पुन्हा कुरापत

0
173

शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून आठवडा उलटतो न उलटतो तो उत्तर कोरियाने जपानच्या माथ्यावरून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागून पुन्हा एकवार चिथावणी दिली आहे. ही नुसती क्षेपणास्त्र चाचणी नाही. ‘जपानची चारही बेटे समुद्रात बुडवू आणि अमेरिकेची राखरांगोळी करू’ या दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर हे क्षेपणास्त्र डागले गेलेले असल्याने त्याचे गांभीर्य अधिक वाढते. अत्यंत वेगवान पद्धतीने उत्तर कोरिया स्वतःला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्ज करण्याकडे चालला आहे हे तर एव्हाना स्पष्टच झालेले आहे, परंतु केवळ आत्मरक्षण हा त्यामागचा हेतू नाही. आपला हाडवैरी असलेल्या दक्षिण कोरियाला आणि तिची पाठराखण करणार्‍या अमेरिका आणि जपानलाही धडा शिकवण्याची त्यामागची खरी मनीषा आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने रशिया आणि चीनकडून उत्तर कोरियाची परोक्ष – अपरोक्ष पाठराखण चालली आहे. खरे तर उत्तर कोरियाकडून एवढ्या वेगवान पद्धतीने क्षेपणास्त्रांचा विकास चालला आहे, त्याला रशियाच कारणीभूत आहे, कारण रशिया आणि युक्रेनकडून मिळवलेल्या अत्यंत कार्यक्षम अशा इंजिनांच्या आधारेच ही हजारो मैल पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्यात त्यांना यश आलेले आहे. यापूर्वीची चाचणी त्यांनी २९ ऑगस्टला केली होती. त्यावेळी ३२ मिनिटांत अकराशे कि. मी. पल्ला गाठला गेला होता. यावेळी ताज्या चाचणीत अवघ्या एकोणीस मिनिटांत बावीसशे किलोमीटर पल्ला गाठला गेला. उत्तर कोरियापाशी सध्या असलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये तेराशे कि. मी. पासून तब्बल अकरा हजार कि. मी. चा पल्ला गाठू शकणार्‍या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे आणि थेट अमेरिकेतील एखाद्या शहरावर अण्वस्त्रहल्ला करण्याचीही तयारी उत्तर कोरियाने ठेवलेली आहे. त्यामुळे या चाचण्यांचे गांभीर्य कैक पटींनी वाढते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निर्बंध लागू केलेले असताना त्याची तमा न बाळगता उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्र व क्षेपणास्त्र सज्जता चालूच ठेवली आहे आणि त्यातून जग हळूहळू तिसर्‍या महायुद्धाकडे तर जाणार नाही ना या भीतीने जगभरातील शांतताप्रेमींना ग्रासले आहे. या चाचण्यांची परिणती युद्धात होईलच असे नव्हे, परंतु ती शक्यता अगदीच नाही असेही नाही. नुकताच चीनने या विषयात मध्यस्थी करण्याचा आव आणला. उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा आणि त्या बदल्यात दक्षिण कोरिया आणि जपानने आपल्या भूमीवरील अमेरिकी तळ हटवावेत असा प्रस्ताव चीनकडून दिला गेला आहे. याला अर्थातच अमेरिकेची तयारी नसेल हे उघड आहे. त्यामुळे एकीकडे मध्यस्थीचा आव आणायचा आणि दुसरीकडे उत्तर कोरियाच्या वाढत्या सामर्थ्याला मागून बळकटी द्यायची असा दुटप्पीपणा चीनने चालवला आहे. खरे तर आज उत्तर कोरिया जगात एकाकी पडलेला आहे. केवळ चीन आणि रशियाशी त्याचे आर्थिक आणि इतर लागेबांधे आहेत. चीन – जपान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाची ही क्षेपणास्त्रे थेट जपानवरून झेपावत प्रशांत महासागरात कोसळतात हेही उल्लेखनीय आहे. अमेरिकेच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्याचे धैर्य मात्र उत्तर कोरियाने अद्याप दाखवलेले नाही. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे हे भारतात नुकतेच येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांनी उत्तर कोरियाला हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीबाबत इशारा दिलेला असल्याने आता भारतही या विवादात ओढला गेला आहे. खरे तर चीन व रशियाखालोखाल भारत आणि उत्तर कोरिया यांचा व्यापार आहे. नव्या घडामोडींतून जी नवी जागतिक समिकरणे आकाराला येऊ लागली आहेत, ती चिंताजनक आहेत. जगावर तिसर्‍या महायुद्धाचे ढग जमा होण्यास जी काही संभाव्य कारणे सांगितली जातात, त्यामध्ये उत्तर कोरियाची ही वाढती कुरापतखोरी हे एक महत्त्वाचे कारण आहे. यावर राजनैतिक तोडगा निघाला पाहिजे. स्वतःला अण्वस्त्रसज्ज बनवण्याचा वा क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे त्यामध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न भारतासह प्रत्येक देश करीत आला आहे. परंतु त्यामागील उद्दिष्ट महत्त्वाचे ठरते. भारताने हे सगळे केले, परंतु कोठेही जागतिक शांततेला बाधा येणार नाही याचे अभिवचनही जगाला दिले. उत्तर कोरियाच्या बाबतीत नेमके हेच घडलेले नाही. उलट, जपानला समुद्रात बुडवू, अमेरिकेची होळी करू असल्या शेलक्या धमक्या देत हे सारे चालले आहे हीच तर चिंतेची बाब आहे! जागतिक समूहाने याबाबत आता पुढे येत वातावरणातील हा तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यतः चीन आणि रशियावर यासंदर्भात दबाव वाढला पाहिजे. उत्तर कोरियाची खुमखुमी उतरवायची असेल तर त्याच्या पाठिराख्यांना आधी नमवावे लागेल. हा संघर्ष असाच सुरू राहणे जगाच्या हिताचे नाहीच नाही.