पेन्शन फाईल्स अडविणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई

0
93

>> मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या फाईल्स गेली दोन-दोन वर्षे अडवून ठेवलेल्या मुजोर सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. कित्येक निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांकडून यासंबंधी प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. आम्ही गेली दोन-दोन वर्षे आमच्या निवृत्ती वेतनासाठी हेलपाटे मारत आहोत. पण आमच्या निवृत्ती वेतनासाठीच्या फाईल्स काही हातावेगळ्या केल्या जात नाहीत, असे सांगत बर्‍याच सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत अशा सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमोद सावंत यांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अन्य काही सरकारी कर्मचार्‍यांबरोबरच सुमारे ३० सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीवेतन गेल्या दोन वर्षांपासून अडून पडले असल्याचे वृत्त आहे. जे सरकारी कर्मचारी निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या फाईल्स हाताळत आहेत तेच या विलंबाला जबाबदार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. जर हे कर्मचारी निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शनच्या फाईल्स हातावेगळ्या करण्यात एवढा विलंब लावत असतील तर ते सर्वसामान्य लोकांची कामे कशी काय करतील, असा प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केला.