पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ

0
144

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत ४ आठवड्यांपासून तेल दर भडकल्याने काल देशात पुन्हा पेट्रोल व डिझेल दरात वाढ झाल्याने हे दर दिल्लीत आता प्रती लिटर अनुक्रमे रु. ७६.२४ व रु. ६७.५७ असे वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३३ पैसे (दिल्लीत) व डिझेल दरात २६ पैसे असे वाढले आहेत. सर्वाधिक पेट्रोल दर मुंबईत ८४.०७ रुपये असे झाले आहेत.

या दरवाढीविषयी शासकीय तेल कंपन्यानी अधिसूचना जारी केली आहे. २०१७ वर्षी जूनच्या मध्यापासून दैनंदिन इंधन दर आढावा पद्धत सुरू झाल्यापासून आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च दरवाढ ठरली आहे.
ही दरवाढ प्रत्येक राज्यातील स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट दरानुसार लागू केली जाते. अन्य मेट्रो शहरांच्या तुलनेत दिल्ली शहरातील इंधन दर सर्वात कमी आहेत. याआधी १४ सप्टेंबर २०१३ रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतीलिटर ७६.०६ रु. अशी झाली होती. तो आतापर्यंतचा उच्चांकी दर होता.

मुंबईत पेट्रोलचे सर्वाधिक दर
सर्वाधिक स्थानिक करांमुळे मुंबई शहरात पेट्रोल सर्वात महाग म्हणजे प्रती लिटर ८४.०७ रु. एवढे आहे. भोपाळमध्ये हा दर ८० रु., पाटण्यात रु. ८१.७३, हैदराबादमध्ये रु. ८०, ३५, कोलकाता व चेन्नईत ७८.९१ व ७९.१३ रु. असे आहेत. तर पणजीत (गोवा) हा दर सर्वात कमी म्हणजे ७०.२६ रुपये एवढा आहे.

हैदराबादेत डिझेल सर्वात महाग
स्थानिक करांमुळे डिझेल सर्वात महाग हैदराबाद शहरात प्रती लिटर ७३.४५ रु. एवढे भडकले आहे. त्रिवेंद्रममध्ये त्या खालोखाल ७३.३४ रु. असा दर आहे. अन्य शहरांमध्येही या दराने सत्तरी पार केली आहे. रायपूरमध्ये ७२.९६ रुपये, गांधीनगरमध्ये ७२.३६ रुपये, भुवनेश्वर ७२.४३, पाटणा ७२.२४ रुपये, जयपूर ७१.९७ रुपये, रांची ७१.३५ रुपये, भोपाळ ७१.१२ रुपये, श्रीनगरमध्ये ७०.९६ रुपये अशी दरवाढ झाली आहे.

गोव्यात पेट्रोल दराने केली ‘सत्तरी’ पार

गोव्यात मागील सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ नोंद झाली आहे. राज्यात पेट्रोलच्या दराने सत्तरी ओलांडली आहे. तर डिझेलचा दर सत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्य सरकारची पेट्रोलचा दर साठ रुपयांच्या आसपास ठेवण्याची घोषणा हवेत विरली आहे.
मागील १४ मे २०१८ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरदिवशी वाढ नोंद झाली आहे. पेट्रोलच्या दरात एकूण १.५१ पैसे आणि डिझेलच्या दरात एकूण १.६९ पैसे एवढी वाढ झाली आहे. रविवार २० मे रोजी पणजी परिसरात पेट्रोलचा दर प्रतिलीटर ७०.२६ पैसे एवढा होता. तर डिझेलचा दर ६८.७६ पैसे एवढा होता.
कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या कालावधीत काही दिवस इंधनाचे दर स्थिर होते. परंतु, निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४ मेपासून इंधनाच्या दरात वाढीला सुरुवात झाली. या दिवशी पेट्रोलचा दर ६८.९२ पैसे एवढा होता. सात दिवसाच्या काळात थोडी थोडी करून पेट्रोलच्या दरात १.५१ पैसे एवढी वाढ झाली आहे. १९ मे रोजी पेट्रोलचा दर ६९.९५ पैसे एवढा होता. त्यात रविवार २० रोजी ३१ पैसे वाढ होऊन पेट्रोलचा दर ७०.२६ पैसे एवढा झाला आहे. मागील एप्रिल महिन्यात पेट्रोलच्या दरात १.२१ टक्के एवढी वाढ झाली होती. इंधनच्या वाढत्या दरामुळे वाहन चालकांत नाराजी पसरली आहे. राज्य सरकारला पेट्रोलचा दर ६० रूपयांच्या आसपास ठेवण्यासाठी शुल्कात कपात करावी लागणार आहे. शुल्क कपात केल्यास महसूल बुडतो. त्यामुळे पेट्रोल दरवाढ कमी करण्याकडे लक्ष दिला जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.