पोपोविच यांच्यामुळे पुणे सिटीचा विक्रमी धाव

0
156
FC Pune City coach Ranko Popovic before the start of the match 82 of the Hero Indian Super League between FC Pune City and FC Goa held at the Shree Shiv Chhatrapati Sports Complex Stadium, Pune, India on the 25th Feb 2018 Photo by: Vipin Pawar / ISL / SPORTZPICS

इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात प्रवेश करताना एफसी पुणे सिटीवर एक नामुष्की आली होती. लीगच्या इतिहासात कधीही बाद फेरी गाठू न शकलेल्या दोन संघांमध्ये पुणे सिटीचा समावेश होता. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीच्या जोडीला ते होते. यंदा याच पुणे सिटीने सर्बियाच्या रँको पोपोविच यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा कलंक पुसून टाकत बाद फेरीपर्यंत विक्रमी धाव घेतली.

अकादमी, मार्केटिंग, चाहत्यांशी नाते अशा क्षेत्रांत प्रारंभीच गुंतवणूक केलेल्या आयएसएल क्लबमध्ये पुणे सिटीचा समावेश होता. कागदावर भक्कम वाटणारा हा संघ त्यांना साजेसे निकाल मात्र कधीच साधू शकला नव्हता. यंदाच्या मोसमात सुमारे चार महिन्यांत पुणे सिटीने हा अपशकून संपवित प्रथमच बाद फेरी गाठली. याचे बरेचसे श्रेय पोपोविच यांना द्यावे लागेल.

मोसमादरम्यान पोपोविच यांचे डावपेचात्मक कौशल्य आणि खेळाडूंच्या निवडीतील अचूकता अनेक वेळा दिसून आली. याचे उदाहरण म्हणजे घोडदौड करणार्‍या बंगळुरू एफसीची आपल्या मैदानावर कोंडी करणे त्यांनी शक्य करून दाखविले. यंदा हेच इतर संघांना अवघड ठरले होते. बलजीत साहनीला लाल कार्ड मिळेपर्यंत पुण्याची पकड होती.

आदिल खान याला मध्य फळीत खेळविण्याचा त्यांचा निर्णयसुद्धा फलदायी ठरला. मोहन बागानच्या या माजी बचावपटूने मैदानाच्या मध्यभागी टेबार याच्या साथीत अप्रतिम खेळ केला. त्यामुळे संघाला स्थैर्य आणि ताकद प्राप्त झाली. परिणामी अल्फारो, मार्सेलिनियो आणि दिएगो कार्लोस यांच्या आघाडी फळीला मोकळीक मिळू शकला.

मुख्य म्हणजे पोपोविच यांनी वैविध्यपूर्ण क्षमता असलेल्या खेळाडूंचा खुबीने वापर करून घेतला. बलजीत, रोहित कुमार, आदिल आणि सार्थक गोलुई अशा खेळाडूंना त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत संघाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी खेळविले.
पोपोविच यांचा तरुण खेळाडूंच्या क्षमतेवरील विश्वास हा सुद्धा पुण्याच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रशिक्षक तरुणांना संधी देताना साशंक असतात, पण पोपोविच यांचे धोरण तसे नाही. त्यांच्या धोरणाला फळ मिळाले.
गोलरक्षक विशाल कैथ (वय २१), गोलुई (२०), इसाक वनमाल्साव्मा (२१), आशिक कुरनियान (२०), रोहित (२१) आणि साहिल पन्वर (१८) या तरुणांनी मोसमातील वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले. पोपोविच यांनी त्यांना मिळालेल्या खेळाडूंचा सर्वोत्तम वापर करून घेतला. त्यानंतर ट्रान्सफर विंडोमध्ये मार्को स्टॅन्कोविच आणि लोलो यांना मिळवित संघाच्या कामगिरीत आणखी सुधारणा केली.पुणे सिटीला गेल्या तीन सामन्यांत केवळ दोन गुण मिळविता आले. त्यामुळे उपांत्य फेरीत बंगळुरू एफसीविरुद्ध भरपाई करण्यास पुणे सिटी आतूर असेल. बंगळुरूला अनेकांनी संभाव्य विजेता ठरविले आहे, पण यास पोपोविच अपवाद असतील. बेंगळुरूविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात ते व्यस्त आहेत. कदाचित त्यांच्याकडे बंगळुरूला चकविणारा हुकमाचा एक्का असू शकेल.