प्रकाशाचे सूर…

0
115

– दासू शिरोडकर (तरवळे-शिरोडा)

अंधार… अंधार! काळाकुट्ट अंधार!
साम्राज्यावर तयाच्या
करीत बेधुंद प्रहार
एक स्वप्नवेडा
होऊनी स्वार वायुवर
घेत शोध प्रकाशाचा
करी संचार निरंतर!
भटकंती ही अनंत विश्‍वाची
दिन, मास
अन् युगायुगाची
घेऊनी
वेदना अश्‍वत्थाम्याची
अखंडित अन् अनंताची!
मध्येच
भेदूनी अंधार विवर
वाटे
चकाके काही दूरवर
उठले अंतरंगी
रोमांच क्षणभर
वेड्या आशेची
वेडी हुरहुर!
वास्तवात, असे तो
आभास धुक्याचा
निरर्थक फसवा
भास वेड्या मनाचा
निराशेच्या गर्तेतील
अथांग ठावाचा
अंधार विवरातील
जीवघेण्या प्रवासाचा!
प्रश्‍न अजून
तो तसाच अनुत्तर
मिटतील का
हे अंधाराचे थर?
संपेल का
हा युगायुगांचा जागर?
गवसतील का
कधी प्रकाशाचे सूर?