पूर्णवेळ मुख्यमंत्र्यांसाठी कॉंग्रेस न्यायालयात जाणार

0
175

>> कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय

>> राष्ट्रपतींकडेही मागणार दाद

मुख्यमंत्र्यांशिवाय राज्यात सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेण्याचे तसेच राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचे कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेले शंभर दिवस राज्यात मुख्यमंत्र्यांशिवाय सरकार सत्तेवर आहे.

राज्यात पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने आम्ही राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना निवेदन सादर करून दाद मागितली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा होऊ शकला नाही. आता आमची सहनशीलता संपली असून आम्ही याबाबत न्यायालयात धाव घेण्याचे तसेच राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचे ठरवले आहे, असे चोडणकर म्हणाले. मात्र, न्यायालयात व राष्ट्रपतींकडे कधी जाणार असे विचारले असता कधी जायचे त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवणार
राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ह्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्ष विविध खात्यांच्या प्रशासनावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. मांडवी व जुवारी ह्या महाकाय पुलांच्या बांधणीत प्रचंड भ्रष्टाचार चालू असून अन्य सर्व प्रकल्पांतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ लागला असल्याचे आढळून आले असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय मोप विमानतळ उभारताना नियमांचा भंग केला जात आहे. भ्रष्टाचार करणार्‍या मंत्र्यांविरुध्द पुरावे गोळा करून त्यांच्यावर खटले घालण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक आजारी पडल्यानंतर कॉंग्रेसने सरकारला पूर्ण सहकार्य केले. दोन आठवड्यांचे विधानसभा अधिवेशन केवळ तीन दिवसांवर आणले तेव्हा सरकारला विरोध केला नाही. मात्र, भाजप सरकारने कॉंग्रेस पक्षाला केव्हाच सहकार्य केले नाही. तसेच जनतेचीही फसवणूक केली असे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्री नसले तरी राज्य कारभार सुरळीतपणे चालू आहे, असे विधान दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर हे करू लागले आहेत. यातून सावईकर यांचा अहंकारच दिसून येत असल्याची टीका चोडणकर यांनी केली. एखादा सरकारी अधिकारीसुध्दा रजेवर जात असताना कुणाकडे तरी पदभार देत असतो. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कुणाकडेही पदभार दिलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात प्रचंड बेरोजगारी
राज्यात प्रचंड बेरोजगारी असून नोकरभरती करणे सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात बेरोजगारांना ४ हजार रु. एवढा बेकारी भत्ता देण्याचे जे आश्‍वासन दिले होते ते पूर्ण करावे, अशी सूचना चोडणकर यांनी यावेळी केली. बीएड्. डीएड्. प्रशिक्षित, अभियंते, प्रशिक्षित नर्सेस असे शेकडो युवक-युवती बेरोजगार असून पणजीत येऊन धरणे धरत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चोडणकर यांनी यावेळी केला.

खाणी सुरू करण्यास
सरकारला अपयश
राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणीवर अवलंबून असलेली जनता हवालदिल झालेली आहे. त्यामुळे खाण प्रश्‍नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचेही चोडणकर यावेळी म्हणाले.

खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यावर
कॉंग्रेस पक्षाचे विचारमंथन
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत खाणींचा प्रश्‍न, प्रलंबित विकासकामे, मुख्यमंत्र्यांशिवाय चालणारे सरकार व त्यामुळे ठप्प झालेले प्रशासन आदी प्रश्‍नांवर चर्चा झाल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी आमदार नीळकंठ हळर्णकर व दयानंद सोपटे उपस्थित होते.
खाणप्रश्‍नी कसा तोडगा काढता येईल त्यासंबंधी विचारविनिमय करून राज्य सरकारला सूचना करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आमदार प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काढली होती. ह्या समितीला बुधवारी (आज) ऍड. उसगावकर व सुबोध कंटक यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे. आज ही बैठक झाल्यानंतर वरील दोन्ही वकील जो सल्ला देतील तो सल्ला सरकारला कळवण्यात येणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी कॉंग्रेस पक्षाने राजकीय मतभेद विसरून सरकारल गेले वर्षभर सहकार्य केले. पण खाण उद्योग सुरू करण्यास भाजप सरकारला रस नाही असे त्यांची आतापर्यंतची भूमिका पाहून कॉंग्रेसला वाटू लागले असल्याचे कवळेकर म्हणाले. खाण प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी परत एकदा कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.

विरोधी आमदारांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी हल्लीच ह्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. दर एका मतदारसंघात प्रत्येकी १५ कोटींची कामे २५ मे पर्यंत सुरू करण्याचे आश्‍वासन ढवळीकर यानी दिले होते. मात्र, विकासकामे हाती घेण्यात आली नसल्याचे कवळेकर यांनी स्पष्ट केले. कुठल्याही खात्यातर्फे कामे होत नाहीत. तीन मंत्र्यांची समितीही काहीच करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कॉंग्रेस पक्ष सरकारला अजून थोडा वेळ देणार असल्याचे ते म्हणाले.