पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे पॅकेजची मागणी करणार ः मुख्यमंत्री

0
116

गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा जोरदार पाऊस व पूर यामुळे लोकांची घरे व अन्य मालमत्ता व शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत निधीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले. त्याशिवाय ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांना मुख्यमंत्री मदत निधीतूनही नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासाठी राज्यातील उद्योगपती, उद्योजक व अन्य घटकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. काल शून्य तासाला विधानसभेत विविध आमदारांनी राज्यातील पूरग्रस्तांना सरकारने मदतीचा हात द्यावा व केंद्र सरकारकडे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पॅकेजची मागणी करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

मंत्री लोबोंकडून ५ लाखांची मदत
मंत्री मायकल लोबो यांनी पूरग्रस्तांसाठी आपले तीन महिन्यांचे वेतन (५ लाख रुपये) मुख्यमंत्री मदत निधीसाठी देण्याची घोषणा काल विधानसभेत केली. काल शून्य तासाला विधानसभेत या प्रश्‍नावर चर्चा चालू असताना लोबो यांनी ही घोषणा केली. ह्या संकटप्रसंगी सर्व आमदार व मंत्र्यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी निधी द्यावा, अशी सूचना त्यानी केली. तसेच आपण ५ लाख रुपये देत असल्याचे सांगितले. मात्र, लोबो सोडल्यास अन्य एकाही मंत्री व आमदाराने मुख्यमंत्री मदत निधीसाठी मदत जाहीर केली नाही.