पेट्रोल – डिझेलच्या दरात होतेय दिवसागणिक वाढ

0
171

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. सोमवारी पणजी शहरात पेट्रोलचा दर ६५.४९ पैसे आणि डिझेल दर ६२. ७० पैसे एवढा होता. केंद्रीय पातळीवर दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रूपयांवर पोहोचला. तर पेट्रोलचा दर ७१ रूपये एवढा होता.

पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. डिसेंबर २०१७ पासून दर वरच्यावर वाढत आहे. गेल्या महिनाभरात डिझेलच्या दरात प्रतिलीटर कमीत कमी तीन रूपयानी वाढ झाली तर पेट्रोलच्या दरात २ रूपयांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोलचा दर ६० रूपयांच्यावर जाऊ न देण्याची घोषणा केली होती.

पेट्रोलचा दर ६० रूपयांपेक्षा जास्त झाल्यानंतर सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोलचा दर ६० रूपयांपर्यंत ठेवला जात होता. पेट्रोलच्या वाढणार्‍या किंमतीमुळे व्हॅट कपात केल्यास सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याने व्हॅट कपात करण्यास प्राधान्य दिले जात नाही. सध्या राज्यांत पेट्रोलचा दर ६५ रूपयांवर पोहोचला आहे. इतर राज्याच्या तुलनेत राज्यात पेट्रोलचा दर कमी असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दर नियंत्रण मुक्त केले आहेत. देशातील पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या दराचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन सुधारीत दर जाहीर केला जात आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील खनिज तेलाच्या दरात वाढ झालेली आहे.