्या आधारावर फूट पाडायची आणि आपली मनोरथे सिद्धीस न्यायची मग अहमहमिकाच लागली. स्वार्थाच्या या बजबजपुरीने देशाची वाट लावली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये लुटालुटीला ऊत आला. घोटाळ्यांमागून घोटाळे घडू लागले. अपहाराच्या आकड्यांनी पुढच्या शून्यांची सीमा ओलांडली. गणनाचे मापदंड कमी पडू लागले. हे सारे पाहून अस्वस्थ होणाराही वर्ग होताच. त्या जनतेला परिवर्तनाची आस लागली आणि देशामध्ये व्यापक सत्तापरिवर्तन घडून आले. जुने गेले आणि आता सत्तेवर नवे आले आहेत. अच्छे दिन आणण्याचा वायदा करीत ते सत्तेवर आले आहेत. हे अच्छे दिन आणण्याची जबाबदारी आता त्यांच्या शिरावर आहे. उत्पादकतेला चालना देऊन देशाचा आर्थिक विकास दर उंचवायचा त्यांचा मानस आहे आणि त्यातूनच ‘मेक इन इंडिया’, वाढीव थेट विदेशी गुंतवणूक, निर्गुंतवणुकीकरण असे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत. मात्र, हे सारे भांडवलदारांच्याच हितासाठी तर नव्हे ना अशी भीतीही देशात दाटू लागलेली दिसते आहे. तळागाळातील गोरगरिबांच्या, श्रमिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आले तरच खरे परिवर्तन आले असे म्हणता येईल. संविधानाची चौकट उल्लंघण्याचा आततायीपणा करणार्‍यांचा या देशाला मोठा धोका आहे. अशा प्रतिगामी शक्तींना लगाम घातला जाण्याची गरज आहे. प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना आणि महासत्तांच्या राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतार्थ आरत्या ओवाळीत असताना या देशाच्या सामान्य माणसाचे प्राण कंठाशी आलेले आहेत, याचे भानही ठेवण्याची गरज आहे. त्याच्या भोवती आवळले गेलेले पाश दूर झाले आणि त्याच्या मताला किंमत राहिली, तरच खर्‍या अर्थाने हा देश प्रजासत्ताक होईल आणि त्याच्या उत्सवाला खरा अर्थ प्राप्त होईल.