पोटनिवडणूक : पणजीत ४ तर वाळपईत ३ अर्ज ग्राह्य

0
126

>> अर्जांची छाननी पूर्ण; उद्या होणार चित्र स्पष्ट

>> निवडणूक आयोगाचे निरीक्षक गोव्यात दाखल

विधानसभेच्या वाळपई व पणजी मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी काल पूर्ण झाली असून पणजी मतदारसंघात ४ तर वाळपईत ३ मिळून एकूण ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. उद्या दि. ९ रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने खरे चित्र ९ नंतरच स्पष्ट होणार आहे.
पणजीत भाजपचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचाचे आनंद शिरोडकर व अपक्ष कॅनेथ सिल्वेरा असे चार उमेदवारांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत तर वाळपईत भाजपचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, कॉंग्रेसचे रॉय रवी नाईक व अपक्ष रोहिदास गावकर असे तीन उमेदवार आहेत.
दि. २३ रोजीच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही गोव्यात दाखल झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दि. २३ रोजीच्या मतदानानंतर दि. २८ रोजी गोवा करमणूक सोसायटीच्या सभागृहात मतमोजणी होईल, असे त्यांनी सांगितले.
मतदानासाठी दोन्ही मतदारसंघांसाठी मिळून ७७५ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. पणजी मतदारसंघातील रायबंदर व मासान दे आमोरी येथील मिळून ६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत, अशी माहिती मोहनन यांनी दिली. पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर, पोलीस अधिक्षक चंद्रन चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.