पॅलेस्टाईनकडे नको दुर्लक्ष!

0
143

– मंगेश मनोहर
पश्‍चिम आशियात इस्त्राईल-पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सातत्याने सुरू असलेल्या संघर्षाला आता जगही वैतागले आहे. अमेरिकेचे इस्त्राईलला असलेले पूर्ण समर्थन हे या समस्येचे मूळ आहे. अशा परिस्थितीत पॅलेस्टाईन अनाथ होत असून त्याला मदत करणार्‍यांच्या संख्येतही घट झाली आहे. याबाबतीत पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांकडून ङ्गक्त तोंडी समर्थन मिळत आहे. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल यांच्यामध्ये सातत्याने सुरू असलेल्या संघर्षामुळे पॅलेस्टाईन आणि जगाच्याच शांततेला धोका निर्माण झाला आहे.
पॅलेस्टाईनने गाझापट्टीतून रॉकेटचे हल्ले केले, तर इस्त्राईलने लढाऊ विमाने आणि ड्रोनने बॉम्बहल्ले केले.इस्त्राईलच्या या हल्ल्यात लहान मुलेही मारली जात आहेत.तीन युवकांचे अपहरण आणि त्यांच्या हत्येनंतर इस्त्राईलने हे युद्ध सुरू केले आहे. जूनमध्ये वेस्ट बँकमधील हेब्रान शहरात राहणार्‍या हमासच्या दोन सदस्यांनी ज्यू मुलांना पकडले. त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अजून इस्त्राईलचे सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेला यातील मुख्य आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. पण हे निमित्त पुढे करून हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये ङ्गक्त दहशतवाद आणि हिंसाचारच सुरू आहे.
अलीकडेच इस्त्राईलने गाझापट्टीमध्ये विमानातून कागद टाकले. त्यांवर ‘जे लोक हे शहर सोडून जाणार नाहीत त्यांच्या जिवाची खात्री देता येणार नाही’ असे लिहिले होते. त्यामुळे गाझा शहरातून अनेक लोक बाहेर पडत असून शहरापासून दूर बनवण्यात आलेल्या जागी ते आश्रय घेत आहेत. गाझामध्ये हमास सैनिकांचे वास्तव्य असून तेथून इस्त्रायल भागाला निशाणा करून रॉकेट हल्ले केले जातात, असा इस्त्राईलचा दावा आहे. इस्त्राईलने हल्ला केला त्यावेळी गाझाचे पोलीसप्रमुख तासीर बत्श यांच्या घरावर निशाणा साधण्यात आला. त्यामध्ये बत्श यांच्या घरातील सहा लहान मुलांसह १८ जण मारले गेले. यामध्ये पोलीसप्रमुखही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पॅलेस्टाईनमध्ये हे होत असताना हमासला धडा शिकवला जात नाही तोपर्यंत हल्ले थांबवण्यात येणार नाहीत, असे इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटले आहे. हमासला संपवण्यात आल्यानंतर शांतता निर्माण होईल, असाही दावा त्यांनी केला आहे. पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही.
याआधीही इस्त्राईलने हमासला धडा शिकवण्यासाठी हल्ले केले आहेत. २००८-०९ आणि २०१२ मध्ये याच उद्देशाने हल्ले करण्यात आले होते. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हमासच्या सैनिकांची ताकद थोडी कमी झाली. पण, ङ्गार लवकर त्यांनी स्वत:ला सक्षम केले. आतापर्यंत असे दिसून आले आहे की, इस्त्राईलच्या हल्ल्यानंतर हमासच्या सैनिकांकडे नवी शस्त्रात्रे येतात. रॉकेट हे त्यांचे नवे हत्त्यार आहे. हमास आणि अन्य अतिरेकी संघटना हिजबोल्लाला समर्थन देणार्‍या शक्तींची कमतरता नाही हे स्पष्ट आहे. याआधी झालेले इस्त्राईलचे हल्ले हा थट्टेचा विषय असल्याचे हमासवाले सांगत आहेत. दर दोन-तीन वर्षांनी इस्त्राईलकडून अशा प्रकारचे हल्ले होत असतात, असे हमासचे सैनिक म्हणतात. पण, हमासचे धोरणही योग्य नाही. युद्धाचे बारकावे जाणून असणार्‍या हमासच्या कार्यकर्त्यांचा अशा हल्ल्यांमध्ये बचाव होत असला तरी त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला, मुलांचे बळी जातात. अशा भूमिकेमुळे हमासला संपवण्यात येत नाही तोपर्यंत आपल्या सैन्याला काम करु दिले जाईल, असे इस्त्राईलने ठरवले आहे.
याआधी करण्यात आलेल्या दोन हल्ल्यांबाबत इस्त्राईलमध्येही असंतोष आहे. इस्त्राईलमध्ये अशा प्रकारे बिगरसैनिक असलेल्या नागरिकांना खुलेआम मारण्याचे सत्र सुरू असून जगाला मानवाधिकाराचे धडे शिकवणार्‍या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या पुरस्कर्त्यांना ते दिसत नाही. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंंत किमान २०० पेक्षा जास्त लोक बळी पडले असून त्यांमध्ये ३६ लहान मुले आणि २४ महिलांचा समावेश आहे. या परिसरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्राकडून सुरू आहे. तो करणार्‍या संस्थांच्या मते ही परिस्थिती ङ्गार धोकादायक आहे.
हमासला पूर्णपणे संपवता येण्याची शक्यता नाही असे इस्त्राईलमधील अनेक मोठ्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यानंतरही हमासचा ढाचा ङ्गार बिघडणार नाही. पण इस्त्राईलकडे स्वत:ची ताकद नाही असा हमास आणि त्याच्या सर्व समर्थकांचा आरोप आहे. या भागात अशा हल्ल्यांनी होत असलेल्या नरसंहारामागे अमेरिकेचा हात आहे. याचे कारण अमेरिकेकडून दरवर्षी इस्त्राईलला तीन अब्ज डॉलरची मदत केली जाते. त्याचा वापर इस्त्राईल आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी करतो. इस्त्राईलच्या या हल्ल्यांचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये विशेष करून महिला आणि मुलांना निर्घृणपणे मारले जात आहे. त्यामुळे जगातील सर्व समाजांकडून त्याचा निषेध नोंदवला जात आहे. अर्थात, इस्त्राईलच्या या मनमानीपणाला विरोध मानवी स्तरावर अमेरिकेसह सर्व देशांमध्ये होत आहे. पण सरकारांचे धोरण स्वार्थी पद्धतीने ठरत आहे. सार्‍या जगामध्ये इस्लामच्या नावाखाली ऐक्याचा नारा देणारी सरकारेही अमेरिकेच्या दहशतीमुळे इस्त्राईलचा विरोध करण्याचे धैर्य दाखवू शकत नाहीत. अमेरिकेची इस्लामी मित्रराष्ट्रे असलेल्या जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, टर्की, कतार, बहरीन, ओमान, लेबनॉन, कुवेत यांच्या सरकारकडून इस्त्राईलच्या विरोधात काही बोलले जात नाही. अर्थात त्यामुळे हमासच्या दहशतवादी प्रवृत्ती योग्य मानता येणार नाहीत. पण अमेरिकेने इस्त्राईलला अशा आत्मघातकी हल्ल्यांपासून रोखले पाहिजे. भारताकडूनही इस्त्राईलच्या विरोधात काही प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. ज्या भारताने पश्‍चिम आशियात बोकाळलेल्या दहशतवादाचा सातत्याने विरोध केला त्याला गाझामध्ये मारल्या जाणार्‍या मुलांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत ही गोष्ट आकलनापलीकडची आहे.
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील या संघर्षामुळे गाझामध्ये अशांतता पसरली आहे. त्यातून बाहेर येण्याचा रस्ता अजून तरी दिसत नाही. हमासच्या हल्ल्यात तीन युवक मारले गेल्यानंतर इस्त्राईलने या हल्ल्याला सुरुवात केली. त्यामध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश सामान्य नागरिकांचा समावेश आहे. म्हटले तर तेथे २०१२ पासून विरामाची स्थिती होती. पण तेथे दबून राहिलेल्या राखेला थोड्या हवेची गरज होती. तीन युवक मृत्युमुखी पडल्याने इस्त्रायला ही संधी मिळाली. इस्त्राईल आता कब्जा सोडायला तयार नाही. पॅलेस्टाईन स्वातंत्र्याचा लढा देत आहे. या दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातून लवकर काही मार्ग निघेल असे दिसत नाही. संयुक्त राष्ट्राने शांततेसाठी प्रयत्न केल्यावर तेथील लोकांना थोडा दिलासा मिळाला. पण तेथील हिंसा रोखण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. इजिप्तने या युध्दाच्या संघर्ष विरामासाठी प्रयत्न केला आहे. पण त्याच्या निःपक्षतीपणाबाबत संशय व्यक्त केला जातो. याचे कारण, तेथील सैन्य समर्पित प्रशासन हमासच्या विरोधात असून मुस्लिम ब्रदरहूडचा सहयोगी म्हणून त्या देशाकडे पाहिले जाते. याआधी संघर्ष झाला होता तेव्हा मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मोहम्मद मोरसी यांनी शांततेसाठी प्रयत्न केले होते. पण ते सध्या तुरुंगात आहेत. याशिवाय अमेरिका आणि युरोपीय संघाने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याच्याशी बरोबरीची बातचित शक्य होईल असे वाटत नाही. या सार्‍याचा सर्वात जास्त त्रास गाझामधील सामान्य नागरिकांना होत आहे. हवाई हल्ले आणि नाकाबंदीमुळे तेथील लोकांना दैनंदिन वापराच्या वस्तू गोळा करणेही अवघड जात आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर या देशाचे इस्त्राईल, पॅलेस्टाईन या दोघांशीही जुने संबंध आहेत. याशिवाय पश्‍चिम आशियात हजारो भारतीय राहतात आणि तेथून आपल्या देशात कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होतो. अशा वेळी तेथे निर्माण झालेली कोणत्याही प्रकारची अस्थिरता भारताच्या हिताची नाही. त्यामुळे तेथील परिस्थितीकडे भारताने दुर्लक्ष करता कामा नये. देशाचे हित लक्षात घेऊन या आंतरराष्ट्रीय प्रश्‍नाचा विचार केला पाहिजे.