पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

0
102

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर १९ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती पॅरा शिक्षक संघटनेच्या स्मिता देसाई यांनी काल दिली. पॅरा शिक्षकांच्यावतीने मुख्यमंत्री पर्रीकर यांना एक निवेदन काल गुरूवारी सादर करण्यात आले. पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

१३३ पॅरा शिक्षकांच्या नियुक्तीबाबत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशात पॅरा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नियुक्ती आदेशाचा स्वीकार करण्यात आलेला नाही, असे देसाई यांनी सांगितले. पॅरा शिक्षकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु नव्याने नियुक्ती करताना बदल्या करण्यात आल्याने पॅरा शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

बुधवारी पॅरा शिक्षकांनी सुरुवातीला पर्वरी येथे सचिवालयाच्या बाहेर निदर्शने केली. त्या निदर्शनाची दखल घेण्यात न आल्याने भाजप कार्यालयाखाली एकत्र जमून निदर्शने केली. त्यानंतर आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढल्यानंतर आदेश स्वीकृतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.