पृथ्वी, श्रेयस, पंतने रॉयल्सला झोडपले

0
179

पावसामुळे बाधित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ३२व्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १७.१ षटकांत १९६ धावा केल्या आहेत. अंतिम वृत्त हाती आले त्यावेळी राजस्थानसमोर विजयासाठी १२ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
पावसामुळे सामना सुरू होण्यास तब्बल दीड तास उशीर झाला. त्यामुळे षटकांची संख्या कमी करून १८ करण्यात आली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीला कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा हा निर्णय मात्र गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही.

कॉलिन मन्रो (०) याला स्वस्तात गमावल्यानंतर दिल्लीचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडले. भारताच्या अंडर १९ संघाचा विश्‍वविजयी कर्णधार पृथ्वी शॉ याने ‘पॉवरप्ले’च्या षटकांचा लाभ उठवताना आपल्या वैविध्यपूर्ण फटक्यांनी राजस्थानच्या अनुभवी गोलंदाजांचा घामटा काढला. त्याने केवळ २५ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व ४ गगनचुंबी षटकारांसह ४७ धावांची खेळी करतानाच दुसर्‍या गड्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरसह ७३ धावा जोडल्या. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर शॉ परतल्यानंतर ऋषभ पंतने आपला धडाका सुरू केला. दुसर्‍या टोकाने श्रेयस धावा जमवतच होता. पंतने गौतम, धवल यांच्या गोलंदाजांची दिशा भरकटून टाकताना विशेषकरून लेग साईडला ‘लक्ष्य’ केले.

२३७.९३च्या स्ट्राईकरेटने त्याने २९ चेंडूंत ६९ धावांची धीरोदात्त खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ चौकार व ५ खणखणीत षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरने दुसर्‍या टोकाने दुय्यम भूमिका घेतानादेखील खराब चंेंडूचा समाचार घेताना अर्धशतकी वेस ओलांडली. त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ५० धावा जमवल्या. जयदेव उनाडकट याने डावातील पंधराव्या षटकात या दोघांना बाद केले. या दोघांनी बाद होण्यापूर्वी तिसर्‍या गड्यासाठी ९० धावांची मोठी भागीदारी केली. मागील सामन्यात दिल्लीचा विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलेल्या विजय शंकरने मनोरंजन करताना ६ चेंडूंत झटपट १७ धावा जमवल्या. डावातील शेवटचे षटक सुरू असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबविण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा टी-२० स्पेशलिस्ट ग्लेन मॅक्सवेल (५) पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात कमी पडला. राजस्थानने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना ईश सोधी व महिपाल लोमरोर यांना वगळून डार्सी शॉर्ट व श्रेयस गोपाळ यांना खेळविले. दिल्लीने एकमेव बदल करताना राहुल तेवतियाच्या जागी शाहबाज नदीमला उतरवले.

धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स ः पृथ्वी शॉ झे. व गो. गोपाळ ४७, कॉलिन मन्रो झे. बटलर गो. कुलकर्णी ०, श्रेयस अय्यर झे. त्रिपाठी गो. उनाडकट ५०, ऋषभ पंत झे. स्टोक्स गो. उनाडकट ६९, ग्लेन मॅक्सवेल पायचीत गो. आर्चर ५, विजय शंकर झे. त्रिपाठी गो. उनाडकट १७, लियाम प्लंकेट नाबाद १, अवांतर ७, एकूण १७.१ षटकांत ६ बाद १९६.
गोलंदाजी ः धवल कुलकर्णी ३-०-३७-१, जोफ्रा आर्चर ३.१-०-३१-१, कृष्णप्पा गौतम २-०-२७-०, जयदेव उनाडकट ४-०-४६-३, श्रेयस गोपाळ २-०-२६-१, बेन स्टोक्स ३-०-२८-०.