पुन्हा मंत्रिपद मिळविण्यासाठी सरदेसाई यांचा खटाटोप : कॉंग्रेस

0
158

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून गेलेले मंत्रिपद पुन्हा एकदा मिळविण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

आमदार सरदेसाई यांच्याकडून शिवसेनेशी समविचारी पक्षाची आघाडी करण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. सरदेसाई यांच्याकडून केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेट केले जात आहे. भाजपवर कोणतीही टिका केली जात नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी महाराष्ट्रातील दोडामार्ग येथे खरेदी केलेल्या जमिनीविषयी चौकशीसाठी प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप डिमेलो यांनी केला.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई हे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर जोरदार टिका करीत असले तरी एनडीएमधून बाहेर पडत नाहीत. एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा केल्यास त्यांचा चिदंबरम होण्याची शक्यता असल्याने एनडीएमधून बाहेर पडत नाहीत, असा आरोप डिमेलो यांनी केला.

कॉंग्रेस पक्ष आणि गोवा फॉरवर्ड समविचारी नाहीत. त्यामुळे गोवा फॉरवर्डशी आघाडी होऊ शकत नाही. गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विजय सरदेसाई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टिका केली होती. मात्र निवडणुकीनंतर पर्रीकर यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले असे ते म्हणाले.
डिमेलो यांनी पर्वरीचे आमदार तथा माजी मंत्री रोहन खंवटे यांच्यावरही जोरदार टिका केली. विजय सरदेसाई यांनी समविचारी शब्दाची व्याख्या प्रथम जाणून घ्यावी आणि लोकांना फसविण्याचे धंदे बंद करावेत, असेही डिमेलो यांनी सांगितले.