पौगंडावस्थेतील समस्यांवर उपाय

0
377
  •  वैद्य स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

मुलांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे म्हणजे मुलं आपल्यापासून काहीच लपवून ठेवत नाहीत. तसेच त्यांना जर मोबाइल, इंटरनेटच्या व्यसनांपासून लांब ठेवायचे असल्यास त्यांना मैदानी खेळ, संगीत, चित्रकला… अशा क्षेत्रात भाग घ्यायला प्रोत्साहित करावे. त्यांना वाचन व लिखाणाची आवड जोपासायला लावावी.

पौगंडावस्थेतील समस्यांवर आपण मागील काही लेखांमधून प्रकाश टाकला. आता या समस्यांवर उपाय म्हणून आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे ते प्रथम पाहूया. पाल्य म्हणजेच मुला-मुलींंसोबत पालक म्हणून संवाद साधणे. उत्तम दर्जाचा वेळ घालवणे आवश्यक आहे. मुलांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे म्हणजे मुलं आपल्यापासून काहीच लपवून ठेवत नाहीत. तसेच त्यांना जर मोबाइल, इंटरनेटच्या व्यसनांपासून लांब ठेवायचे असल्यास त्यांना मैदानी खेळ, संगीत, चित्रकला… अशा क्षेत्रात भाग घ्यायला प्रोत्साहित करावे. त्यांना वाचन व लिखाणाची आवड जोपासायला लावा. तसे करण्यात आपण पालक म्हणून त्यांना साहाय्य करणे गरजेचे आहे.

* जेव्हा मुलं चिडचिड करतात, बेचैन असतात, अस्वस्थ होतात, त्यांचे लक्ष विचलित होते तेव्हा पालकांनी ते गांभीर्याने घेणे गरजेचे असते आणि त्यावेळी त्यावर योग्य उपायदेखील करायला हवा. असे न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ह्यासाठी मुलांना मनाचे श्लोक, प्रज्ञा विवर्धक स्तोत्र, गणपती स्तोत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष असे स्तोत्र म्हणायला शिकवून ती त्यांना नियमित म्हणायला लावा. कारण ह्या स्तोत्रांच्या प्रभावाने बुद्धी एकाग्र व्हायला मदत होते. तसेच मन शांत होते व बुद्धीची ग्रहणशक्ती व आकलनशक्ती वाढते.

* मुलांना प्राणायाम व योगासनांची सवय लावावी. अर्थात हे करत असताना पालकांनी त्यांना ‘तू प्राणायाम व योग कर’, असे सांगून भागणार नाही तर पालकांनीदेखील त्यांच्यासोबत ते करणे आवश्यक आहे. कारण ज्या चांगल्या सवयी आपण त्यांना लावून घ्यायला सांगतो त्या आपणदेखील स्वतः आचरणात आणतो आहोत हे मुलांना प्रत्यक्ष दिसणे गरजेचे आहे. कारण प्राणायाम व योग ह्याने मनावर नियंत्रण ठेवायला मदत होते, शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे मुलांना पौगंडावस्थेत होणारे शरीरामधील बदल व त्यामुळे येणारा वागण्या-बोलण्यातील बदल ह्यावर त्यांना नियंत्रण राखता येते.

* तसेच आजच्या काळात मुलांनी दिवसातून किमान १५-२० मिनिटे तरी ध्यानाला बसणे आवश्यक आहे, कारण असे केल्याने त्यांचे मन एकाग्र व्हायला मदत होते. तसेच त्यांच्या वागण्या-बोलण्यात-आचरणात स्थिरता येते, कारण आजच्या युगात चांगल्या बुद्धिमत्तेसोबत समाजात कसे वागावे, बोलावे ह्याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. आपली मुले हुशार तसेच समजुतदार असणे गरजेचे. असे झाले तरच पुढे आपण राष्ट्राला एक चांगला नागरिक देऊ शकू.

* बरेचदा असे होते की मुलांची मानसिक स्थिती इतक्या टोकाला पोहोचलेली असते की प्रत्येक वेळी पालक त्यावर तोडगा काढू शकतील असे नाही अशावेळी आपण मानसरोग तज्ज्ञ किंवा समुपदेशक अशा तज्ञांची सहाय्यता घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण मुलं ही घरच्या व्यक्तींसमोर मोकळेपणाने आपल्या मनातील समस्या मांडतीलच असे नाही. पण जर समोरची व्यक्ती अनोळखी असेल तर तिच्यासमोर मुलं निःसंकोच आपले मन मोकळे करतात कारण त्यांना त्यांच्यासमोर मन मोकळे करताना दडपण येत नाही. म्हणूनच परिस्थितीचे गांभीर्य जाणून पालकांनी गरज पडेल तेव्हा अशा व्यक्तींची सहाय्यता घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास बरेचदा मुलांबाबत परिस्थिती सर्वांच्याच आटोक्याबाहेर पोहोचू शकते.