पुन्हा इशारा

0
118

ईशान्येतील तीन राज्ये दिमाखात सर करणार्‍या भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभेच्या तीन जागा मात्र अत्यंत नामुष्कीजनकरीत्या गमवाव्या लागल्या. ईशान्येतील निकाल हे अपवादात्मक होते आणि त्या विजयाला वेगळी परिस्थिती कारणीभूत होती. उर्वरित देशामध्ये वातावरण वेगळे बनत चालले आहे. ईशान्येतील भाजपच्या विजयासंबंधीच्या अग्रलेखात आम्ही ‘‘येथे एक बाब लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ईशान्य भारताचे हे निकाल म्हणजे काही भाजपच्या भावी यशाचा परवाना नव्हे. गुजरातमधील झटका, राजस्थान, मध्य प्रदेश पोटनिवडणुकांतील हादरा पाहिल्यास उर्वरित देशातील परिस्थिती भाजपानुकूल आहे असे मानणे धाडसाचे ठरेल.’’ असे स्पष्टपणे अधोरेखित केले होते. उत्तर प्रदेश आणि बिहार पोटनिवडणुकांचे ताजे निकाल त्याच अनुमानाला दुजोरा देत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या क्षणी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले किंवा अल्प मतदान झाले अशी कारणे आज भाजपकडून भले पुढे केली जात असली, तरीही मतांचे गणित काही वेगळेच सांगते आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या मतसंख्येमध्ये गोरखपूर आणि फूलपूरमध्ये अनुक्रमे दहा आणि साडे नऊ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आलेली आहे आणि भाजपची मतांची टक्केवारी घटलेली आहे. म्हणजेच भाजपची मते मोठ्या प्रमाणात विरोधात गेलेली आहेत असे हा निकाल सांगतो. बिहारमध्ये अरारियामधील राष्ट्रीय जनता दलाच्या विजयाला तुरुंगात असलेल्या लालुप्रसादांप्रती सहानुभूतीचे कारण सांगितले जात असले तरी ते खरे नाही. सामान्यजनांमधील दैनंदिन जीवनातील प्रश्नांसंबंधीचा आक्रोशच हळूहळू सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाऊ लागला आहे की काय याचा विचार मोदी सरकारने त्यामुळे करायला हवा. शेतकर्‍यांमधील अस्वस्थता, ‘आधार’ सक्तीसारख्या विषयांचा सामान्यजनांना अकारण होणारा जाच, वाढत चाललेली महागाई आणि विकास आणि सुशासनाची बात करता करता हिंदुत्वाच्या राजकारणाला दिले गेलेले प्राधान्य, त्यातून अकारण ऐरणीवर आणले जात असलेले भावनिक विषय यांचा रागही आम मतदारांनी या सार्‍या पोटनिवडणुकांतील मतपेटीतून व्यक्त केलेला असू शकतो. गोरखपूर हा योगी आदित्यनाथांचा मतदारसंघ. फूलपूर हा उपमुख्यमंत्र्यांचा. दोन्ही गेल्या वेळी दीड दीड लाखाच्या आघाडीने जिंकले होते. गोरखपूर तर गेली तीस वर्षे भाजपकडे होता, तरीही तो का गमवावा लागला याचे प्रांजळ आत्मचिंतन भाजपाने करायला हवे. ‘अतिआत्मविश्वास’ असे स्वतः आदित्यनाथ म्हणाले. ‘अतिआत्मविश्वास’ की जनतेला गृहित धरणारी अहंमन्यता? सत्तेचा ज्वर चढला की जनता तो उतरवतेच हा या देशाचा इतिहास आहे. जनतेला गृहित धरू नका हाच प्रत्येक निवडणुकीचा संदेश असतो. एकीकडे प्रामाणिकपणे वागणार्‍या सामान्य माणसांच्या खिशात पावलोपावली हात घातला जात असताना आणि त्याच्याभोवती जाचक फास आवळले जात असताना दुसरीकडे नीरव मोदींसारखे बडे लोक देशाला हजारो कोटींचा चुना लावून फरार होत आहेत यासंबंधी जनतेमध्ये नाराजी आहे. सामान्य माणसाच्या जीवनात काही फरक पडलेला नाही, मात्र, बड्या भांडवलदारांचा फायदा होतो आहे अशीही जनभावना बनत चाललेली आहे. स्वतःवरच खूश राहण्यापेक्षा आपली धोरणे सामान्य जनतेला जाचक तर ठरत नाहीत ना याचा विचार म्हणूनच सत्ताधार्‍यांनी करायला हवा, अन्यथा ‘अच्छे दिन’ही ‘इंडिया शायनिंग’च्या वाटेने जायला वेळ लागणार नाही. या वर्षातील सहाच्या सहा लोकसभा पोटनिवडणुका भाजप हरला आहे. लोकसभेतील संख्याबळ भरभक्कम २८२ जेमतेम २७४ वर उतरले आहे. २०१४ नंतरच्या मोदी लाटेने सैरभैर आणि गलितगात्र झालेल्या विरोधकांना भाजपचा झंझावात रोखता येऊ शकतो हा आत्मविश्वास एव्हाना आलेला दिसतो. सोनिया गांधी कॉंग्रेसकडेच या विरोधकांचे नेतृत्व उरावे यासाठी बैठकांमागून बैठका घेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आजवरचे हाडवैरी सपा – बसपा एकत्र आले. एकीकडे भाजपाचे शिवसेना, तेलगू देसमसारखे मित्रपक्ष साथ सोडत चालले आहेत आणि दुसरीकडे भाजपविरोधी प्रादेशिक पक्ष एकत्र येत आहेत ही परिस्थिती विचार करायला लावणारी आहे. पण अजूनही भाजपसाठी वेळ गेलेली नाही. आपल्या सरकारची प्राधान्ये तपासण्याची ही वेळ आहे. जनता म्हणजे काही संघाची स्वयंसेवक नव्हे. तिला तिचे स्वातंत्र्य सर्वांत प्रिय आहे. घोषणांच्या चमचमाटापेक्षा प्रत्यक्ष कामगिरीकडे जनता नजर ठेवून आहे हे विसरून चालणार नाही. गेल्यावेळच्या आपल्या मतामुळे आपल्या रोजच्या जीवनात काय फरक पडला हे प्रत्येक मतदार तपासून पाहत असतो आणि त्याचे उत्तर शेवटी मतपेटीतून देत असतो! पोटनिवडणुकांतून मतदारांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे!