पेरले ते उगवले

0
164

आजवर जगाची मनोरंजन राजधानी गणल्या गेलेल्या कॅसिनो नगरी लास वेगासमधील भयावह मृत्युकांडाने जग हादरले आहे. संगीताच्या तालावर थिरकणार्‍या हजारोंच्या गर्दीवर जवळच्या मंडाले बे रिसॉर्टच्या बत्तिसाव्या मजल्यावरून एक माथेफिरू अखंड अंदाधुंद गोळीबार करतो आणि धर्म, जात, वंश असे कुठलेही भेद मनात नसलेल्या आणि केवळ चार घटका मनोरंजनासाठी आलेल्या निष्पापांचे बळी घेतो ही क्रौर्याची परिसीमा आहे. हा हल्ला जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि बलाढ्य महासत्ता मानल्या जाणार्‍या अमेरिकेत झाला. अर्थात माथेफिरूंनी असा अंदाधुंद गोळीबार करण्याची ही काही पहिली दुसरी घटना नव्हे. असे शेकडो हल्ले आजवर त्या देशात घडलेले आहेत आणि निष्पापांचे बळी गेले आहेत. बराक ओबामांच्या काळात सँडी हूक एलिमेंटरी स्कूलवरील हल्ल्यात एका वीस वर्षांच्या माथेफिरूने सहा – सात वर्षांच्या वीस मुलांना ठार मारले होते, तेव्हाही जगाचे डोळे असेच पाणावले होते. ऑर्लांडोच्या नाईटक्लबमध्ये गेल्या वर्षी सहा डिसेंबरला अशाच हल्ल्यात ४९ जण ठार झाले होते. कालच्या दुर्घटनेतील बळींची संख्या लक्षात घेता अमेरिकेतील हे अशा प्रकारचे सर्वांत भीषण हत्याकांड आहे. असे हल्ले एवढ्या सहजतेने त्या देशात होऊ शकतात याला अर्थातच काही कारणे आहेत. पहिले कारण आहे ते म्हणजे तेथे सहजगत्या उपलब्ध होणारी शस्त्रास्त्रे. अमेरिका हा जगातील मोजक्याच देशांपैकी एक देश आहे की जेथे शस्त्र बाळगणे हा घटनात्मक अधिकार मानला जातो. अशी नृशंस हत्याकांडे होऊनही लोक आपला हा घटनादत्त अधिकार सोडायला तयार नाहीत. परिणामी आज त्या देशाच्या जवळजवळ चाळीस टक्के घरांमध्ये शस्त्रास्त्रे बाळगलेली असतात असे उपलब्ध आकडेवारी सांगते. अशा हल्ल्यांमागचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अमेरिकनांची बेदरकार स्वच्छंदी वृत्ती. कौटुंबिक पाश नसलेली, एकटी एकटी वाढलेली अनेक माणसे आणि त्यांना पडणारा नाना व्यसनांचा विळखा हळूहळू माथेफिरूपणाकडे वळवल्याविना राहत नाही. अशा सणकू व्यक्तींकडून आजूबाजूच्या समाजाला धोका संभवतो. लास वेगासमध्ये हेच घडले. ज्याने हा हल्ला चढवला तो स्टीफन पॅडॉक ६४ वर्षीय निवृत्त लेखापाल आहे. अट्टल जुगारी म्हणूनही त्याची ओळख आहे. आता हा हल्ला त्याने नशेच्या धुंदीत चढवला, सूड उगवण्यासाठी केला की, आयएसआयएस सारख्या एखाद्या दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली असली, तरी त्याला अमेरिकी तपास यंत्रणांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हा हल्ला स्टीफनने एकट्याने चढवला आणि अशा प्रकारचे ‘लोन वूल्फ’ प्रकारचे हल्ले चढवणे ही आयएसआयएसची खासीयत मानली जात असली, तरीही जोवर दोहोंतील दुवे सापडत नाहीत, तोवर तसा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. आता प्रश्न आहे तो म्हणजे असे हल्ले रोखण्यासाठी काय करायचे. सहजतः उपलब्ध असलेली शस्त्रास्त्रे रोखण्यासाठी अमेरिका काय करणार आहे? ही शस्त्रास्त्रे केवळ त्या देशासाठीच नव्हे, तर अवघ्या जगासाठी धोकादायक ठरलेली आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेने लक्षावधी डॉलर ओतले होते. त्यांची तर शस्त्रास्त्रांना सायलेन्सर बसवणे कायदेशीर करण्याची मागणी आहे. शस्त्रास्त्रे बाळगण्याच्या घटनादत्त अधिकाराला सोडण्यास जोवर अमेरिकी जनता तयार होणार नाही, तोवर असे हल्ले होत राहतील. त्या देशातील ३२ राज्यांमध्ये म्हणे शस्त्रे बाळगण्याचीच नव्हे, तर अगदी उघडपणे घेऊन फिरण्याचीही कायदेशीर परवानगी आहे. मग असे हल्ले झाले तर नवल ते काय? शेवटी जे पेरले जाते, तेच तर उगवते. अमेरिकेने आजवर जगामध्ये जे पेरले, तेच आता उगवले आहे. वीस वर्षांच्या तरुणापासून ६४ वर्षांच्या प्रौढापर्यंत कोणीही उठावे आणि निष्पापांवर अंदाधुंद गोळ्या चालवाव्यात ही जी हिंसक प्रवृत्ती जागतिक महासत्ता म्हणवणार्‍या अमेरिकेमध्ये बळावली आहे, तिला आटोक्यात आणायचे असेल तर मुळात उघडपणे उपलब्ध असलेल्या शस्त्रास्त्रांवर निर्बंध आणण्याची तयारी त्या देशाला दाखवावी लागेल. त्यासाठी शस्त्रास्त्र लॉबीशी झुंजावे लागेल. तीच जर तयारी नसेल तर मग अशा हत्याकांडांना हताशपणे पाहत राहण्यावाचून हाती काही राहणार नाही. नात्यापात्यांची, मायाममतेची काहीही जाणीव नसलेल्या आणि केवळ स्वतःसाठी जगणार्‍या आणि जगण्यासाठी पैशाची चिंता नसलेल्या उदंड समृद्धीची परिणती म्हणून निर्माण झालेल्या एका चंगळवादी, भोगवादी संस्कृतीतून निपजलेल्या माथेफिरूंच्या हाती ही शस्त्रे येणे म्हणजे जणू माकडाच्या हाती कोलीतच. मग असे वणवे लागल्यावाचून कसे राहतील?