पॅरा शिक्षकांना नियमित करणार

0
102

आगामी शैक्षणिक वर्षी पॅरा शिक्षकांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. पर्वरी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांचा तोडगा पॅरा शिक्षकांनी मान्य नसल्याने जाहीर करून सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वार संध्याकाळी उशिरापर्यत रोखून धरले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला शिक्षण संचालक आणि पॅरा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरटीई कायद्याच्या चौकटीतील काही अटी पूर्ण करून आणि सूट देऊन येत्या शालेय वर्षापासून पॅरा शिक्षकांना नियमित पदांवर समावून घेण्याचा निर्ण. बैठकीत घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याच्या आदेशानुसार २५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी किंवा पूर्वी सेवेत रुजू होणार्‍या पॅरा शिक्षकांसाठी हा निर्णय लागू राहील, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी २३ नोव्हेंबरला पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा न काढता. आगामी शैक्षणिक वर्षात सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले. पॅरा शिक्षकांना यापूर्वी अशा प्रकारची अनेक आश्‍वासने देण्यात आली. परंतु आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. या वर्षी केवळ चार महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अन्यायकारक बदल्या करण्यात आल्या आहेत, असे पॅरा शिक्षक संघटनेच्या स्मिता देसाई यांनी सांगितले.

पर्वरी येथे सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे धरलेल्या पॅरा शिक्षकांना महिला कॉँग्रेसने पाठींबा दिला. महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या पाठिंब्यामुळे पॅरा शिक्षकांना संध्याकाळी ४ च्या सुमारास सचिवालयाकडे जाणारा मुख्य रस्ता रोखून धरला. रस्ता रोखून धरलेल्या पॅरा शिक्षकांना बाजूला सारण्याच्या पोलिसांना केलेल्या प्रयत्नात झालेल्या धक्काबुक्कीत प्रतिमा कुतिन्हो व तीन पॅरा शिक्षक किरकोळ जखमी झाले. पॅरा शिक्षकांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष कुतिन्हो यांनी केली. पॅरा शिक्षक न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा स्मिता देसाई यांनी दिला. पॅरा शिक्षकांच्या आंदोलनामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी म्हापश्याचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, मामलेदार, विभागीय पोलीस अधिकारी किरण पौडवाल, पोलीस निरीक्षक परेश नाईक यांची उपस्थिती होती.