पोलंड गारद, कोलंबिया विजयी

0
149
Colombia's forward Falcao celebrates after scoring during the Russia 2018 World Cup Group H football match between Poland and Colombia at the Kazan Arena in Kazan on June 24, 2018. / AFP PHOTO / Jewel SAMAD / RESTRICTED TO EDITORIAL USE - NO MOBILE PUSH ALERTS/DOWNLOADS

कोलंबियाने रविवारी रात्री उशिरा झालेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील ‘एच’ गटातील लढतीत पोलंडचा ३-० असा पराभव केला. या पराभवामुळे विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान आटोपणारा पोलंड हा पहिला युरोपियन देश ठरला. बाद फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी उभय संघांना या सामन्यात विजय आवश्यक होता. ३२व्या मिनिटाला कोलंबियाचा आबेल आगिलार जायबंदी झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याची जाग मातियस उरुबे याने घेतली. या धक्क्यातून कोलंबियाचा संघ लगेच सावरला. बार्सिलोनाचा बचावपटू येरी मिना याने ४०व्या मिनिटाला कोलंबियाला आघाडीवर नेले. आपल्या जोरदार हेडरद्वारे त्याने पोलंडचा गोलरक्षक वोसिएच झेसनी याला हुलकावणी दिली. मोनेकॉचा स्ट्रायकर राडामेल फालकाव याने आपला तिसावा आंतरराष्ट्रीय गोल या सामन्यात केला. अशी कामगिरी करणारा तो कोलंबियाचा पहिलाच खेळाडू ठरला. ७०व्या मिनिटाला त्याने केलेला गोल विश्‍वचषक स्पर्धेतील त्याचा पहिलाच ठरला. पूर्ण तंदुरुस्त झालेला मध्यरक्षक जेम्स रॉड्रिगीस याच्यामुळे कोलंबियाचा संघ अधिक समतोल भासला.

पहिल्या सामन्यात कोलंबियाला जपानकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. तर ऍडम नावालका यांच्या पोलंडला सेनेगलकडून याच फरकाने पराजित व्हावे लागले होते. त्यामुळे दोघांसाठी खेळ उंचावणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. युआन कुआद्रादो याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या संघाच्या तिसर्‍या गोलमध्ये जेम्सचा मोठा वाटा होता. विजयामुळे जोस पेकरमनच्या कोलंबियाचे ३ गुण झाले आहेत. जपान व सेनेगलचा संघ या गटात प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे. गुरुवारी सेनेगल व कोलंबिया यांच्यात सामना होणार असून याच पोलंड व जपान आमनेसामने येतील. या लढतींनंतर संघाचे भवितव्य निश्‍चित होणार आहे. कोलंबियाच्या कालच्या विजयामुळे यंदाच्या विश्‍वचषकात सलग ३२ सामन्यांत गोल होण्याच रेकॉर्ड झाला. यंदाचा एकही सामना गोलशून्य बरोबरीत राहिला नाही. १९५४ साली झालेल्या विश्‍वचषकातील सर्व २६ सामन्यांत गोल झाले होते.