पुन्हा गुन्हा

0
118

दिल्लीमध्ये ‘उबेर’ या ५१ देशांत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टॅक्सीसेवेतील एका चालकाने पंचवीस वर्षीय युवतीवर केलेल्या बलात्काराच्या घटनेने देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अनागोंदी व असुरक्षिततेवर पुन्हा एकवार प्रकाश पडला आहे. सदर आरोपीला यापूर्वी बलात्कार प्रकरणात सात महिने तुरुंगवास घडला होता आणि तरीही त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची शहानिशा न करता त्याला नोकरीवर ठेवले गेले हे धक्कादायक आहे. चालकाने सादर केलेला सद्वर्तणुकीचा दाखला बोगस होता आणि ज्या पोलीस अधिकार्‍याची त्यावर सही व शिक्का आहे, त्याची त्यापूर्वीच मिझोराममध्ये बदली झाली होती असे आढळून आले आहे. म्हणजे एक तर पोलीस दलातील कोणीतरी हा बोगस दाखला त्याला मिळवून दिलेला असेल, किंवा आरोपीनेच हा बोगस दाखला तयार करून घेतला असेल. पण जे समोर आले आहे ते अत्यंत गंभीर आहे. नोंद घेण्याजोगी दुसरी गंभीर बाब म्हणजे ‘उबेर’ ला दिल्लीमध्ये टॅक्सीसेवेचा परवानाच नाही. केवळ तीच नव्हे, तर तिच्यासारख्या ‘ओला कॅब’, ‘टॅक्सी फॉर शुअर’ वगैरे इंटरनेट व मोबाईल ऍप आधारित सेवा कोणत्या कायदेशीर आधारावर चालत होत्या, असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला आहे. गेले कित्येक महिने या इंटरनेट आधारित सेवा सुरू असूनही त्याकडे संबंधित यंत्रणांनी कानाडोळा कसा काय केला? ही घटना घडताच दिल्ली पोलिसांनी जेव्हा ‘उबेर’ वर दिल्लीत बंदी घातली, तेव्हा अशी बंदी घालणे हा उपाय नव्हे असे देशाचे खुद्द वाहतूकमंत्रीच सांगू लागले हे तर अजब म्हणायला हवे! अशा बड्या कंपन्यांचे हात फार वरपर्यंत गेलेले असावेत याची खात्री पटते. इंटरनेट व मोबाईल ऍपमार्फत टॅक्सी पुरवणार्‍या या कंपन्या इतर रेडिओ कॅब सेवांपेक्षा वेगळ्या आहेत. दिल्लीत मेरू, इझी कॅब आदी सहा नोंदणीकृत टॅक्सी सेवा कंपन्या आहेत. त्या रेडिओ टॅक्सी आहेत, म्हणजे त्यावर जीपीएस यंत्रणा बसवलेली असते, ज्याद्वारे ती टॅक्सी कधी कुठे आहे त्याचा माग काढता येतो. मात्र ‘उबेर’ च्या टॅक्सीमध्ये चालकाजवळच्या मोबाईलच्या आधारे टॅक्सीचा ठावठिकाणा लावता येत असे. म्हणजे चालकाने मोबाईल बंद केला की संपर्क तुटलाच! या टॅक्सी कुठे आहेत त्यावर कंपनीतील कोणाची नजर असेल असेही वाटत नाही. त्यामुळे केवळ पैसा कमावणे हाच त्यामागील हेतू स्पष्ट होतो. अशा वेळी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे काय? आजकाल बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामाच्या विचित्र वेळांमुळे आणि महानगरांमधील बदलत्या जीवनशैलीमुळे रात्रीबेरात्री एकटी दुकटीने प्रवास करण्याची पाळी अनेक मुलींवर येत असते. बड्या कंपनीचे नाव ऐकून आणि त्यांच्या सुरक्षिततेचा दावा करणार्‍या उदंड जाहिरातबाजीला भुलून त्या अशा टॅक्सीतून प्रवास करणे सुरक्षित आहे अशा भ्रमात राहतात आणि घात होतो. हे केवळ दिल्लीसारख्या मोठ्या शहरांतच घडते असे नव्हे. अगदी पुण्यासारख्या ठिकाणीही कंपनीच्याच टॅक्सीतून रात्रपाळीनंतर घरी परतणार्‍या मुलीवर पाशवी बलात्कार करून निर्जनस्थळी टाकून दिल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे ही वेळ कधीही, कोठेही आणि कोणावरही येऊ शकते. दिल्लीत यापूर्वी घडलेल्या निर्भयाकांडानंतर महिलांच्या सुरक्षिततेवर फार मोठे विचारमंथन देशात घडले होते. पण एवढे सगळे होऊनही पुन्हा जर अशाच प्रकारच्या भयानक घटना घडणार असतील, तर आपण धडा काय घेतला? महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना काय केल्या? सर्वांत खेदाची बाब म्हणजे ज्या तरूणाने त्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केला, त्याला आपल्या त्या अमानुष कृत्याचा ना खेद, ना खंत. ‘जरा हातून चूक झाली, मोठे काय झाले’, असा त्याचा एकंदर आव पाहिला तर कोणालाही चार कानफटीत देण्याची उबळ यावी! पण कायद्याच्या दरबारातून असे गुन्हेगार मोकाट कसे सुटू शकतात? यापूर्वीच्या बलात्कार प्रकरणातून तो सुटला म्हणून पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा करू शकला. दोन विनयभंग प्रकरणांतही तो आरोपी आहे. म्हणजे गुन्हेगार सराईत आहे. अशा हैवानांना जरब बसणार नसेल तर न्यायव्यवस्थेला अर्थच राहणार नाही. निर्भया प्रकरणानंतर कायदा कडक झाला आहे, त्यामुळे त्याला कदाचित शिक्षाही होईल, परंतु पुन्हा कोणत्या मुलीबाळीवर असा आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रसंग गुदरणार नाही यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरक्षित करण्यासाठी सरकार काय करणार आहे?