पुरुषांच्या कार्यक्षेत्रात महिलांचा प्रवेश

0
93

– डॉ. मृदुला सिन्हा

(अनुवाद : ऍड. अक्षता पुराणिक-भट)

पुरुषांच्या कार्यक्षेत्रामधील महिलांचा प्रवेश प्रशंसनीय तर आहेच, पण त्यांनी ही उपलब्धी केवळ पुरुषांना श्रेष्ठ मानून प्राप्त केली असेल तर ती प्रशंसनीय नाही. पुरुषांच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या पदार्पणाचे स्वागत पुरुषही करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

हल्लीच्या दिवसांत शिक्षण आणि विकासाच्या संधी घेऊन पुढे जाणार्‍या तरुणींमध्ये एक स्पर्धा दिसून येते. ती म्हणजे, पुरुषांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्याची स्पर्धा! मोठ्या गर्वाने सांगितलं जात आहे- ‘या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व होतं, आता स्त्रियांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.’ ज्या स्त्रिया पारंपरिक क्षेत्र सोडून नव्या क्षेत्रात प्रवेश करतात त्यांना कुटुंबाचंही समर्थन आणि प्रोत्साहन मिळत आहे.
हल्लीच मला कर्नाटकात जाण्याचा योग आला. तिथे एका संस्थेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील विविध कार्यक्रमांमध्ये तीन असे कार्यक्रम सादर करण्यात आले ज्यांमध्ये केवळ स्त्रियाच होत्या. निवेदिका परत परत घोषणा करीत होती- ‘‘या कलेला पुरुषांनीच जिवंत ठेवलं होतं, आता महिलांनीही त्यात प्रवेश केला आहे.’’ हे खरं की ते तिन्ही विशेष- नाटक, नृत्य आणि संगीत- स्टेजवर सादर करणार्‍या महिला आत्माभिमानाने भारावल्या होत्या. तसं पाहिलं तर स्टेजवर येण्यासाठीसुद्धा आत्मविश्‍वास हवा. आपल्या कलेवर अविश्‍वास दाखवल्यास कोणतीही स्त्री वा पुरुष मंचावर येऊ शकत नाही. स्टेज आत्मविश्‍वास निर्माण करतो. जर स्टेजवर येऊन त्या अशी कला प्रदर्शित करत असतील जी त्या समूहासाठी परंपरागत नाही- नवी आहे- मग तर काही विचारूच नका! सोने में सुहागा!! या दिवसांत महिलांनी पुरुषांच्या क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे जणू ‘सोने में सुहागा’च आहे. त्यांचा आत्मविश्‍वास द्विगुणीत होतो.
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील नृत्य-नाटिकेची एक विद्या ‘यक्ष-गान’ खूप प्रसिद्ध आहे. परंतु ती पुरुष समाजच आपल्या खास भावमुद्राभिनयाने सादर करायचे. आता स्त्रियांची टोळीही त्यात दिसत आहे. दुसरं म्हणजे ढोल-नृत्य. मोठे वजनदार असे ढोल गळ्यात घालून स्त्रिया स्टेजवर आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर गर्व दिसत होता. वीस मिनिटांपर्यंत त्यांनी ढोल-नृत्य सादर केलं. स्त्रियांसाठी कलेचं हे क्षेत्रही एकदम नवं आहे. स्त्रिया तिथे नाट्यमंडळ बनवून रामायण, महाभारताचे कथानकही सादर करू लागल्या आहेत. श्रीमती पंकजा रविशंकर हिने रावण आणि दुर्योधनाच्या भूमिकेसाठी कितीतरी पारितोषिके मिळवली आहेत. रावणाच्या भूमिकेतील तिचे खिदळणे, गर्जना करणे, दमदार आवाज- सारं ऐकण्यासारखं होतं. वाटलं, परमेश्‍वराने शरीरयष्टी आणि तिचा चेहराही खास या भूमिकेसाठीच जणू बनवला आहे. स्टेजवर उभा असलेला तो रावण प्रेक्षकांना यासाठीही विशेष वाटला की त्यांना माहीत होतं ती स्त्री-अभिनेत्री आहे. त्यामुळे भूमिका खास ठरली. अभिनेत्रीने अशा प्रकारे गर्जना करणे आणि खिदळणे अपेक्षित नव्हते.
पुरुषांसाठीच्या काही क्षेत्रांमध्ये महिलांना प्रवेश नव्हता. पण आता त्यांना विरोध केला जात नाही. खरं तर पुरुषांनी त्यांना तो प्रवेश दिलेला नाही तर स्त्रियांनीच तो प्राप्त केला आहे! या क्षेत्रात जाण्यासाठी पुरुषांनी प्रोत्साहनही दिलं आहे. त्यांना ती कला शिकवणारेही पुरुषच आहेत. या दिवसांत समाजातील लिंगभेद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. परंतु पुुरुषांसाठीच्या निर्धारित क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणे महिलांचा प्रवेश होतो आहे, त्याप्रमाणे स्त्रियांच्या क्षेत्रात पुरुषांचा प्रवेश होताना दिसत नाही. यातून हे स्पष्ट होेते की, पुरुषांसाठी निर्धारित असलेले काम केल्याने स्त्रिया स्वतःला धन्य समजतात. पुरुष महिलांचे क्षेत्र केवळ गरज म्हणून स्वीकातात; तेही नाराजीने! स्पष्टच आहे की, महिलांचे कार्यक्षेत्र समाजासाठी अधिक उपयोगी असूनही दुय्यम दर्जाचे मानले गेले आहे, तर पुरुषांचे कार्य समाजात सन्मान्य मानले गेले आहे. स्त्रियांनी स्वतः आपल्याप्रति हीन भावना बाळगली आहे. त्यामुळे आता वेळ आणि संधी मिळताच आपले परंपरागत कार्य त्या सोडत चालल्या आहेत. पुरुषांच्या कार्यक्षेत्रामधील प्रवेश त्यांना विशेष सुख देत आहे. आमच्यासाठी (समाजासाठी) ही सुखद गोष्ट आहे. मुली पुढे येत आहेत. ते कलेचे क्षेत्र असो वा नोकरी; स्त्री-पुरुषांमधील भेद नष्ट होत चालला आहे. परंतु आपल्या निर्धारित पारंपरिक कार्याप्रति युवतींमध्ये हीन भावना निर्माण होऊ नये. पुरुषांच्या कार्यक्षेत्रामधील महिलांचा प्रवेश प्रशंसनीय तर आहेच, पण त्यांनी ही उपलब्धी केवळ पुरुषांना श्रेष्ठ मानून प्राप्त केली असेल तर ती प्रशंसनीय नाही. पुरुषांच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या पदार्पणाचे स्वागत पुरुषही करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.