पुन्हा उडती शवपेटी?

0
203

नौदलाचे मिग २९ के विमान काल दाबोळीत दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने वैमानिकाचा जीव बचावला असला, तरी नागरी विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाली आणि त्याचा फटका कोलकात्याला निघालेल्या एफसी गोवा संघालाही बसला. नौदलाच्या ताफ्यातील मिग २९ कोसळण्याची ही जरी पहिलीच घटना असली, तरी त्यातून आजवर मिग मालिकांतील विमान दुर्घटनांच्या कटू आठवणी त्या दुर्घटनेने ताज्या केल्या आहेत. भारतीय हवाई दलापाशी असलेली मिग विमाने ही ‘उडती शवपेटी’ म्हणूनच ओळखली जातात, एवढ्या प्रचंड प्रमाणात दुर्घटना त्या विमानांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. मध्यंतरी संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा संरक्षणमंत्री ए. के. अँटनी होते. चाळीस वर्षांत हवाई दलाच्या ८७२ पैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे तब्बल ४८२ मिग विमाने दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात १९ एप्रिल २०१२ पर्यंत १७१ वैमानिक व ४७ इतरांचा बळी गेल्याची कबुली अँटनींनी तेव्हा दिली होती. त्यानंतरच्या काळातही या दुर्घटना थांबलेल्या नाहीत. त्यानंतरच्या पाच वर्षांत पस्तीसहून अधिक दुर्घटना या विमानांच्या बाबतीत घडल्या. जे ‘मिग २९’ बनावटीचे विमान दाबोळीत दुर्घटनाग्रस्त झाले त्याच बनावटीच्या, परंतु हवाई दलाच्या ताफ्यातील दोन मिग २९ विमाने जामनगरला दुर्घटनाग्रस्त झाली होती. एक पंजाबात अंबाल्याजवळ कोसळले होते. त्यामुळे एकूणच ‘मिग’ मालिकेतील विमानांची गुणवत्ता संशयास्पद राहिली आहे. भारत – रशिया मैत्रिपर्वाच्या काळात साठच्या दशकात या विमान खरेदीचा पहिला व्यवहार झाला. तेव्हापासून वेगवेगळी ‘मिग’ विमाने भारताने खरेदी केली. उडती शवपेटी ठरलेली मिग २१, त्यानंतरची मिग २३, मिग २५, मिग २७ आणि अलीकडची मिग २९ अशी ही मालिका आहे. यापैकी कालबाह्य झालेली मिग २१ नंतर प्रशिक्षणापुरती वापरली जाऊ लागली, तरी देखील प्रशिक्षणादरम्यान ती दुर्घटनाग्रस्त होऊन तरूण वैमानिकांचे दुर्दैवी मृत्यू होण्याची मालिका काही थांबली नाही. नौदलाच्या ताफ्यातील काल दुर्घटनाग्रस्त झालेले मिग २९ के विमानही प्रशिक्षणादरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. ही मिग २९ ‘हंसा’ तळावर ठेवण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा ऍडमिरल गोर्शकोव्ह ही युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ बनून भारतीय नौदलाकडे आली तेव्हा ही विमाने त्यावर हलवण्यात आली. लवकरच येणार असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ वरही ही विमाने तैनात होणार आहेत. अशा वेळी या दुर्घटनेपासून बोध घेऊन त्यामागील कारणे शोधून ते दोष दूर करण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जरूरी आहे. मध्यंतरी सातत्याने होणार्‍या मिग दुर्घटनांबाबत जेव्हा भारताने रशियाकडे तक्रार केली होती, तेव्हा रशियाने या दुर्घटनांचे खापर भारतावरच फोडले होते. भारत युक्रेन आणि पूर्व युरोपीय देशांकडून कमी गुणवत्तेचे सुटे भाग घेत असल्यानेच या दुर्घटना घडत असल्याचे रशियाचे म्हणणे होते. खुद्द भारतीय संरक्षण मंत्रालयही या दुर्घटनांची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. बहुतेकवेळा अशा दुर्घटना घडण्यामागे मानवी चूक असल्याचे सांगितले जाते आणि दोषांवर पडदा ओढला जातो. विमानांच्या रचनेमध्ये दोष आहे का, तांत्रिक बाबतींत काही त्रुटी आहेत का याकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे तेवढे दिले जात असेल असे वाटत नाही. मुळात संरक्षण खरेदी व्यवहारांमागे मोठी आंतरराष्ट्रीय लॉबी असते हे तर सर्वविदित आहे. त्यामुळे अशा दुर्घटना, त्यांचे निष्कर्ष याबाबत लपवाछपवी होण्याचा दाट संभव असतो. दोन वर्षांपूर्वी देशाच्या महालेखापालांनीच ‘मिग’ विमानांवर ताशेरे ओढले होते. दाबोळीत जे मिग २९ दुर्घटनाग्रस्त झाले, ते सी हॅरियरच्या जागी भारताच्या ताब्यात आल्यापासून वारंवार त्यांच्या इंजिनांमध्ये बिघाड होत असल्याची खुद्द नौदलाची तक्रार राहिली आहे. जी ६५ मिग २९ विमाने भारताकडे आहेत, त्यापैकी चाळीस विमानांच्या इंजिनांत वेळोवेळी बिघाड झाल्याची माहिती आता या दुर्घटनेनंतर समोर आलेली आहे. या तांत्रिक बिघाडांमुळे या विमानांच्या उपलब्धतेचे प्रमाण अवघे पंधरा ते सदतीस टक्क्यांपर्यंतच राहिले आहे, ही खरोखर चिंतेची बाब म्हणावी लागेल. पूर्वी कालबाह्य झालेली मिग विमाने निरुपाय होऊन वापरली गेली. त्यानंतर आजही नव्या मिग विमानांची कालमर्यादा वाढवण्याकडेच आपल्या सुरक्षा दलांचा कल राहिलेला आहे. अशा वेळी अशी एखादी दुर्घटना घडते आणि जेव्हा आपल्या एखाद्या तरुण होतकरू वैमानिकाचा जीव पणाला लागतो, तेव्हा चिंता वाटते. दाबोळीच्या परिसरातील विमान दुर्घटनांमध्ये आजवर लेफ्टनंट अरुण पुनिया, लेफ्टनंट कमांडर सौरभ तिवारी, व्ही. मेहता आदींचे बळी गेले आहेत. आणखी कोण्या निष्पाप वैमानिकाचा बळी विमानातील तांत्रिक दोषांपोटी जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे.