पेट्रोसियानने ७.५ गुणांसह आघाडी राखली

0
111

>> नऊ भारतीय बुद्धिबळपटूंना इंटरनॅशनल नॉर्म्स

अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोसियन मानुएलने नवव्या फेरीअंती ७.५ गुणांसह २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत आघाडी मिळविली आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारत बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे.
नवव्या फेरीअंती काल नऊ भारतीय बुद्धिबळपटूंना इंटरनॅशनल नॉर्म्स प्राप्त केले. गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हमलला काल नवव्या फेरीत इंटरनॅशनल मास्टर मोहम्मद नबैरशाह शेख याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर लीऑन मेंडोसाने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. नवव्या फेरीत त्याने के. मोहन याला पराभूत केले. लीऑनचे आता ६ गुण झाले आहेत.

कालचा दिवस नऊ भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाचा राहिला. त्यांनी इंटरनॅशनल नॉर्म्स मिळविले. अनुज श्रीवास्तव, तामिळनाडूचा रत्नवेल व्ही. एस, दिल्लीचा आर्यन वर्षने, पश्‍चिम बंगालचे मित्रबा गुहा व नीलाश साहा यांचा समावेश आहे. तामिळनाडूची प्रियंका के हिनेही वुमन इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला. उदिशाच्या युवा सायना सलोनिकानेही वुमन इंटरनॅशल मास्टर नॉर्म मिळविला.
दरम्यान, अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोसियान मानुएल याने नवव्या फेरीत जॉर्जियाचा ग्रँडमास्टर दावित जोजुआ विरुद्धची लढत बरोबरीत सोडवित ७.५ गुणांसह स्पर्धेत एकट्याने आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर वेनेंझुलाचा ग्रँडमास्टर एदुआर्दो इतुर्रिझागा याच्यासह सहा जण संयुक्त दुसर्‍या स्थानी आहेत.

दरम्यान, ‘क’ विभागात गोव्याचा ग्रँडमास्टर आयुष पेडणेकर (७ गुण) सात खेळाडूंसह संयुक्त दुसर्‍या स्थानी आहे. आंध्रप्रदेशचा प्रशांत वंगाला व उत्तर प्रदेशचा रवी चोप्रा ७.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे. गोव्याचे अन्य खेळाडू आयुष नाईक, स्नेहिल शेट्टी, ऋषिकेश परब, इथान वाझ, सिद्धेश मराठे, मंदार प्रदीप, विग्नेश सावंत, श्रीलक्ष्मी कामत यांचे प्रत्येकी ५.५ गुण झाले आहेत.