पोट दुखतंय..?

0
1910

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
पोटदुखी..? त्यावर काय लिहायचे..? असा विचारच मनात येणे नाही. कुठलेही लक्षण साधे नसते, असेच गृहीत धरून चालणे नेहमीच बरोबर नसते. किंबहुना काहीही वेगळे शरीरात घडत असते, तेव्हाच लक्षणे दिसून येतात. त्यावर साशंक राहणे चांगले.
काय होतेय? … पोट दुखतेय?… असे म्हणत पेशंट संपूर्ण पोटालाच हात लावतो. पोट ज्याला आपण उदर म्हणतो… जिथे जेवल्यानंतर सगळे पदार्थ एकाच थैलीत (स्टमक) जातात! तुम्हा-आम्हाला जे माहीत आहे ते संपूर्ण म्हणजे ऍब्डोमेन. तेव्हा पोटात दुखल्यावर कोणता अवयव बोंबलतोय हे जाणून घेणे व त्यावर उपचार करणे हे गरजेचे आहे.
कित्येक वेळा रुग्णाच्या पोटात वर्षानुवर्षे दुखत असते… पण निदान होत नाही. त्यालाही कारणे आहेत.तर मंडळी, पोट म्हणजे ऍब्डोमेन आहे तर काय… तर जास्तीत जास्त अवयव पोटात असतात. ते कोणते ते आता पाहू.
१) पोट – उदर, २) जठर (लिव्हर),
३) स्वादुपिंड (पॅन्क्रियाज), ४) स्प्लीन (प्लीहा), ५) मूत्रपिंड (किडनी), ६) मोठे आतडे, ७) छोटे आतडे, ८) (स्त्रियांमध्ये – गर्भाशय) युटेरस,
९) पुरुषांमध्ये – प्रोस्टेट ग्रंथी, १०) स्त्रियांमध्ये अंडाशय, ११) मूत्राशय वगैरे… १२) मोठ्या रक्तवाहिन्या.
पोटात दुखल्यावर आम्ही ज्या जागी आपल्याला दुखते तिथे बोट लावतो. केव्हा केव्हा रुग्णाच्या पोटात एवढे जोरात दुखते की त्याला वाटते की सर्वच पोटात त्याला दुखते. तो नेमके कुठे दुखते ते सांगू शकत नाही.
कुठे दुखल्यावर कुठला अवयव आजारी आहे ते समजावे…
१. उदर – पोटाच्या वरच्या भागी (मध्यभागी) बरगड्यांखाली.
२. बेंबीच्या दोन्ही बाजूस सरळ किंवा कोणत्याही एका बाजूस – मूत्रपिंड.
४. बेंबीच्या सरळ खाली – मूत्राशय, मोठे आतडे, स्त्रियांमध्ये गर्भाशय, अंडाशय.
मुलांमधील पोटदुखी
गोव्यात सर्रास आढळणारी कारणे…
१) जंत किंवा राउंडवर्म इन्फेस्टेशन ः त्यामुळे आतड्यांना गाठ पडणे.
२) हगवण, ३) बद्धकोष्ठ – कॉंस्टिपेशन.
हल्ली जंताचे प्रमाण व त्यापासून होणारे आजार कमी झालेत. प्रत्येकाला आता समजून चुकलंय… जंतामुळे नाना प्रकारचे रोग होतात. तेव्हा बरीचशी मंडळी दर वर्षी… दर सहा महिन्यांनी… प्रत्येक महिन्यात… अरे हो! एका मुलाची आई मला म्हणाली, ‘अमुक अमुक डॉक्टर (स्पेशालिस्ट)ने दर महिन्याला डिवर्मिंग करायला सांगितलेय. एवढ्या मोठ्या डॉक्टरचे नाव घेतल्यावर… बोलणे जमले नाही. खरे – खोटे माहिती नाही. दर वर्षी जंतावर औषधे प्रत्येकाने घेतले पाहिजे. त्यावर कधीतरी बोलू. तर मंडळी हल्ली जंतामुळे मुले आता मरत नाहीत! त्यामुळे डॉक्टरलोक चिंतीत झालेत(?) असे नाही हं..! नवीन रोग आहेतच की तेव्हा त्यांना चिंता करायची गरजच नाही.
… चिंता हाच महाभयंकर रोग आहे. हो ना!
* कधी कधी घेतलेले जेवण योग्य नसल्याने म्हणा किंवा वेगळ्या कारणामुळे मुलांना पचत नाही व पोटात दुखायला लागते. हल्ली ५ ते १२ वयोगटातील मुले पोटात दुखते म्हणून येतात… कारण आजच्या युगात आहारात झालेला बदल!…
बर्गर…पिझ्झा…चिप्स…कुरकुरे…भेळ…फास्ट फूड- नूडल्स…चिकन चिली…चिकन लॉलीपॉप…क्रिस्पी चिकन.. ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना? मग मुलांना काय होईल? वरील पदार्थ वरचेवर खाऊन… पोटात दुखायला लागते. हॉस्पिटलात ऍडमिट करावे लागते. तेव्हा मुलांनो… आणि त्यांना हे खाणे देणार्‍या पालकांनो खबरदार रहा..! तुम्ही रोगांना घरी बोलावीत आहात त्याची जाणीव ठेवा.
फास्ट फूड खाऊन किंवा अमुक हॉटेलात बटर चिकन खाऊन आलेली माणसे दुसर्‍याच दिवशी माझ्या दारांत आलेली मी पाहिलीत. असे म्हणतात – हॉटेलच्या स्वयंपाकघरात कधी जाऊ नये… बाहेर विकायला ठेवलेले व ते खाणारे… बटाटेवडे कितीही चांगले असले तरीही आतले वातावरण बघितल्यावर खाल्लेले बटाटेवडे बाहेर यायला वेळ लागणार नाही. पूर्वी हॉटेलात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य कार्ड दिले जायचे. त्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्यांना हॉटेलमध्ये कामासाठी घेतले जायचे. आज काय परिस्थिती आहे, मला माहीत नाही. सॅनिटरी इन्स्पेक्टर सगळी कार्ड नीटरित्या भरून… मलई खाऊन… साहेबाकडून सही घेऊन पैसे घेतो… सगळे काही ‘‘ऑल वेल’’ पण स्वयंपाक्याला हगवण लागली त्याचे काय..? त्याच्या हातांवरचे ते असंख्य जंतू खाण्याच्या पदार्थात जातात त्याचे काय? वर हे जंतू बटाटवड्याबरोबर खाणार्‍याच्या पोटात फुकटच जातात त्याचे काय हो!! गल्ल्यावर बसलेला इसम जर खोकत असेल… तर त्याला टी.बी. झालेली असेल तर… पैसे घेता घेता… खोकत खोकत टीबीचे जंतू या चिल्लर पैशांबरोबर फुकट तुम्हाला देणार..! व तुम्हाला घ्यावे लागेल.! हो की नाही?
गोव्यात लोकांच्या पोटात दुखण्याची प्रमुख कारणे-
१) मसालेदार जेवणे, २) दारू पिणे(भरपूर),
३) मांसाहारी आहार करणे.
हे जर तुम्ही योग्य प्रमाणात केले तर ठीक! अति केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात.
– पोटात जळजळ वाढणे – अति झाल्यावर पचनासाठी योग्य प्रमाणात ऍसिडचा पाझर होत असतो. तो वाढतो व हे आम्ल पोटाला जाळते… उलटी येते… पोटात दुखते… चालूच राहिले तर उलटीत रक्त पडते… जठराला सूज येते… पोटात पाणी होते… फिट येते… कावीळ होऊन… तडफडून तो रोगी मरतो. तारुण्यातच त्याची बायको विधवा होते! अशा रुग्णांना कँसरचा धोका असतो… पण पोटाचे कँसरचे प्रमाणही कमी झालेले आहे. पण काविळीने मरणार्‍याचे प्रमाण वाढलेले आहे. दारू बनविणारे वाढलेत. दारू विकणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. पिणारे सकाळीच दारूच्या बारच्या दारावर बसलेले आढळून येतात. परवाच दिसलेला… मरण पावल्याचे वृत्त कानावर येते. त्याची जागा कुणी दुसर्‍याने घेतलेली दिसते.
दुसरे कारण हगवण..!
ऍमिबिक डिसेंट्री – हे तर पोटात दुखण्याचे मोठे कारण आहे. आम्ही बाहेर हॉटेलात जेवतो, खातो, पितो. हे सगळे करणे भाग आहे. कारण कामानिमित्त आपण बाहेरच असतो. तेव्हा या कारणामुळे लोकांच्या पोटात दुखणे चालूच आहे. एकट्या मुंबईत या आजाराने तिथले ३०% लोक बेजार आहेत… असा अहवाल आहे. आमच्या इथे कुठलेही अहवाल नाहीत. नळाचे पाणी पिणारे महाभाग कितीतरी आहेत. पण ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? याची खात्री पाणीमंत्री देतात का? ऑफिसात बसलेला इंजिनिअर देऊ शकणार का? नाही. कारण… पाण्याची नलिका व सांडपाणी वाहून नेणारी नलिका या बरोबरच धावतात. केव्हा केव्हा एकमेकांवर चढतात. नलिका म्हटल्यावर त्या फुटणारच व पाण्याची अदलाबदल होणारच! इथले स्वच्छ पाणी सांडपाण्याच्या नलिकेत तर सांडपाण्याच्या नलिकेतील पाणी तुम्हा-आम्हास पिण्यासाठी… फुकट… त्यावर सरकारी टॅक्स नाही… वॅट तर बिलकूल नाही.
इन्डायरेक्ट वॅट आहो हो!! … डॉक्टरांची फी… उपचार… हॉस्पिटल खर्च. आहे की नाही मजा..? तेव्हा मंडळी, पाणी प्या. पण कोणते? फिल्टरमधले नाही… फिल्टरमधले पाणी चांगले तापवून थंड करा. घरच्या गृहिणीला त्रास पडले तरी चालतील..! मगच ते प्या. कामावर जाताना स्वतःबरोबर नेलेले पाणी प्या. शाळेत जाणार्‍या पाल्यांना पालक पाणी देतात व ती मुले ते पाणी पीत नाहीत… घरी परतताना ते पाणी एकमेकांवर टाकून खेळतात. घरी रिकामी बाटली आणतात- आई खूश!
तेव्हा जागृत रहा. पोटदुखी… पुढच्याही मंगळवारी चालू राहील. तोवर उपचार चालूच ठेवा.
सांभाळा, आजपासून स्वतःवर अंकुश घाला. स्वैर मनाला आवर घाला. तर भेटू या पुढच्या मंगळवारी!!