पौगंडावस्था भाग ः ४

0
272
  • डॉ. स्वाती अणवेकर
    (म्हापसा)

या वयात मुलांना चांगले काय, वाईट काय यातला फरक न समजल्याने ते बिचारे अशा लोकांवर विश्वास ठेवून नंतर संकटात सापडतात. अशी कितीतरी उदाहरणे आपण नियमित वाचतो, ऐकतो व पाहतो. त्यामुळे मुले काय करतात, कुणासोबत मैत्री करतात, सोशल मिडियावरील कोणती गोष्ट ते आत्मसात करतात यावर नजर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.

काही मुले मोबाईलचा सकारात्मक व योग्य पद्धतीने वापर करून स्वतःमध्ये सकारात्मक बदलदेखील घडवून आणतात. जसे चांगल्या नवीन गोष्टी पाहणे, त्या आत्मसात करणे व शिकणे तसेच त्यावर प्रयोग करून पाहणे इ. जे खरोखरच कौतुकास्पद आहे. पण असा चांगला वापर करून स्वतःची प्रगती घडवून आणणारी मुले फार कमी आढळतात. इंटरनेटचा वापर करून अश्लील चित्रफिती पाहणे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडियो पाहणे, ते आत्मसात करणे. तसेच ह्याच सोशल मिडियावर अन्य अनोळखी लोकांशी मैत्री करून, त्यांच्याशी सलगी वाढवून ह्यातील काही मंडळी ह्या मुलांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यावर त्यांचा गैरफायदा घेतात व यामुळे ह्या मुलांवर, त्यांच्या कुटुंबावर पेचप्रसंग ओढवतो.

ह्या निष्पाप मुलामुलींना ह्याच सोशल मिडियावर हे चाणाक्ष व अपराधी लोक हेरतात व नको त्या गोष्टीमध्ये त्यांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. ह्या वयात मुलांना चांगले काय.. वाईट काय.. ह्यातला फरक न समजल्याने ते बिचारे ह्या अशा लोकांवर विश्वास ठेवतात व नंतर संकटात सापडतात. अशी कितीतरी उदाहरणे आपण नियमित वाचतो, ऐकतो व पाहतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत ते काय करतात, कुणा सोबत मैत्री करतात, सोशल मिडियावर काय पाहून ते आत्मसात करतात ह्यावर नजर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.

तसेच आपण हे देखील पाहतो की ह्या वयात हल्ली मुलांना बरीच माहिती सहज उपलब्ध आहे जे आपल्यावेळी नव्हते. जसे फॅशन, टेक्नोलॉजी ह्या बाबतीत युट्युब, व्होट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर ह्या माध्यमातून ह्या मुलांना सर्व माहिती मिळते. त्यामुळे ह्या वयोगटातील मुलांना नट व नट्या तसेच उच्चभ्र्रू लोकांमध्ये वापरले जाणारे कपडे, पर्स, वॉलेट, मोबाईल, चप्पल, लॅपटॉप, गाड्या इ.ची क्रेझ वाटते. ह्या नकळत्या वयात देखील ही मुले स्टाईल स्टेटमेन्टच्या मागे वेडी होऊन एक प्रकारे हायफाय ब्रँड सेवी होऊन जातात. त्यांचा समज असा होतो की महागड्या ब्रॅन्डेड वस्तू वापरल्या म्हणजे आपण उच्चभ्रू व हुशार आणि स्वस्त असणार्‍या चांगल्या वस्तूंची किंमत त्यांना शून्य वाटू लागते. ह्या सगळ्यांची सुरुवात होत असतानाच पालकांनी त्याच्यावर आळा घातला पाहिजे.

मुलांना पालक करत असलेल्या कष्टांची, त्यांनी कमावलेल्या पैशांचे मोल ह्या कोवळ्या वयातच समजणे गरजेचे आहे. कारण मुलांना जेव्हा ह्या अशा महागड्या वस्तू सहज उपलब्ध होतात तेव्हा ती वस्तू त्यांना मिळेपर्यंतच त्या वस्तूचे कुतूहल त्यांना असते. एकदा का ती वस्तू त्यांची झाली की मग त्याची किमत शून्य होऊन जाते. मग त्यांना दुसरी एखादी महागडी वस्तू आवडू लागते व तीच हवी असते. सर्व सुखवस्तू पालक किंवा मग सर्वसामान्य पालकदेखील जेव्हा आपल्या मुलांचे असे फाजील लाड पुरवू लागतात तेव्हा ही मुले अगदी बेफिकीर, बेपर्वा व हेकेखोर होऊन जातात, ह्यात दुमत नसावे.
सध्या सोशल मिडियावर प्रौढ लैंगिक चित्रफिती, शरीर संबंधाबद्दल उत्तेजक चित्रफिती, प्रेम संबंधांच्या चित्रफिती राजरोस उपलब्ध असतात आणि जेव्हा ही मुले मोबाईल व नेटचा वापर करतात आणि जर आपण पालकांनी योग्य ती दक्षता घेतली नाही तर कळत नकळत ह्या गोष्टी जेव्हा त्यांच्या नजरेखालून जातात तेव्हा नक्कीच त्यांच्या बालमनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो व बर्‍याच मुलांना मग ह्या गोष्टीची उत्सुकता वाटू लागते. त्याच उत्सुकतेपोटी ह्या असल्या गोष्टी पाहत राहण्याची त्यांना सवय लागते. आणि मग अशी मुले चुकीच्या मार्गाकडे आकर्षित व्हायला वेळ लागत नाही.
मग ह्यामध्ये मुलामुलींमध्ये लहान वयात एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण वाटणे, मुलांना स्त्री शरीराचे व मुलींना पुरुषाच्या शरीराचे आकर्षण वाटणे ह्या गोष्टी घडणे नैसर्गिक आहे. आणि जेव्हा काही मोठ्या व्यक्ती ज्या स्वतः आंबट शौकीन असतात त्यांना ही गोष्ट कळली तर ते अशा मुलांचा गैरफायदा घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. बरेचदा ह्या सर्वांचा फायदा घेऊन अशा व्यक्ती मुलींवर रेप करणे, त्यांच्याशी शारीरिक संबंध जोडून त्यांना गरोदर करणे किवा मुलांवर असे लैंगिक अत्याचार करून त्यांना मग शारीरिक तक्रारी उद्भवू लागतात. ह्या असल्या गोष्टी वारंवार पाहून ही १५-१५ वर्षांची मुले रेप करणे, सेक्सुअल असोल्ट करणे असे शब्द सहज वापरू लागले आहेत.
(क्रमशः)