पुरस्कार ही माध्यमांच्या समाजहितकारक कार्याची घेतलेली दखल : जावडेकर

0
180

>> नवप्रभासह देशभरातील ३० माध्यम संस्थांचा दिल्लीत गौरव

येथील रायसिना रोडवरील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात मुद्रित माध्यम (मराठी) विभागात दैनिक नवप्रभासह देशभरातील ३० माध्यम संस्थांना आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व परीक्षक मंडळाचे प्रमुख न्यायमूर्ती सी. के. प्रसाद, मंत्रालयाचे सचिव श्री. रवी मित्तल, अतिरिक्त सचिव अतुल तिवारी व आयुष व माहिती प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘नवप्रभा’च्या वतीने संपादक श्री. परेश प्रभू यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

याप्रसंगी बोलताना श्री. जावडेकर यांनी, हे पुरस्कार म्हणजे माध्यमांद्वारे चालवल्या जाणार्‍या समाजहितकारक कार्याची घेतलेली दखल असल्याचे सांगितले. एकेकाळी लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी वृत्तपत्र चालवले. आज सुराज्यासाठी वृत्तपत्रांची कामगिरी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. भारताच्या परिपक्व लोकशाहीची ही खूण असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी योग हा भारताचा महान वारसा असून त्याद्वारे आपण शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती प्राप्त करू शकतो असे प्रतिपादन केले.
परीक्षक मंडळाचे प्रमुख प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. सी. के. प्रसाद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी स्वागत केले.

गेल्या जूनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व आकाशवाणी केंद्रांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी देशभरातील १३२ माध्यम संस्थामधून ३० माध्यम संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे परीक्षकामंडळाचे प्रमुख व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. सी. के. प्रसाद यांनी यावेळी सांगितले. देशातील २२ भाषांतून ही निवड करण्यात आली.

योग दिवस मीडिया सन्मानाचे मानकरी
वृत्तपत्रे –
मराठी : दैनिक नवप्रभा, गोवा
हिंदी : नई दुनिया, इंदूर
हिंदी : प्रभात खबर, रांची
कन्नड : उदयवाणी, बंगळुरू
उडिया : उडिसा एक्सप्रेस, भुवनेश्‍वर
तेलगू : लीडर, आंध्रप्रदेश
ऊर्दू : राष्ट्रीय सहारा, नोयडा
आसामी : दैनिक अग्रदूत, दिसपूर आसाम
गुजराती : मिड डे, मुंबई
हिंदी : देशप्राण, रांची
इंग्रजी : डेली नवाई डुग्गर, जम्मू
दूरचित्रवाणी वाहिन्या –
गुजराती : सन्देश न्यूज, अहमदाबाद
मल्याळम : अमृता टीव्ही
उडिया : उडिसा टीव्ही
तामीळ : दूरदर्शन चेन्नई
ऊर्दू : दूरदर्शन श्रीनगर
हिंदी : संस्कार टीव्ही, नोयडा
हिंदी : डीडी न्यूज
हिंदी : सेंट्रल प्रॉडक्शन सेंटर, दूरदर्शन
रेडिओ केंद्रे –
आसामी : ज्ञानतरंग ९०.४
बंगाली : एफएम रेनबो, कोलकाता
कन्नड : आकाशवाणी मडिकेरी
मल्याळम : आकाशवाणी थिरूवनंतपुरम
मराठी : आकाशवाणी औरंगाबाद
नेपाळी : रेडिओ मिस्टी ९४.३
तेलगू : आकाशवाणी हैदराबाद
तामीळ : हॅलो एफ एम
हिंदी : आकाशवाणी रायपूर
हिंदी : फीव्हर १०४ एफ एम